प्रवास..आठवणींचा..!
आकाशातील विमानाचा आवाज कानावर पडताच क्षणी वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशी घरा-घरातून पोरं-टोरं बाहेर पडायचीत! त्यात मी ही एक असायचो. मग, अगदी खेळण्यातले वाटावे इतक्या छोट्या आकारातील ते आकाशात चमकणारे विमान बालपणी कौतुकानं पहात स्तब्ध व्हायचो. पांढरीधोट रेषा आकाशात काढत ते पुढं सरकायचं. कधी-कधी ते ढगांच्या आड गायब व्हायचं आणि पुन्हा दिसायचं. डोळ्यांच्या भिंगांवर उन्हं घेत मानंची दुर्बीण थेट आकाशात झेपावलेली असायची. अगदी नजरेआड होईस्तोवर हा कौतुकाचा अन् उत्सुकतेचा खेळ गल्लीत रंगलेला असायचा.
रात्री अंगणात उताणा पडून आकाशातील विस्कटलेल्या चांदण्यातून दिव्याचा चमचमाट करीत पुढे जाणारे विमान पाहताना भारी मज्जा वाटायची. त्याचा लाल दिवा पेटायचा क्षणार्धात बंद व्हायचा..तो पुन्हा पेटायचा. अशी लाल दिव्याची उघड-झाप करीत तेही मग विस्कटलेल्या चांदण्यांच्या पसाऱ्यात कुठंतरी निघून जाई.
आकाशाच्या निळ्या-काळ्या पाटीवर दिवसा पांढऱ्या रेघोट्या काढत जाणाऱ्या विमानाला आम्ही 'राॕकेट' म्हणायचो. पण, राॕकेट धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे सरळ रेषेत वर-वर जाते, ही माहिती कुठूनतरी जाणत्या दादामंडळींकडून कळायची. 'विमान केवढं मोठं असतय? तर गावात येणाऱ्या दोन-चार एस टी आरामात त्यात मावत असतील.' कोण म्हणायचं,' एक गावच असातय बघ..सगळ्यांना घेवून हवेत उडणारं..' ही आमची बालबुद्धीची तार्किक चर्चा घडायची.
कधीतरी पाहिलेल्या हिंदी पिक्चरमध्ये विमानाला तसं जवळून बघायचा योग यायचा. त्यातच भारी सुख वाटायचं. 'पुढं जीवनात कधीतरी विमानात बसायला मिळेल', असं त्यावेळी तरी कधी वाटलं नव्हतं. कारणही तसंच होतं. एस टी चं तिकिट लागत नसतानाही मोठ्या माणसांबरोबर त्यातून प्रवास करण्याचा योगही आमच्यासाठी दुर्मीळ असायचा. नाही म्हटलं तरी लग्नसराईत गल्लीतल्या कुणाच्यातरी लग्नात वऱ्हाडाच्या निमित्तानं हा प्रवास ठरलेला असायचा. टेंपोच्या हौद्यात आडव्या फळ्या टाकून केलेल्या माळ्यावर बसून हा घुसमटलेला प्रवास योग आम्हा मुलांसाठी ठरलेला असायचा. त्यावेळीही टेंपोत ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसण्याची आशा कधी फळाला आली नाही.
पुढे धड कधी सायकल मिळाली नाही. एफ वाय ला गेल्यावर स्वतःची अशी सायकल मिळाली. माझी उंची जास्त असाल्याने ती २४ इंची सायकल होती. तोपर्यंत गरजेनुसार मित्रांची विशेषतः भरत पाटील, शांतिभूषण तेरदाळे या दोघांच्या सायकलीवर माझे ओझे नेहमी ठरलेले असायचे आणि येथेही उंची जास्त आसल्याने तिबल सीट सायकल मलाच मारावी लागायची. त्यात कोण आनंद व्हायचा. इतरवेळी भाड्याची सायकल दिमतीला ठरलेली, तिही अगदी आवश्यकतेनुसार!
कागदी विमान उडवणाऱ्या काळात खऱ्या-खुऱ्या विमानप्रवासाची स्वप्नंदेखील पडत नसत. फार-फार तर रुकडी वा गावच्या पाडव्याच्या जत्रंत आठ आणे-रुपाया देवून विमानसदृश्य चक्रीतून फिरणे हाच काय तो आमच्यासाठीचा विमान प्रवास होता. आणखी पुढे जत्रंतून आणलेले किल्ली दिल्यावर धावणारे खेळण्यातील विमान हाताशी लागायचे. यात पुन्हा सारखी-सारखी किल्ली दिल्याने त्यामधील स्प्रिंग अडकायची. शेवटी निसटायची आणि आमचे जमिनीवरील विमान कायमचे बंद पडायचे. यासाठी लागणारे पैसे आम्ही पोरं कुस्तीतून मिळवायचो. गावच्या सिद्धेश्वर महाराजांच्या जत्रंत लंगोट घालून आम्ही कुस्ती करायचो. ठरवून हार-जित व्हायची. यात बक्षीस म्हणून बंदा रुपाया हाती लागायचा. कधी मी ठरवून जिंकायचो, तर कधी ठरवून पडायचो. अशा आमच्या कल्पक कुस्त्या चालायच्या. कधी-कधी ही कल्पकता पंचांना कळायची तसे ते रपाटा देवून आम्हाला मैदानाबाहेर हाकलून देत.
हा सगळा प्रवास इतका बेमालूमपणे घडायचा. पुन्हा हाताशी कागदी विमान आणि आकाशातील दिवसा उन्हात चमकणारे आणि रात्री दिव्याच्या चमचमाटात जाणारे विमान कौतुकाचा आणि औत्सुक्याचा विषय रहायचा.
माझे वडील अर्थात आण्णा कोल्हापूरला असल्याने अधून-मधून त्यांच्यासोबत माझा रेल्वे प्रवास व्हायचा. शिट्टी मारत, पाठीवरुन धूर ओकीत ते रेल्वेचे प्रचंड धूड रुळावरुन जाताना, रात्री धडकी भरवायचे. दिवसा प्रवासात खिडकीतून शेती-पिकांचे, नद्या-नाल्यांचे हवेसे वाटणारी दृश्यं सुखावून जात असत. दहावी झाल्यानंतर माझा एकट्याचा असा मुंबईला स्वतंत्रपणे रेल्वे प्रवास झाला.
आयुष्यभर प्रवासात विविध साधनं मिळाली. बालपणी कधी स्वप्नातही न येणारा विमानप्रवासही सातत्याने घडला-घडतोय.
आज हे सगळं आठवण्याचं विशेष कारण म्हणजे, सकाळी फिरायला जाताना आकाशात उंचावर विमान दिसले. त्याक्षणी बालपणात गेलो. स्तब्ध झालो. बालपणीची डोळ्यांची भिंगे लावलेली मानेची दुर्बीण वर आकाशात लावली आणि कौतुकानं डोळ्यांच्या भिंगेत विमानाला घेण्याचा खटाटोप केला. नंतर हातातील मोबाईलमध्ये त्याला चित्रित केले. हे करताना एकदम भारी वाटलं. पण, चिअरअप करण्यासाठी डोळ्यांवर, चेहऱ्यांवर उन्हं घेणारे बालपणीचे सवंगडी आज आजूबाजूला नव्हते.
पण, 'राॕकेट..राॕकेट..विमान..विमान' असा आवाज मात्र, अंतर्मनी ऐकायला येत होता. होय..तोच बालपणीचा गलका विरत गेलेला. त्यातच 'वर बघ विमान..खाली बघ सामान..' हा चावटपणाचा आवाजही तळाशी विरला होता.
आजचा हा एकट्याचा प्रवास आठवणींच्या गावी पोहचला..अगदी निवांतपणे..एकांतपणे..!
©️ प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4752130668165787&id=100001067020937
Barrel Roll
ReplyDelete