आईचा खजिना..!
हल्ली बऱ्याचवेळा सुट्टीला गावी म्हणजेच आईकडे जाणं होतंय. आईला भरपूर आनंद होतो. अगदी, मी वाटेत प्रवासात असतानाच, 'निघालास का? थेट घरी जेवायला ये..बाहेर मित्रांकडे थांबू नकोस..' अशी तिची सूचना ठरलेली असते. मी ही आपला सरळ घरीच पोहोचतो. ती माझ्यासाठी जेवायची थांबलेली असतेच. मी फ्रेश होईपर्यंत ती जेवण गरम करुन ताट वाढून पुढ्यात ठेवते.
माझ्या सगळ्या आवडी निवडी अजूनही ती काल सांगितल्याप्रमाणे जपत असते. सकाळी नाश्त्याला कधी ताक-कण्या करते, तर कधी दही धपाटे, तर कधी चोंगे ! दुपारच्या जेवणातही अंबील वा ताक, भाजी-भाकरी सायंकाळी मात्र, बढाखान्यात कधी खेकडे, मासे, तर कधी चिकन ! माझी तर दोन दिवस चंगळच असते. तिलाही हे सर्व या वयात करुन मला खाऊ घालताना मोठं समाधान मिळते. किंबहुना तिची हीच ऊर्जा असावी असे मला जाणवले.
मला कळू लागल्यापासून जुन्या घरात एक काळसर पत्र्याची ट्रंक होती. कालौघात तीचे अस्तित्व गायब झाल्यानंतर नव्या घरात तिच्या जागी लाल ट्रंक भिंतीतल्या कपाटात स्थानापन्न झाली. त्यावेळी मी आठवी-नववीला असेन.
घरी खायचे बहुधा वांदे असतानाही ही ट्रंक आणि तिला कुलूपही असायचे. त्यामुळे आतमध्ये मौल्यवान वस्तू असाव्यात असे सुरुवातीला कधितरी वाटायचे.
वर्षातून मोहरमच्या दिवसात ही ट्रंक हक्कानं उघडली जायची. आतमधील वस्तू पहायला मी नेहमी उत्सुक असायचो. मग आईच मला चावी देत ट्रंकेतून चोंग्याचा दगडी पाट काढायला लावत असे. त्यावेळी आतला एकदा तिचा आणि अण्णांचा "खजिना" पाहून घेतला.
अण्णांनी कोल्हापुरातून आणलेले काचेचे चार बाऊल होते. एक लोखंडी करवतीचे पाते, चाकू-सुरी तसेच विळीला धार लावण्यासाठी एक काणस, ढेकणांच्या पाऊलखुणांची जाणीव करुन देणारे काही कृष्ण-धवल जुने फोटो, अक्काच्या लग्नाचा एक रंगीत फोटो अल्बम, तिच्याच लग्नातील यादीचे कागद, एका फाटलेल्या फाईलीत काही जुने-पुराणे घड्या पडलेले कागद, त्यातच शाळेतील दरवर्षीची आमची उत्तीर्ण ठरलेली गुणपत्रके, कुणा-कुणाच्या कार्यक्रमात आहेरात आलेले दोन-चार टाॕवेल-टोपी-खण, एका डब्यात घड्या घालून
सगळ्यांच्या जन्म कुंडल्या ठेवलेल्या. त्यावर धनंजय वाठारकर असा गडद निळा शिक्का मारलेला. त्याचबरोबर काही मोती, विणलेले लोकरीचे, दोऱ्याचे नक्षीदार रूमाल. रक्तचंदनाची एक बाहुली, फोटोंचे निगेटीव्हज, ताईच्या लग्नासाठी कर्ज काढताना काढलेले परंतु, बचत नसलेले भरत को आॕप बँकेचे पासबुक, माईच्या जमा होणाऱ्या स्काॕलरशीपसाठी काढलेले सांगली बॅंकेचे पासबुक आणि अण्णांच्या माघारी जमेल तशी थोडीफार बचत करणारे युनियन बँकेचे, अशी जुनी पासबुके.
आईच्या आईला आम्ही सगळे "कामाची आई" म्हणत आसू. ही सदैव कामात आसायची. म्हणून तिला ते नाव कसे आणि कुणी पाडलेले माहीत नाही. ती मला, कधी आईला पैसे द्यायची. ते साठवण्यासाठी तिनेच दिलेली एक तीनचार कप्प्याची कमरेची कापडी पिशवी म्हणजेच चंची. त्यात आई कोणालाही कळू नये म्हणून रविवारी पगार मिळाला की थोडे पैसे लपवून ठेवायची.
हा आईचा "राखीव, आपत्कालीन निधी" असायचा. याच निधीतून घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी पाहूणचार, कधी शाळेसाठी, थोडक्यात अचानक लागणाऱ्या गरजेसाठी खर्च व्हायचा.
एकदा हा राखीव निधी आण्णांच्या हाती लागला. तसे आईने ती चंचीच वापरायला ट्रंकेतून बाहेर काढली. असं काय-बाय सगळं भरलेलं. या वस्तू विशेषतः कपड्यांना कसर लागून खराब होवू नयेत म्हणून पांढऱ्या डांबर गोळ्या ट्रंकेत जागोजागी ठेवलेल्या होत्या त्याचा एक विशिष्ट वास यायचा.
या वस्तू गहाळ होवू नयेत, आमचे 'इदरकल्याणी' हात लागून तुटू-फुटू नयेत, यासाठी त्या अगदी सुरक्षित आणि बंदिस्त ठेवलेल्या होत्या. गरजेनुसार त्या ट्रंकेतून बाहेर येत आणि पुन्हा ट्रंकेत दास्तानी लागत. गल्लीत कुणाचा हात-पाय मुरगळा तर त्यावर लेप लावण्यासाठी 'रक्तचंदनाची बाहुली बाहेर पडायची. लाकडात कोरलेली ही लाल बाहुली उगाळून लेप बनवताना मला "सिंहासन बत्तीशीमधील" बाहुलीगत वाटायची. ही बाहुली गरजेनुसार अगदी गल्लीभर फिरायची.
कुणाच्या कार्यक्रमात, दिवाळीत वा विवाह सोहळ्यात ताटातील फराळाचे पदार्थ लोकरीचे, दोऱ्याचे विणलेले रुमाल दिमाखात अंगावर घेवून काही काळ पहुडलेले असत.
कधीतरी सगळे सणावाराला एकत्र आल्यावर आपसूक जुने फोटो, अल्बम निघत. 'आपण केवढे लहान होतो,' असे म्हणत आपलीच छबी पाहताना आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायला मिळायचा.
काही कापायचे असले तर करवतीचे पाते बाहेर निघायचे आणि काम झाले की ते पुन्हा गडप व्हायचे.
पैशाची नड असली की, पासबुके बाहेर निघायचीत. फारसं काही हाताला लागायचं नाही. उलट, ताईच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यावर काळजीचेच सूर उमटायचे. मग ही काळजी पुन्हा मार्च महिन्यातच कडकडून डोकावायची. तोपर्यंत बासबुक आत आणि बँकेच्या नोटीसा बाहेर, असं काहीसं चाललेलं आसायचं.
मी एन सी सी च्या शिबिराला जाताना ही ट्रंक घेवून जायचो त्यावेळी हा खजिना दहा दिवस धान्याच्या पोत्यात गपगुमान बसून रहायचा. शिबिरातून परतलो की, पोत्यात गुदमरणाऱ्या खजिन्यासाठी मूषकरावाने हवाई खिडकी खोललेली दिसायची. शिवाय, कुठे-कुठे तरी आपले नक्षीकाम दाखवून देई. पुन्हा सर्व खजिना डांबर गोळ्यांच्या आणि एकमेकांच्या संगतीत मोठ्या थाटात ट्रंकेत बसकन मांडी.
काळ बदलत गेला. घरं बदलत गेली. नवीन झालीत. पण, माझं बालपणीचं जुनं घर आजही आहे तसंच ठेवलंय. त्या ही घरी तिजोरी आली. पण, आईचा खजिना सांभाळून ठेवणारी ट्रंक मात्र, जागच्या जागी अजूनही आहे. एकेकाळी ट्रंकेत सहीसलामत असणाऱ्या वस्तू आज नाहीत. त्यामुळे तिला कुलूपही नाही. चोंगे करताना लागणारा दगडी पाटही अगदी वर बाहेरच मोकळा श्वास घेतोय. त्यावरच आईने केलेल्या चोंग्यांवर मी वरुन खोबरे अन् खसखस पेरली. त्याला देखील आता तुटण्याची-फूटण्याची मुळी भीतीच राहिली नाही. कारण, "ते" इदरकल्याणी हात आपापल्या धावपळीच्या जीवनातच गुरफुटून गेलेत..! अगदी काढतो म्हटलं तरी, सवड न मिळण्याइतपत..!
-प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4508258895886300&id=100001067020937
प्रशांत......नमस्कार.
ReplyDeleteखूप छान हं.आगदी जीवंत केलसं बालपण. आईच्या पेटीतील वस्तू म्हणजे आपल्या जीवनातील 'अक्षय' ठेवा.तिचं प्रेम,माया,जीव लावणं जीवनाचं संचित.अशा आठवणीत रमणं,जगणं आता खूपचं दुर्मिळ. तरी पण आत्तराची आठवण कुपी आमच्यासाठी उघडलीसं आणि बलपण जाग केलसं.धन्यवाद.