हिंद देश के निवासी..

काश्मिर सफर भाग - ८
      
   सकाळी लवकरच सोनमर्गला बर्फात निघायचय..ही सूचना ऐकतच आम्ही शिकारा सोडून हाॕटेलवर पोहचलो. खरंतर सोनमर्गला आॕक्टोबर २०१७ मध्ये बर्फाचे दर्शन झाले नव्हते. हा भूभाग चंद्रावर असल्यासारखा त्यावेळी भासला होता. पण, सकाळी बर्फात जायला मिळणार..ही सूचनाच आनंदाचा गारवा देवून गेली. कारण, या ठिकाणी बर्फ असल्याची पुष्टी स्थानिक नागरिक तसेच परतलेल्या इतर पर्यटकांकडून खात्रीशीर मिळाली होती.
     हाॕटेलवर पोहचून फ्रेश झालो. जेवणासाठी वेळ असल्याने स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारायला पुन्हा निघालो. चिनार वृक्षाविषयी इथल्या नागरिकांची खूप वेगळी भावना असून, या झाडाखाली मनोभावे ईच्छा व्यक्त करतात आणि अशी ही व्यक्त केलेली ईच्छा पूर्ण होते, अशी माहिती समजली. खरं-खोटं माहीत नाही. पण, श्रध्दाळूंची उपस्थिती या वृक्षाखालून हटेनाच. क्षणात त्या डेरेदार वृक्षाला आपल्याकडील वटवृक्षाचे श्रध्दास्थान प्राप्त झाले. त्याच्याखाली अनेक ईच्छा व्यक्त होवू लागल्या. त्याच्या कोणत्या कानांनी त्याने किती ऐकले की नाही हे माहीत नाही. मुळात मराठीतील ईच्छा त्याला समजल्या असतील का? हा प्रश्न उगीचच माझ्या मनात डोकावला. तशी मी ही एक 'सर्वात मोठी'  ईच्छा मनातून त्याच्याखाली व्यक्त केली.(😉😜 पाहू पूर्ण होतेय का..😝अजूनतरी झालेली नाही..) त्याच्या छबी मोबाईलमध्ये कैद करत बाजारपेठेत वळालो.
         शाल, गरम टोप्या, गरम जॕकेट असे काही-बाही खरेदी थांबल्यानंतर रिकाम्या उदराने भरणाची सूचना केल्याने आम्ही पर्यटक हाॕटेलकडे माघारी परतलो.
         पहाटे भास्कराच्या दर्शनाची आगाऊ सूचना तावदानाच्या फटीतून आतमध्ये प्रवेशलेल्या रश्मीने सर्वप्रथम दिली. तसे प्रथम पडदे बाजूला सारत आणि गॕलरी उघडत सूर्याबाचे दर्शन घेतले. स्वच्छ, नितळ आकाशातील त्याचे अस्तित्व, सौंदर्य क्षणा क्षणाला खुलवत होते.
       आवरुन नाश्ता घेतला आणि टपोऱ्या, लालभडक गुच्छेदार गुलाबांच्या सोबतीने आम्ही सर्वजण कितीतरी वेळ छबी टिपण्यात गुंतलो होतो. त्यानंतर सर्वजण आपापली जागा मिळवत स्थानापन्न झाले. 'गणपती बाप्पाच्या मोर्या'ने गाडी सोनमर्गकडे निघाली.
          श्रीनगरमधून वळणे घेत गाडी सोनमर्गकडे धावू लागली. रस्त्याच्या कडेला आक्रोड, चिनार ची झाडे दिसू लागली. काही ठिकाणी सफरचंदाची बाग दिसत होती. सध्या सफरचंदाचा हंगाम नसल्याने त्यावर फळधारणा दिसत नव्हती.
      श्रीनगरपासून १५-२० किमी अंतरावर आल्यावर गंदेरबल जिल्ह्यात प्रवेश झाल्याचे काही फलकांवरुन दिसले. विशेषतः शासनाचा 'सखी वन स्टाॕप सेंटर' चा फलक दिसला. खळाळणाऱ्या वाहत्या नदीवरील पुलावरुन आम्ही पुढे मार्गस्थ झालो.
      उंच वनराईच्या गर्द हिरव्यागार पोशाखावर पांढऱ्या शुभ्र बर्फाचा स्कार्फ गुंडाळून दोन्ही बाजूला उभे ठाकलेल्या पर्वतांचा नजारा 'रोजा' मधील 'ए हँसी वादीयाँ..' ची प्रकर्षाने आठवण करुन देत होता. पहाडावरील चित्ताकर्षक सुंदर सुंदर दृश्याने आम्ही खरोखरच स्तिमित होत होतो. हा नजारा नदीकाठी बंदिस्त करण्यासाठी आम्ही वाहन चालक अंकीतभैय्याला गाडी थांबवण्यास सांगितले. तसा तो, 'इससे भी बढिया जगह आगे है.. वहाँ रुकेंगे और चाय-पानी भी करेंगे..' असे म्हणाला. थोड्या अंतरावर नदी किनाऱ्याशी समांतर असणाऱ्या रस्त्यावरील हाॕटेल दुकानांच्या रांगेसमोर त्यांने गाडी थांबवली. रस्त्याच्या त्या बाजूला खळाळणाऱ्या नदीकडे पाहून, ए सिंध नदी है.. यहाँ फोटो खिंच लो..' असे म्हणाला.
          राष्ट्रगीतात उच्चारत असलेली नदी आणि 'हिंदू की सिंधू संस्कृती' हा नेहमी वाद-विवादाचा विषय ठरलेल्या सिंधू नदीच्या काठावर आम्ही सर्वजण उभे होतो. पुढे सरसावत थेट नदी पात्रातील दगड-गोट्यांवर फोटोसाठी आलो.
       काही ठिकाणी दुधाळ पाण्याची गुळणी टाकत तर, हिरवट-पोपटी रंगाचे दर्शन घडवत ती खळाळत वाहात होती. आकाश, बाजूच्या पर्वत नजारा याच्या प्रतिबिंबाशी स्पर्धा करत तर, काही ठिकाणी पुसून टाकत थंडगार पाणी उसळून पुढे प्रवाहीत होत होते.
       Indus rever वरुन पुढे India हे प्रदेशाला-देशाला मिळालेले नाव. सिंधू नदी काठचा सिंध प्रांत! पुढे या काठी राहणारी, वाढणारी सिंधू संस्कृती..पुढे हिंदू बनली. आशिया खंडातील ही लांब आणि एक प्रमुख नदी आहे. तिबेटमधील मानसरोवरजवळ उगम पावते. चिन, भारत आणि पुढे पाकिस्तानात वाहते. झेलम, चिनाब, रावी, व्यास, सतलज या नद्या हिच्या उपनद्या आहेत. मनसोक्त फोटोसेशननंतर पुढे सोनमर्गकडे निघालो. 
      '..हिंदा देश के निवासी. सभीजन एक है..रंग रुप वेश भाषा चाहे अनेक है..' हे लहानपणी ऐकलेले गीत आता मनात गुंजत होते.
        -प्रशांत सातपुते
          9403464101 
          p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..