'बेताब' पहेलगाम

काश्मिर सफर भाग - १४
      
   पहेलगाममध्ये पोहचलो तेव्हा रात्र झाली होती. शिवाय दिवसभर घोड्यावरची रपेट अन् बर्फातील खेळण्यामुळे आता विश्रांतीची तशी खरी आवश्यकता होती.
        सकाळी पहाटेच जाग आली. तसे सर्वजण आवरुन आम्ही हाॕटेलच्या प्रांगणात आलो. मस्त हिरवळ, भोवताली आक्रोडची झाडे आणि दूरवर हिमनग डोक्यावर घेवून उभे पर्वत! अशी ही सकाळ होती. याठिकाणी जो-तो आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची छबी टिपण्यात गुंतला होता. 
       या ठिकाणाहून पहेलगाममधील काही निवडक पाॕईंट फिरण्यासाठी स्थानिक वाहन भाड्याने करावे लागते. त्यासाठी टूर मॕनेजर वैशाली परदेसी या वाहन ठरवत होत्या. तोपर्यंत नाश्ता आणि फोटोसेशनमध्ये अद्यापही बरेचजण व्यस्त होते.
         एकदाचे वाहन ठरले तसे आम्ही पर्यटनाला बाहेर पडलो. 
'गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्तो’ अर्थात जर धरतीवर कोठे स्वर्ग आहे, तर तो स्वर्ग येथे आहे, येथे आहे, येथे आहे, केवळ येथेच आहे. हे, पहेलगामसाठी लागू ठरते. 
        पर्वताच्या डोक्यावरील बर्फ वितळून त्याचे छोट्या ओहोळात रुपांतर होते आणि पुढे त्याची नदी निर्माण होते. लीडर आणि शेषनाग या पहेलगाममधील दोन नद्या अशाच निर्माण झाल्या आहेत. चित्रपटांच्या चित्रिकरणाचे महत्त्वाचे ठिकाण म्हणूनही पहेलगामची ओळख आहे. वाटेतच जाताना अरु व्हॕलीचे दर्शन घेत, चंदनवाडी येथे आम्ही पोहचलो. 
        समोरच भला मोठा बर्फाचा खाली घसरुन विस्तार झालेला दिसत होता. काही अंतर चालून पुढे गेल्यानंतर अख्खी बर्फाची जमीनच पहायला मिळाली, अगदी दूरवर पसरलेली. रस्त्याच्या बाजूला बर्फाची भिंत बनलेली. तिला हटवण्याचे काम बुलडोझरच्या मदतीने होत होतं. बर्फाचे गोळे एकमेकांना मारतच आम्ही सर्वजण बर्फात शिरलो. मस्त फोटोसेशन सुरु केलं. तसे पश्मिना बकरी, कबुतरं घेवून स्थानिक मुलं पर्यटकांजवळ येत होती. अगदी २०-५०-१०० रुपये दर सांगून कमी जास्त करत, त्या बकरीबरोबर कबुतरासोबत फोटो काढून देत होते. 
         पर्वतावरुन खाली घसरुन आलेल्या बर्फाच्या थरामधून पाण्याचा प्रवाह खाली खोलगट भागातून वहात होता. तर आणखी पुढे वर चढून गेल्यानंतर स्वच्छ पांढऱ्या बर्फाची जमीन चालताना घसरायला होत होती. मध्येच निसरडी होत पाडत होती. ही मजा घेत बंदिस्त करत आम्ही खाली परतलो.       
        रस्त्याच्या बाजूला छोटी-छोटी दुकाने होती. या हंगामात झाडाला सफरचंद लागलेली नसली तरी, येथील ज्यूस केंद्रांवर ती उपलब्ध होती. पर्यटकांसमोरच त्याचा रस काढून त्यांना प्यायला देत होती. आम्ही रस ही पिला आणि दोन सफरचंद घेवून 'विंडो शाॕपींग' सुरु केली. आक्रोडच्या लाकडापासून शोभिवंत छोटी शिकारे बनवून विक्रीस ठेवलेली होती. विविध टोप्या, किचेन, काही पोशाख वगैरेंचा त्यात समावेश होता. दिलेल्या वेळेची मर्यादा राखत आम्ही बेताब व्हॕलीकडे जाण्यासाठी 'बेताब' झालो होतो.     
       बेताब चित्रपटाचे चित्रिकरण झाले आणि या व्हॕलीचे नामकरणच बेताब रुळले. तिकिट घेवून आतमध्ये प्रवेशलो. अत्यंत सुंदर परिसर विकसित केला आहे. वयोवृद्धांसाठी फिरण्यास येथे चाकांच्या खुर्च्यांची उपलब्धता आहे. यावरुन ते संपूर्णपणे फेरफटका मारुन आनंद घेवू शकतात. शिवाय येथून जवळच्या पाॕईंटकडे जाण्यासाठी घोडे देखील आहेतच.
       सुरुवातीलाच लीडर नदीवरील छोटेखानी पुलावर स्वर्गीय सौंदर्य न्याहाळले. 'कुणाच्या मनात काय चाललय? हे पहायचे असेल तर त्याचा तळ गाठावा लागतो,' असे म्हटले जाते. हिमनग वितळून तयार झालेल्या या नदीचा पारदर्शी प्रवाह पाहताना अगदी तळाचे साम्राज्य निथळपणे दिसत होते.
        निळसर झाक असणारे ते पाणी काही ठिकाणी खळखळाट करत पुढे वहात होते. कितीतरी वेळ ते पहात होतो. पुढे विस्तीर्ण हिरवळ आणि त्यावर विविध वाढलेली झाडे होती. एके ठिकाणी मोठाला लाकडी ओंडका टाकलेला होता. त्याचा खास वापर पर्यटक फोटोसेशनसाठी करत होते. दूरवर चारही बाजुला हिमनगाचा फेटा डोक्याला बांधून रुबाबदार पर्वत उभे ठाकलेले.
        वेळ मर्यादेत मनमुरादपणे भटकून माघारी परतताना तोंडालाच देखणा, पांढरा शुभ्र केसाळ 'सलमान' भेटला. हा पश्मिना बकरा होता. त्याच्या मालकाने खास फोटोसेशनसाठी त्याला आणलेले. पर्यटकांकडून पैसे घेत, तो मालक सांगेल तशा पोजेस देत होता. त्याच्या या शहाणपणावर पर्यटक आनंदून गेले होते. विविध छबी टिपून सलमानला कुरवाळत आम्ही हाॕटेलकडे रवाना झालो. 
       - प्रशांत सातपुते
9403464101 
          p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000
#गुलमर्ग #gulmargkashmir #बेताबव्हॕली #पहेलगाम

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..