..गवतानेच गवताचा भारा बांधूया
शनिवारची सकाळची अर्धी शाळा सुटल्यावर खाकी चड्डीवर करदोडा चढवून आणि पाठीवर दप्तर घेवून, दप्तर कसले ते, बाजारची पिशवीच ती! रविवारी आठवड्याच्या बाजारला कधी कधी वापरली जाई. डोक्याचा पैलवान कट आणि त्यावर चपचपीत लावलेले खोबरेल तेल, त्याचा ओघळ थेट गालावरुन कधी कधी गळ्यापर्यंत असायचा.
भर उन्हात पायात असली तर स्लिपर नाहीतर आनवाणीच धूळ उडवित चालायचो
दप्तर सांभाळत चालता चालता फूफाट्यातला बाभळीचा काटा कच्चदिशी पायात मोडायचा आणि त्याची कळ मस्तकात शिरायची.
मग फुफाट्यातच दगडावर बसायचो मोडलेला काटा काढायला... पायाला थुका लावून काटा काढायला त्याचा दुसरा भाऊबंदच लागायचा.
नाजूक रक्त्ताच्या ठिपक्याबरोबर काट्याचा टोकदार मोडलेला तुकडा तळहातावर घ्यायचो. पापणीचा केस खस्सकन ओढून तोडायचो.
तुटून हातात आलेला केस तळहातावरील काट्याला चिकटवून हळूहळू वर उचलायचो..
काटा उचलून वर यायचा..सगळंच कसं भारी वाटायचं..मस्तकात शिरलेली कळ विसरायला व्हायचं.
तेव्हा पापणीच्या साध्या केसानंही काट्यासारखी वेदना हलकी व्हायची..अगदी राहिलीच तर दिव्यावर गुळ भाजून पायाला चटका द्यायचो.
तेव्हा कुठेही व्यवहाराचा स्पर्श झालेला नसायचा. निरागस डोळ्यात अगदी स्वप्नं देखील निरागस असायची..
ऊन तेव्हाही होतंच की..आता डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गाॕगल लावूनही कुठला थंडावा येतोय?
बाकी काहीही म्हणा बालपणीचा काळ सुखाचाच! लहानपणी वाटायचं कधी एकदा मोठं होतोय..आणि आता..पुन्हा एकदा लहान होवू पाहतोय..
आजही शाळेजवळून जाताना शाळा बघून मी थोडा आठवणीत रमतोय.. शाळा मात्र, माझ्याकडे बघून हसत असते..
जीवनाच्या शाळेत पाठीवर पुस्तकांचं भले नसेलही दप्तर..पण जबाबदारीचा वर्गच जणू बसलाय..आणि शिकवणारे भले बहाद्दर वळणा-वळणावर ठाकलेत..
काट्याने काटा काढायचा निरागस काळ तेव्हाच ओसरला अन् व्यावहारिक तेवढा शिल्लक राहिला..
बघा जमलं तर..भले काट्याने काटा काढण्याऐवजी "गवतानेच गवताचा भारा बांधता येतोय का..?
©️प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4752130668165787&id=100001067020937
Comments
Post a Comment