गोटी सोडा..एक आठवण!
सायकलचे हँडल पकडून पॕडेल मारत सायकलच्याच दोन चाकांच्या सहाय्याने मागील लाकडी हौद्यात हिरव्या-शेवाळलेल्या डब घातलेल्या बाटल्या घेवून चौका-चौकातील दुकानांपर्यंत पोहचवणारा सोडेवाला संजू (आता आडनाव लक्षात नाही) त्यावेळी पहायला मिळायचा. या डब घातलेल्या बाटल्या म्हणजे "गोटी सोडा" असायचा. या बाटल्यातील 'माने'त विशिष्ट खोबणीची जागा खास गोटी बसण्यासाठी केलेली असायची. ही काचेची गोटी आतमध्ये कशी घालत असत? हा प्रश्न खूपवेळा मला पडायचा. सोड्याने भरलेल्या बाटलीचे तोंड आपसूकपणे ही गोटी बंद ठेवायची. सोडेवाला तिला प्रेशर करुन खाली ढकलताच प्रथम बाहेर येणारा सोडा 'मी येतोय रे..' हा संकेत देणारा आवाज काढायचा.
त्यानंतर विशिष्ट किणकिणणारा आवाज काढत गुपचूपपणे ही गोटी आपल्या खोबणीवजा गुहेत समाधीस्त होई. अन् बुडबुडे निर्माण करत फेसाळणारा सोडा मोठाल्या काचेच्या पेल्यात उतरत असे. पिणाऱ्याच्या पोटात शिरुन गडप होतानाच, पुन्हा उसळी घेत तृप्तीची ढेकर बाहेर काढी.
सुरुवातीला अपचन, गॕससारख्या पोटाच्या तक्रारींवर सुरु झालेली सोड्याची औषधी सवय म्हणा अगर प्रवास पुढे उन्हाळ्यात थंडाव्यासाठी आणि ऊर्जेसाठी लिंबू सोडा, भरपेट जेवणानंतर पचनासाठी जलजीरा इथपर्यंत पोहचला.
महाविद्यालयीन काळात मी, संजय जिरगे आणि कधी-कधी गुरुदास खास गोटी सोडा विशेषतः जलजीरा पिण्यास भजी चौपाटी चौकातील "इंपिरियल सोडा" मध्ये येत असू. हा असा सोडा पिणे त्यावेळी लईच भारी वाटायचं. पुढे प्लास्टिक बाटलीबंद विविध कंपन्यांचा सोडा बाजारात आला. तसा हा गोटी सोडा गायब झाला. त्याला गायब व्हायला आणखी एक कारण म्हणजे दोन गटातील भांडणात सर्रास या सोडा बाटल्यांचा वापर होत असे. काळाच्या ओघात गायब झालेला गोटी सोडा तसा विस्मृतीत गेला. कित्येकदा विविध कंपन्यांचा प्लास्टिक बाटलीतला सोडा पिला. पण, त्यावेळीही विस्मृतीत हरवलेला 'गोटी सोडा' कधी आठवला नाही. अगदी इतका खोल गर्तेत गेलेला.
काल गगनबावड्यात अचानकपणे समोर गोटी सोड्याचा गाडा दिसला आणि हरवलेली वस्तू सापडून आनंद व्हावा, एखाद्या चुंबकीय शक्तीने खेचून घ्यावे, तशी गाडी त्याबाजूला वळवून थांबलो. सहकारी अधिकारी मित्र दीपक घाटे यांच्यासोबत "जलजीरा" घेतला. सोबत त्याच्याविषयीची चर्चा करतच आम्ही पुढे निघालो. गोटी सोड्याच्या चर्चेत करुळ "घाट" कधीच उतरला होता. आठवणींचा "थाट" मात्र, तसाच उसळत होता. अगदी महाविद्यालयीन काळात पोहचवून..!
-प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4508258895886300&id=100001067020937*
Comments
Post a Comment