"इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं" हे माईंचं वाक्य सर्वांचे मोबाईल "स्टेटस" पाहून आज प्रकर्षाने आठवलं..!

"इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं" हे माईंचं वाक्य सर्वांचे मोबाईल "स्टेटस" पाहून आज प्रकर्षाने आठवलं..!
     जयसिंगपुरात बुध्दविहारात झालेल्या धम्मपरिषदेला एकदा माई आल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे त्यावेळी प्रमुख पाहुणे होते. माईंचा त्यावेळी सत्कार करण्यात आला होता. निटस् आता आठवत नाही, कोणत्यातरी प्रश्नावर माई मुख्यमंत्र्यांना  निवेदन देवून आपली आग्रही भूमिका व्यासपिठावर त्यांच्याशी चर्चा करताना मांडत होत्या.
      लक्ष्मीकांत ऊर्फ बंडा मिणीयार यांनी दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंचच्या माध्यमातून जयसिंगपुरात माईंना "समाजभूषण" पुरस्कार दिला होता. यावेळी कादंबरीकार बाबा कदम, मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील, मधू आपटे हे देखील व्यासपिठावर  पुरस्काराचे मानकरी होते. या सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी उमळवाड येथे माईंचा कार्यक्रम ठेवला होता.  माईंनी सोसलेल्या वेदना, व्यतीत केलेले प्रसंग, अनुभवरुपी शब्दाने समोरील उपस्थितीतांची मने हेलावून सोडली होती. प्रत्येकजण हेलावून गेला होता. त्याची स्पष्ट अनुभूती त्यांच्या चेहऱ्यावर विशेषतः गळती लागलेल्या डोळ्यांवरुन दिसत होते. अनाथांच्या मदतीसाठी पसरलेल्या माईंच्या पदरात उपस्थितीतांचे अनेक हात यावेळी रिते होत होते. या कार्यक्रमाला मी सौभाग्यवतीसह उपस्थित होतो. पत्रकारमित्र अजय जाधवही सोबत होता. विशेष म्हणजे यावेळी माईंसोबत पंक्तीचा लाभ घेताना आम्हा तिघांनाही खूप विषयांवर छान बोलता आलं.
      आपल्याला स्वतःचे मूल काहीवेळेला जड होते. अशी अनेक उदाहरणे आपण अवती-भोवती पाहतोय. पण, माई या अनाथांची माय बनली. ज्या नवऱ्यांने त्रास दिला, त्याचाही शेवटच्या क्षणाला मूल म्हणूनच माईने सांभाळ केला. माई आपल्या ओघवत्या वाणीने, सुभाषिताने, संत वचन, ओवीने उपस्थितीतांना भारावून सोडत, वात्सल्य, करुणाप्रती हेलावून सोडत. जिवंत असताना कर्नाटक शासनाने प्रथम माईंविषयी धडा पाठ्यपुस्तकात घेतल्याचे सांगून, "इथं मोठं व्हायचं असेल, तर मरावं लागते बाबा त्यासाठी..!" हे माई बोलून दाखवत.
       आज सर्वांचे मोबाईल स्टेटस पाहून पुन्हा एकदा माईंच्या उद्गागाराचा प्रतिध्वनी ऐकू आला.  शिवाय "जनमानसांच्या मनात स्थान निर्माण करायला लोकप्रतिनिधी व्हायची आवश्यकता नाही. जनसेवा हेच त्याला सणसणीत उत्तर आहे." हेही या स्टेटसने दाखवून दिलय.
    महाराष्ट्राच्या मदर तेरेसा असणाऱ्या माईंना विनम्र आदरांजली..!
💐💐🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..