ज्येष्ठांची प्रेरणादायी तरुणाई..
काश्मिर सफर भाग- १०
मातकट बर्फातील उत्कटता संपल्यानंतर माघारी जात असताना, वाटेत झोझीला टनेलच्या कामाजवळ झालेल्या हानीची माहिती चालकाने दिली. एक खूप मोठी बर्फाची दरड कोसळल्याने वाहने, साहित्य यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्या खाणाखुणा मोडतोड झालेल्या वाहनांवरुन आणि साधनसंपत्तीवरुन दिसत होत्या. बर्फाची दरड कमालीची मोठी असणार, हे समोरील दृश्य पाहून जाणवत होते.
एव्हाना एका पाॕईंटजवळ आमचे वाहन पोहचले होते. रस्त्याच्या उजवीकडे पाण्याचा प्रवाह वाहात होता. बाजूच्या टेकडीवर लाॕन लावल्याने बगिच्याचा फिल निर्माण केला होता. एक छोटासा परंतु, लक्षवेधी प्रपात खाली येत प्रवाहात एकरुप होत होता. उंच पर्वत, त्याच्या टोकावर अगदी आकाशात पांढुरका बर्फ माखलेला दिसत होता. खरंतर हा फोटो पाॕईंट होता. अनेक पर्यटक उतरुन फोटोसेशन करत होते. आमच्यापैकी सर्वांनी त्याचा केवळ दूरुनच आस्वाद घेतला.
थांबलेली गाडी पुन्हा निघाली. जाताना, 'आते वक्त करेंगे..' असे आश्वासन दिलेल्या जागी चालकाने हक्काने वाहन थांबविले. ते सोनमर्गचे 'रिव्हर क्राॕसिंग झीपलाईन' हा साहसी प्रकार होता. आमच्या वाहनात मी अणि सौ. वगळता सर्वजण ज्येष्ठ नागरिक होते. 'हा साहसी प्रकार कुणी करणार का..' असे विचारणेही तसे अवघड होते. पण, सातारच्या वृषाली वाळिंबे या ६३ वर्षीय आणि पुण्याच्या सुजाता ढापरे या ५३ वर्षीय सहकारी पर्यटकांनी उत्साह दाखवत आमच्या पाठोपाठ सहभाग नोंदवला. या उत्साहा पाठीमागे ६३ वर्षीय आमचे गोपाळदादा ढापरे यांचा 'तू कर..मी आहे तुझ्या मागे..' ही विश्वासू प्रेरणा होती. खरंतर या साऱ्यांचा जोश पाहून त्यांचे कौतुक करावं तेवढं थोडंच होतं.
समोर असणाऱ्या नोंदणी कौंटरवर आम्ही आमची नावे आणि इतर माहिती भरली. आमचा वाहनचालक तो ही उत्साहाने आमच्या सर्वांसाठी हेल्मेट, ग्लोज, तत्सम साहित्य उचलून देत होता. आवश्यक ती पूर्व तयारी करुन एकेकजण रोपजवळ पोहचत होता. रोपवरुन सोडणारा मार्गदर्शक वजन विचारत होता. रोपवरुन गेलेला पर्यटक पुढील पाॕईंटवर पोहचून उतरल्यावर इकडून एकाला सोडले जात होते.
सर्वप्रथम सौभाग्यवतींचा क्रमांक लागला. अगदी उत्साहात मार्गदर्शकांने दिलेल्या सूचनांचे पालन करत ती मार्गस्थ झाली. खाली नदीचा खळाळता प्रवाह, ओबड-धोबड पात्र. त्यात वाढलेली झुडपे, मोठाले दगड-गोटे, बाजूला थांबून पाहताना भीती फारसी वाटत नसली तरी, प्रत्यक्षात माझा क्रमांक आल्यावर ती जाणवली. पलिकडे दोन लोखंडी खांबांवर लोखंडी दोर बसवलेले. त्यांची दुसरी टोकं इकडील लोखंडी खांबांवर बसवलेली. लोखंडी दोरीच्या हेलकाव्याने ती मध्येच खाली उतरुन आपले पाय खालील झाडांना लागतात की काय, अशी शंका मनात आली.
मिळालेल्या सूचना घेवून मी निघालो. खाली झुडुपांना पाय लागणार, अशी शंका आल्याने पाय आपोआपच दुमडले गेले. 'आपल्यावेळीच दोर दगा तर देणार नाही ना..' अशातच पलिकडे मी पोहचलो देखील. तेही अगदी निवांतपणे. हायसे वाटले. जाम मजा आली.
यानंतर वृषाली वाळिंबे आणि सुजाता ढापरे यांनी न डगमगता अगदी उत्साहाने हा रिव्हर क्राॕसिंगचा झीपलाईनचा साहसी प्रकार बिनधास्तपणे पूर्ण करुन वाहवा मिळवली. खूपच मजा आल्याचे सांगतानाच, 'आम्हीही तुमच्याबरोबरीने आज याचा प्रथमच आनंद घेतल्याचे', त्या म्हणाल्या.
वाहन चालकाने पलिकडे वाहन आणून आम्हाला घेतले आणि आम्ही पुढे मूळ वाहनतळाकडे निघालो. यावेळी रस्त्यांवर बरीच वर्दळ वाढून वाहतुकीची कोंडी होत असल्याने अंकीतभैयाने आपली मेटॕडोर काढून आम्हाला वाटेतच वाहनात घेतले आणि आमचा प्रवास हाॕटेलकडे म्हणजेच श्रीनगरकडे सुरु झाला. आता अगदी उत्साहाने झीपलाईनचीच वासनात चर्चा सुरु होती. अनुभूती सांगण्यातच ही चर्चा रमलेली.
आधीच सांगून ठेवल्याने अंकितभैय्याने वाटेतच असणाऱ्या रिव्हर राफ्टींग पाॕईंटजवळ वाहन थांबवले. सर्वजण खाली उतरले. यावेळी सायंकाळ होत आलेली. तसेच रबरी नाव यायला अजून १५ मिनिटे उशीर होता. तोपर्यंत दिल्लीहून आलेल्या 'थार'सोबत सर्वांचेच फोटोसेशन रमले.
काहीवेळातच दोन बोटी आल्या. आठ किलोमीटर अंतराचे हे राफ्टींग असल्याने ही आजची शेवटची फेरी होती. गंमत म्हणजे याही साहसी खेळात आम्हा दोघांबरोबर मघाच्या त्या वृषाली वाळिंबे आणि सुजाता ढापरे या दोघी सर्वात पुढे होत्या. यात आणखी दोघांची भर होती. ती म्हणजे मुंबईच्या मंगल व कुर्डुवाडीचे श्रीकांत भांबुरे या ज्येष्ठ सह पर्यटकाची! रबरी बोटीत बसल्यानंतर टूर मॕनेजर वैशाली मॕडमनी सर्वांचे फोटो घेतले आणि अखेर एकदाचे आमच्या दोन बोटीने राफ्टिंगसाठी जागा सोडली.
खळाळणाऱ्या सिंधूनदीमधूनच हे राफ्टींग होत होते हे विशेष! याच नदीकाठावर सकाळी फोटोसेशनसाठी आम्ही रमलो होतो. पात्रातील दगडगोट्यांवरुन हाकत नेपाळी रायडर बोट नेत होता. अचानकपणे पाण्याच्या लाटा उंच होत आम्हाला ओलेचिंब करुन आतमध्ये प्रवेश करत होत्या. आनंदाने बेभान झालेल्या पर्यटकांच्या तोंडातून मोठाले चित्कार निघत होते.
मोठाल्या लाटांवर स्वार होतानाच पाण्याच्या आंदोलनासोबत रबरी नावदेखील हेलकावे खात होती. जणू हिंदोळ्यावर झोके घेत घेत पुढे जात होती. आता बऱ्यापैकी सायंकाळ झालेली. ओलेत्या कपड्यात हवा शिरुन थंडी वाजत होती. अजूनही मोठा पल्ला पार करायचा होता. पण, एकाही चेहऱ्यावर भय दिसत नव्हते. एका वेगळ्या धाडसी, साहसी अनुभुतीचा आनंद ओसंडत होता. एक मोठा पडाव पुन्हा आला आणि बोटीत पाणी, पाणी करुन गेला. मोबाईलने जमेल तशी छायाचित्रे घेत होतो. परंतु, वाढत्या पाण्याच्या माऱ्याने तो आतील जॕकेटमध्ये बंदिस्त झाला. 'एक से बढकर एक..खतरों के खिलाडी..' असा एक प्रवास या ८ किलोमीटरच्या राफ्टींगमध्ये अनुभवायला मिळाला.
याही प्रवासात 'हम किसी से कम नहीं..' हा संदेश उत्साही 'ज्येष्ठांच्या' प्रेरणादायी 'तरुणाई'ने दिला होता. आजचा हा अनुभव अगदी अविस्मरणीय ठरला..
-प्रशांत सातपुते
9403464101
p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000
Comments
Post a Comment