सोनमर्ग

काश्मिर सफर भाग-९
   
सिंध तथा सिंधूनदीच्या खळाळत्या थंडगार पाण्याच्या नजाकतीच्या आठवणी टिपत तेथून मार्गस्थ झालो.  ती तशीच तिच्या मार्गाने वाटेतील दगड-गोट्यांना आणखी गुळगुळीत करत पुढे चालली होती. आम्हीही तिच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परंतु, तिच्याच समांतर रस्त्यावरुन पुढे सोनमर्गकडे निघालो. वाटेत अगदी सौंदर्याची झालेली उधळण पहात, टिपत..!
         लेह-लदाखकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची विशेष करुन ट्रक, अवजड वाहनांची बरीच कोंडी झालेली. ही सर्व वाहने मुंग्यांप्रमाणे एका ओळीने जागेवरच थांबून होती. वाटेत झोझीला टनेलचे मोठे काम सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्याचीही मोठी कामे सुरु आहेत. त्यासाठी साहित्य घेवून आलेली अवजड वाहने, इंधनाचे टँकर्सची संख्यादेखील मोठी होती. अशा कोंडीत मार्ग काढत अंकीतभैय्याने  आमची मेटॕडोर पुढे रेटत,रेटत आणलेली.
      सोनमर्गच्या प्रवेशद्वारावर पोहचलो होतो. येथे आपले वाहन ठेवून स्थानिक वाहनाने पुढील पाॕईंटसाठी जावे लागणार होते. खाली उतरलो तसा हवेत कमालीचा गारवा जाणवत होता. बर्फात जाण्यासाठी गम बूट, गरम कपडे घेण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरु होती. तोपर्यंत स्थानिक वाहन ठरवण्यात आले. सर्व तयारीनिशी पाॕईंटकडे जाण्यासाठी सज्जता झाली. तत्पूर्वी फोटोसेशन सुरु झालेले. ते उरकून पुढे रवाना झालो.
         'यहाँ बजरंगी भाईजान की शुटींग हुई थी..वो लास्टवाला सीन..बाॕर्डर का..' अशी माहिती हा नवा चालक आम्हाला देत होता. जागोजागी रस्त्याकडेला वितळून खाली आलेला पांढरा शुभ्र, तर काही ठिकाणी मातकट बर्फ दिसत होता. त्यालगत वाहत जाणारे पाणी, त्याच्यामुळे तुटलेल्या बर्फात खळगे-कुंड तयार झालेले.  त्यामधील पांढरट, निळसर पाणी सगळंच कसं रमणीय होते.
         वाटेत एके ठिकाणी 'रिव्हर क्राॕसिंग झीपलाईन' चा फलक दिसाला. याबाबत चालकाशी चर्चा केली, तर तो म्हणाला, 'आते वक्त करेंगे..' काही अंतरावर थांबलेल्या वाहनांच्या आणि खाद्यपदार्थ विक्रेत्या दुकानांच्या गर्दीने हा मुख्य पाॕईंट असल्याचे दर्शविले.
        पाहू तिकडे निरभ्र निळ्या-पांढऱ्या आकाशातील हिमशिखरे, त्याखाली उंच वाढलेल्या वनराईचे पर्वत लक्ष वेधून घेत होते. पर्वताच्या उतारावरुन ओघळून रस्त्यापासून जवळच बर्फ पसरला होता. वाऱ्याने आलेली धूळ, झाडांची पाने मिसळल्याने तो बराच मातकट बनला होता. पर्यटकांनी त्यावर स्लेजचा आनंद घेतल्याने बराचसा मातकट भाग गायब होवून तो पांढरा बनला होता.
      काश्मिर पर्यटनातील हा बर्फाचा पहिला आनंद जो-तो घेत होता. बर्फाचे गोळे करुन स्वतःवर उधळणे, एकमेकांवर मारणे त्याचे फोटोसेशन, रिल्स बनवणे असे काही सुरु होते. आम्हीही विविध छबी टिपल्या. खास त्यासाठी छत्रीही सोबत नेली होती. तिचा वापरही सर्वजण खुबीने करत होते.
        काश्मिरी कावा, भाजलेले मक्याचे कणीस, नुडल्स अन्य पदार्थांवर बर्फात खेळून दमलेले यथेच्छ ताव मारत होते. समोर पहाडांवर बर्फाच्छादित हिमशिखरे स्थितप्रज्ञासारखी भासत होती. बर्फ वितळून ओघळणारे पाणी पर्वताच्या पायाशी लोळण घेत जमेल तसे, जमेल तेथून प्रवाहात मिसळून अंग टाकत होते. हा प्रवाह पुढे सिंधू नदीला जावून पुढील यात्रेस तयार झालेला. रस्त्याच्या पलिकडील बाजूस शिखरावरील बर्फ सोडला तर, तो चंद्रावरील भू भाग वाटत होता. त्याच्या साक्षीनेही फोटोसेशन खास महिला वर्गाने उरकत आनंद घेतला. मातकट बर्फातील या आनंदानंतर आम्ही माघारी परतण्यासाठी वळालो.
         -प्रशांत सातपुते
  9403464101 
          p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..