माता वैष्णोदेवी

                   काश्मिर सफर भाग - १५
          
         काश्मिर सफरमधील शेवटचा टप्पा म्हणजे माता वैष्णोदेवीचे दर्शन होते. कटराला जाण्यासाठी पहेलगामहून निघालो खरा. परंतु, वाहतुकीच्या प्रचंड कोंडीत सापडत होतो. काही वेळाने वाहतूक सुरु झाली. तसे, वाहन दामटतच चालक नेत होता. बनियाल काझीगुंड या साडेआठ किमीच्या जवाहर भोगद्यात बराच वेळ थांबावे लागले. अखेर बोगद्यातून बाहेर पडलो.
         काही दिवसानंतर सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेची व्यवस्था प्रशासन जागोजागी करत असल्याचे दिसत होते. यात्रेकरूंसाठी राहण्याची, जेवणाच्या लंगरची आणि स्वच्छतागृहांची सोय उभारली जात होती. काही ठिकाणी उभारली होती. चार पदरी, सहा पदरी रस्ते असूनही काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने आणि एकूणच मोठ्या वाहतुकीमुळे ही कोंडी सातत्याने होत होती.
       अशा कोंडीतून जामेल तशी वाट मिळवत रात्री उशिरा थंडीत एकदाचे कटरामधील हाॕटेलवर पोहचलो. सकाळी पहाटे उन्हाच्या आधी माता वैष्णोदेवीसाठी चालायला सुरुवात करण्याचे ठरले होते. परंतु, रात्री उशीर झाल्याने सोयीने निघण्याचा बेत केला.
         सकाळी अर्थातच उशिरा उठून सर्वप्रथम आधार कार्डद्वारे नोंदणी करुन पर्ची अर्थात यात्रेस प्रारंभ करण्यासाठी आवश्यक कार्ड घेतले. येथेच एका मुलाने डोक्याला जय माता दी ची रिबन बांधली. हे सगळे करेपर्यंत दुपारचे १२ वाजले. कडक उन्हातच चालायला सुरुवात केली. जेथेपर्यंत शक्य आहे, तेवढे चालू आणि माघारी परतू. असा सुरुवातीला आमच्या दोघांचा सूर  होता.
        पहिल्या प्रवेशद्वारावर रितसर सुरक्षा तपासणी झाल्यानंतर खरा चढणीचा कस सुरु झाला. माता वैष्णोदेवीच्या जयघोषात जथ्थेच्या जथ्थे चालत जात होते. काहीजण घोड्यावरून तर, काहीजण पालखी करुन जात होते. मार्गाच्या दोन्ही बाजूला विविध वस्तूंची दुकाने होती. मध्ये-मध्ये फोटो स्टुडीओ होते. त्यामध्ये देवीच्या गाभाऱ्यातील प्रतिकृती खास फोटोसाठी निर्माण केली होती.
        हातात काठी घेवून ज्येष्ठांच्या बरोबर इतरही मंडळी होती. काठी विक्रीसाठीही ठेवलेली होती. परतीच्यावेळी काही रक्कम कमी करुन, ही काठी दुकानदार पुन्हा विक्रीस ठेवत होते. जागोजागी थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय होती. मधूनच एखादे हेलिकाॕप्टर यात्रेकरूंना घेवून वर जात होते. चालत जाणाऱ्या यात्रेकरुंना उन्हाचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेत पत्र्याचा निवारा केलेला होता.
        अंतर कमी करण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्यांची चढण आहे. ही चढण तशी खतरनाक आहे. आम्ही तिचा वापर केला. दमछाक झाल्यावर विश्रांती घेत, थंड सरबताने ताजेतवाने होत, पुन्हा नव्या दमाने चालत होतो. बॕटरीवरील वाहनांची देखील काही अंतरापर्यंत सोय करण्यात आलेली आहे. परंतु, या निमित्ताने पायीच जाण्याचा आमच्या दोघांचा निर्धार होता. वरुन खाली बघताना कटरा हे गाव अगदी छोटे दिसत होते. रेल्वे स्टेशन तर खेळण्यातले भासत होते.
        सुरुवातीला जमेल तेथेपर्यंत जायचे आणि माघारी परतायचे हा सूर सपशेल गळून पडला. त्याला कारणही तसेच होते. कुबड्या घेवून जाणारे, ८० -८५ वयाचे भक्त, छोट्या बाळ-गोपाळांना खांद्यावर बसवून जाणारे बाबा हे सर्व पाहिल्यावर हा ट्रेक पूर्ण करायचाच, तोही संपूर्णपणे चालत हा निर्धार दृढ बनला. अगदी लहानबाळांसाठी बाबा गाडीची सोय देखील येथे आहे.
      जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये एक-दोघे दंडवत घालत येत होते. ढोल, ताशांच्या साक्षीने माता वैष्णोदेवीच्या जय घोषात वातावरण भारुन गेलेले. आम्हीही त्यातच सामील होवून गेलो होतो.
          सायंकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास लाॕकरजवळ आलो. येथे मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी मोफत लाॕकरची सोय आहे. मातेच्या दर्शनासाठी गाभाऱ्याजवळ पोहचलो. भाविकांची मोठी संख्या असूनही शिस्तबद्ध रांग पुढे सरकत होती. गुहेमध्ये अत्यंत गार पाणी वाहत होते. वाराही तितकाच थंडगार होता. शिणलेल्या देहाचा शिण हा गारवा घालवत होता. गुहेतील एका कोपऱ्यात मातेचा गाभारा होता. त्याची माहिती अवघ्या क्षणात देवून पुजारी दर्शन घ्यायला लावत होता. मनोभावे दर्शन घेवून बाहेर आलो. दिवसभराची यात्रा सफल झाल्याचा वेगळा आनंद यावेळी सोबत होता.
          १२ किमीची इतकी कठीण चढाई करत पायी येणाऱ्या वयोवृद्ध भक्तांना ऊर्जा कोठून आणि कशी मिळत असावी, हा प्रश्न मनोमन वाटून गेला. येथून पुढे भैरवनाथाकडे जाण्यासाठी रोप वे, घोडा याची सोय देखील आहे. परिसरातील इतर मंदिरे पाहून प्रसाद घेत तेथून पुन्हा उतरायला सुरुवात केली. खरंतर उतरताना फार त्रास होणार नाही, हा अनुमान फोल ठरला. उतरताना पाय जाम दुखत असल्याचे जाणवले. खाली बसतानाही त्रास जाणवत होता. पण, पुन्हा यात्रेकरूंच्या सोबत, जयघोषात, बसत उठत, चहा घेत बरेच अंतर कापले होते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अन्य धार्मिक स्थळांवर दिसणारे भिकारी दिवसभरात एकही दिसलेला नव्हता.
     जसजसे उतरु तसे मार्गावरील दुकानांमध्ये काही वस्तू घेण्यासाठी रेंगाळत होतो. त्यातच जागोजागी मसाज खुर्च्या विशेषतः पायासाठी ठेवलेल्या. वरुन उतरणारे ग्राहक शोधून दुकानदार त्यांना बोलावून आॕफर देत होते. आम्ही दोघांनीही त्याचा लाभ घेतला.
        काही खरेदी नंतर सकाळी मिळवलेली पर्ची-कार्ड बाहेर पडताना जमा करुन आम्ही हाॕटेलकडे निघालो. सकाळी पर्ची घेताना डोक्याला बांधलेली पट्टी इथल्या जाळीदार भिंतीवर भाविकांनी मोठ्या संख्येने अडकवलेल्या होत्या.
      दमलेल्या पायांनी एकेक पावले टाकत अखेर रात्री ११ वाजता हाॕटेलवर पोहचलो. तेही तब्बल २४ किमी अंतराचा खडा ट्रेक करुनच..
        - प्रशांत सातपुते
9403464101 
          p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000
#गुलमर्ग #gulmargkashmir #बेताबव्हॕली #पहेलगाम

#कटरा #वैष्णोदेवी #काश्मीरपर्यटन

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..