प्रवाशी पक्षी अन् वृक्ष
काश्मिर सफर भाग -१६
माता वैष्णोदेवीच्या यात्रेनंतर खऱ्या अर्थाने कश्मिर सफर संपले असले तरी, या पर्यटनात इथे भेटलेले प्राणी, पक्षी, वृक्षसंपदा यावर हा शेवटचा भाग आवर्जून लिहीत आहे. त्यांच्या उल्लेखाशिवाय ही सफर पूर्ण होणार नाही.
इंदोर ते जम्मू रेल्वे प्रवासात हिंदी चित्रपटातून नेहमीच पाहिलेली पिवळी जर्द 'सरसों की खेती' असावी असे वाटत होते. परंतु, ती सूर्यफुलाची शेती पाठीमागे धावत होती. जम्मू येथे सुरुवातीलाच काली माता मंदिर परिसरात वानरसेनेने सलामी देत आमचे स्वागत केले होते. अगदी वाहनाच्या टपावरील प्लास्टिक कागद उचकटून! कुठेही पर्यटनाला जा, तेथे हे आपले वंशज आपल्या स्वागताला दत्त असतातच. हा अनुभव नवा नाही.
पर्वत शृंखलेत उंच सरळ रेषेत वाढलेला देवदार हा तेथील काॕमन वृक्ष आढळतो. त्यापासून बॕट बनवली जाते. शिवाय डेरेदार पसरलेला चिनार हा देखील नित्याचाच बनलेला. फर, पाईन ही वृक्षसंपदाही सोबतीला ठरलेली आहे. सफरचंदाची शेती ही तेथील प्रमुख उत्पन्न देणारी शेती आहे. झाडावर लगडलेली लाल सफरचंद पहायचा खरा हंगाम सप्टेंबर-आॕक्टोबर चा असतो. सफरचंदाच्या या बागेत फोटो घेण्यासाठी शेतकरी १०-२० रुपये शुक आकारतो. केशराच्या प्रत्येक फुलातील पुंकेसर म्हणजेच केशर होय. या महागड्या केशरने मोठा रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.
इमारतीच्या प्रांगणात वा अन्य रस्त्यांकडेला विविध रंगाचे कश्मिरी गुलाब हे आणखी एक इथलं वैशिष्ट्यं आहे. दल सरोवराच्या भोवतीने हे पांढरट, पिवळसर, गुलाबी टपोऱ्या गुलाबांचे ताटवेच्या ताटवे दिसतात.
शंकराचार्यांच्या मंदिराकडे जाताना अशाच गुलाबातील मकरंद गोळा करताना मधमाशी दिसली. पुढे ती मुघल गार्डनमधील टुलीपवर्गीय फुलातील मकरंद घेतानाही आढळली.
"ज्यावेळी मधमाशी या जगातून संपेल त्यानंतर अवघ्या चार वर्षानंतर मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल." असे अल्बर्ट आइनस्टीन म्हणतो. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श हा परिस स्पर्शापेक्षा कमी नसतो. फल धारणेसाठी पर परागीकरणात महत्वाची भूमिका पार पाडत असते.
हे मंदिर उतरुन येताना जापनीज टीट हा पक्षी दिसला. डोके, गळा आणि छाती पूर्ण काळा तर, चेहऱ्याच्या दोन्ही बाजू पांढऱ्या शुभ्र होत्या. पंख, शेपूट अणि पाठीकडील भाग राखाडी तर, पोटाकडील भाग पांढरट होता. मानेभोवती काळी कडा होती.
शासनाच्या फूलशेती विभागाच्या नेहरु स्मारक वनस्पती बागेच्या दारातच गरुड फांदीवर बसलेला. शिकाऱ्यातून दल सरोवराचा फेरफटका मारतानाही घार आणि गरुड पहायला मिळालीत. अगदी तेथील पाणकोंबडींच्या पिलांवर नजर ठेवून असलेले.
दल सरोवर हे पक्षांची मेजवानी ठरलेले. ध्यानस्तपणाचे सोंग घेतलेले गायबगळे इथेही दिसले. बदक आणि पाण कोंबड्या आपल्या पिलांसह विहारताना अन्न साखळीतील टपलेल्या घारी आकाशात घरघरत होत्या. तर, हाऊसबोटीत आपल्या हालचालीने जागे करणारी बर्न स्वालो अर्थात निळी, जांभळी, तपकीरी, काळसर, राखाडी, पांढरट छटेची अणि शेपटीला दोन तारा असणारी पाकोळी भेटली. उगीचच इकडून तिकडे पाण्यावर भिरभिरत होती. सूर्योदयात ती अधिक चमकदार दिसत होती.
सिंधू नदीच्या काठावर चहा-पानसाठी थांबल्यावर जंगली मैना अर्थात साळुंखी बिनधास्तपणे जवळून कॕटवाॕक करत होती. कोवळ्या आक्रोडाची झाडे तर, हाॕटेलभोवतीच पहायला मिळालीत.
पश्मिना बकरा गुणी 'सलमान' सोबत फोटोसेशनसाठी आम्ही पर्यटक पैसे देत उत्सुकलेलो. कटरा येथे माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाताना पुन्हा वानरसेना होतीच. शिवाय ती बिनधास्तपणे यात्रेकरूंजवळ वावरत होती.
या ठिकाणी हरीण आणि जंगलात राहणारा हिमालयीन कालीज तितर दिसला. तकतकीत निळसर-काळा पिसारा असलेला, डोक्यावर तुरा, डोळ्याभोवती लाल रंग, पोट अणि छातीकडे पांढरट राखाडी पिसांचा देखणा तितर प्रथमच कितीतरी वेळ पहात होतो.
कटराहून इंदोरकडे परतीच्या प्रवासात विशेष करुन पंजाबमधून जाताना विशिष्ट झाडांची शेती केल्याचे दिसले. काही ठिकाणी मध्यम वाढीची ही झाडे पाहून ती पेरुची असावीत असे सुरुवातीला वाटले. पण, ती सरळ उंच वाढलेली झाडे पाहून पेरुची बाग नसून, सागाची असावी, असे वाटले. त्याविषयी इतर सहप्रवाशांना खास करुन सरादारजींना विचारले असता, ती सफेदाची शेती असल्याचे म्हणाले. आपल्याकडे जशी सागवान शेती करतात, तशीच ही सफेदाची फायदेशीर शेती असल्याची माहिती मिळाली. शिवाय तेथील रोप वाटिकेमधून सर्वत्र रोपे पाठवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. फर्निचरसाठी याचा मोठा वापर होतो.
एकूण या पर्यटनातील हे 'सांगाती' ज्ञानात नवी भर घालून तर गेलेच, अन् आठवणीच्या पटलावर स्मृती कायम कोरुन राहिल्या त्या वेगळ्या.!
(समाप्त)
- प्रशांत सातपुते
9403464101
p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000
#गुलमर्ग #gulmargkashmir #बेताबव्हॕली #पहेलगाम
#कटरा #वैष्णोदेवी #काश्मीरपर्यटन
Comments
Post a Comment