वरात
खामकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरूवातीला म्हणजे झेंडा चौकात बाबू फरांडेचे किराणा मालाचे दुकान होते पांढरी विजार आणि शर्ट घालणारा हा 'बाबूमामा' या नावाने गल्लीत परिचित होता. पटाशीच्या दोन दातांमध्ये बोट जाईल इतकी लक्षवेधी फट होती. साथ सोडून गेलेल्या केसांमुळे उजाड झालेले टक्कल उन्हात अधिकच चमकायचे. हा बाबूमामा एकुलत्या एक गंजक्या आणि सतत कुरकुरणाऱ्या आपल्या सायकलीवरून दुकानात यायचा. दुकानाची उधारी वाढत गेली तशी याच बाबूमामाने नंतर चटणीचा डंक सुरू केला होता. पूर्वी किराणा माल नेऊन पुरूष मंडळींनी उधारी वाढविली नंतर समस्त महिलावर्गाने !
बाबूमामाच्या एकट्या दुकानात त्यावेळी वर्तमानपत्राचा अंक येत असे. मधूनच शाळा सोडून सेंट्रींगच्या आणि अन्य कामावर जाणारा समस्त कामगार वर्ग हा पेपर वाचण्यासाठी त्याच्या दुकानात जमत असे. यात गडग्यांचा उत्तम, कमाल मुजावर,जाधवांचा सुरेश, शिंद्यांचा सुधाकर, बाळू, दत्ता, रावशा, किडम्या रामा, अण्णा साळी ही मंडळी आवर्जून असत. तर नकटा सुन्या, मुडलग्यांचा यमन्या, जांगड्यांचा आश्या अशी शाळा सोडून बोंबलत फिरणारी उचापती मंडळीही मागे नसत.
सकाळी साडेआठच्या भोंग्याला ही सारी मंडळी बाबूमामाच्या दुकानात दत्त होत. मग कोण सिगारेटी शिलगावीत, कोण बिडी फूंकत, कोण तंबाखूचा बार भरत तर, हौशी मंडळी आपल्या तोंडात मावा भरत. पेपर आला रे आला की त्याचे आठ-दहा अवयव प्रत्येकाच्या हातात विखूरले जात. पेपर वाचता वाचता त्यामधील बातम्यांवर चर्चाही होई. तशातच बाबूमामा आपल्या उधारीची प्रत्येकाला आठवण करून देई. तशी ही मंडळी रविवारचा वायदा देऊन आपापल्या कामावर निघून जात.
सर्वांची चर्चा ऐकून बाबूमामाला वेगळा पेपर वाचायची कधी गरज भासायची नाही. तो पेपरचे सगळे अवयव गोळा करी, त्याची व्यवस्थित घडी घालून तो रद्दीच्या गठ्ठ्यात ठेवी. त्यानंतर गरजेप्रमाणे कापून पुड्या बांधण्यासाठी त्याचा वापर करी. दररोज न चुकता हा सामुहिक वाचनालयाचा कार्यक्रम चाले. रविवारी या वाचनालयाच्या सभासदांमध्ये आणखी भरच पडायची. होणाऱ्या गर्दीने गिऱ्हाईकं बुजायची मग मात्र “वाट सोडून बाजूला थांबा बगू..” असे त्राग्याने तो म्हणायचा, प्रसंगी तो हाकलूनही लावायचा.
गल्लीतली सगळी मंडळी कामा-धंद्याला गेली की झेंड्याच्या कट्ट्यावर, बाबूमामाच्या दुकानात नाहीतर इब्राहीम टेलरच्या कट्ट्यावर दिगानाना, माळ्याचा म्हातारा, जांगड्याचा म्हातारा अशी म्हातारी मंडळी आणि यमन्या,आश्या, नकटा सुन्या, अशी इब्लीस मंडळी सोबतीला असत.
वाचनालय आज चांगलच रंगात आलं होतं. मूठ तोंडाजवळ नेऊन सिगारेटचा एक झुरका मारून, गडग्याच्या उत्तमने हवेत धूर सोडला. आणि परत पेपरात मुंडी घालत बोलला,
"दत्त्या.. बातमी बघीतलीस का.?”
त्यावर वेगळीच बातमी वाचत असलेल्या दत्त्याने तोंडाने पिचकारी मारली. हातातला पेपर मिटवत "कुठली रं ?” असं म्हणत त्याने उत्तमच्या पेपरात मुंडी घातली.
“पाऊस पडावा म्हणून बेडकांचे लावले लग्न!” त्याने ती बातमी मोठ्याने वाचून दाखविली. तसे सगळे त्या बातमीकडे वळले.
“अरं खरंच की.. बायला मी ह्यंच्या फोटुबी छापलाय न्हवं बेडकांचा” कुणीतरी बोललं.
तसा दिगानाना म्हणाला,”आयला ह्यंच्या ही बी बातमी पेपरात येती व्हय ! आरं गाढवांची लग्नं लावायची सोडून बेडकांची कशी काय लावली रं..”
“मग पडला का पाऊस” हातातलं बिडीचं थोटूक विझवत किडम्या रामानं विचारलं. तशा सगळ्यांच्या नजरा उत्तमच्या तोंडाकडे वळल्या.
“ते काय लिहलं न्हाई गड्या” उत्तम बोलला.
“लई नशिबवान बेडकं.. माणसांच्या लग्नाची बातमी कधी छापून येत न्हाई ती.. बेडकांची आली.” बिडीचा बंडल बाबूमामाकडून उधारीवर घेत रावशा बोलला.
“तू कर की काळ्या सुनीसंगं लग्न..न्हाईतर असं कर.. खुळ्या धुरपीसंगं कर, मी तुझा फोटूबी छापून आणतो पेपरात !” साळ्याचा आण्णा असा म्हणाला तसे सगळेच हसले.
बंडलमधून बिडी काढून ती पेटवून रावश्यानं एक झूरका मारला, आणि तोंडातला धूर आण्ण्याच्या तोंडावर सोडत एक शिवी हासडली. डाव्या हाताने जेवणाचा डबा उचलत तो वाटेला लागला. तशी बाकीची मंडळीही कामावर जाण्यासाठी निघाली.
नकटा सुन्या, यमन्या आणि कोण कोण पोरं ही चर्चा ऐकत छापून आलेल्या बेडकांच्या फोटोवर नजर ठेवून होती. सतत काहीतरी वेगळं करण्याच्या शोधात नकटा सुन्या असायचा.
“असा एखादा जंगी कार्यक्रम आपल्यापण गल्लीत करू...पेपरात बातमी छापून आली पाहीजे काय रं यमन्या.” नकटा सुन्यानं सांगितलं.
“करू म्हणं..पहिल्यांदा काळी सुनीकडं बघ कशी झोकात चाल्ल्या” यमन्या बोलला.
तसा नकटा सुन्या म्हणाला,”आयला हिच्या... खारवलेला शेंगदाणा दिसती जणू ”
तशी सगळी फिदीफिदी हसली. ही टवाळकी ऐकून दिगानाना उठला.
”बायला मी तुमच्या ये माकडानो उठता की न्हाई तिथनं...उठा ..निगा ..ये शिंदीच्या हाण बघू गाडी” आणि त्याने दोन धोंडेच त्यांच्या दिशेने भिरकावले. तशी ती पुन्हा खिदळत सुनीला 'ये मधुबाला..' म्हणून चिडवत बाजूला गेलीत.
कोळ्यांची सुनी म्हणजे रंगानं काळा पत्थर, तर सुतारांची वनी संगमरवर! वनीला नटण्या-मुरडण्याची भारी हौस. दुपारी झोपलेल्या गल्लीला जागं करत 'सुया घे..बिब्बं..घे.. पावडर घे..' अशी आरोळी ठोकत गोसाव्याच्या बायका आडव्या झोळीत मूल बांधून डोक्यावर भली मोठी काळी बुट्टी घेऊन येत असत. वनी या बायकांना पत्रा, लोखंडाचे डबे, रिकाम्या बाटल्यांच्या बदल्यात, तर कधी एखादी भाकरी देऊन पावडर, स्नो, टिकल्या, चाफं असलं सगळं घ्यायची, आणि नटून-थटून गल्लीतनं फिरायची. मूळची गोरी-गोमटी वनी आणखी 'फर्मास' दिसायची.
वनीच्या देखणेपणाचं रहस्य नेहमी सुनी शोधायची. जादूगाराच्या जादूचे रहस्य सापडल्यासारखे एके दिवशी वनीच्या देखणेपणाचे इंगीत तिला मिळाले. तिनेही गोसाव्याच्या बाईला हाटकून घरी आणलं.
”वनीला तू काय काय दिलंस ते मलापण दे बघू” अशी आर्डर तिला देत तिच्या बुट्टीत तिनं हात खुपसला. त्यातील सगळ्या गोष्टी चाचपत पावडरीचा एक डब्बा, स्नो ची एक बाटली, कंगवा असे काय-बाय घेत तिने, बापाच्या पिऊन साठलेल्या बाटल्या आणि शेजारच्या घराबाहेरील टमरेलं तिला देऊन टाकली. अशी ही सुनी चेहऱ्यावर स्नो, पावडर थापून गल्लीत मिरवत फिरायची.
दुसऱ्या दिवशी सकाळी दळव्याच्या म्हातारीनं टमरेलवरून आख्ख्या गल्लीतील पोरांना शिव्या घातल्या.
”कडवी कुठली..दुसऱ्यांची टमरेल देऊन गारेगार खात्यात..मडी बसवली ह्यंची.. ”
दळव्याच्या म्हातारीच्या तोंडाचा पट्टा असा बराच वेळ चालू होता. सुनी मात्र मनोमन खूश होत होती.
वाढत्या उन्हाळ्यात दुपारची माणसं बहुधा घरातच असायचीत. शाळांनाही सुट्टी असल्याने पोरं गल्लीभर हुदूड्या घालायचीत. मोठी माणसं दुपारी झोपलेली पाहून दुसऱ्याच्या घराबाहेर असणारी टमरेल वा हाताला लागेल त्या वस्तू फेरीवाल्यांना देऊन गारेगार, चिंचा, बोरे, करवंदं, जांभळं घेण्यात ही पोरं पटाईत होती. सकाळच्या 'सोयी'ची पंचाईत व्हायची. मग मात्र साळसूदपणे गल्लीच्या शिव्या खात.
सकाळपासून आज खूपच उकाडा वाढला होता. घरात बसून खूप गदमदायला होत होतं. घाम पुसून पुसून सगळा टॉवेल भिजला तसा दिगानाना घरातनं उठला आणि उघड्याबंब अंगाने कट्ट्यावर येवून स्थिरावला. इकडे माळ्याचा म्हातारापण उन्हाला शिव्या घालत बाहेर आला. इब्राहीम टेलर मशिनवर पाय मारून घामानं डबडबला होता. त्यानं चक्क मशिनच दुकानाबाहेर काढलं आणि उघड्या अंगानं हवेला तो मशिनवर पाय मारत बसला.
माळ्याच्या म्हाताऱ्यानं विजारीच्या खिशातून पिशवी काढली. पिशवीचं तोंड सोडून आतली चिलीम हातात घेतली. चिलमीत कोंबून ठेवलेली छापी बाहेर काढून चिलमीच्या तळाला खडा जाम बसवला. पिशवीतील रवाळ तंबाखू चिलमीत भरत बोलला,
“औंदा पावसाचं काय लक्षण दिसत न्हाई”
“बगा की मामा जून संपत आला तरी मे महिन्यागत उन आग ओकायला लागलय” कपाळावरचा घाम पुसत इब्राहीम टेलर म्हणाला.
“पाऊस न्हाई तर काय खरं न्हाई गड्या..शेती न्हाई तर रोजगार न्हाई..आपला रोजगार बी बोंबल्लाच की गा.” चिलमीच्या बुडाला छापी लावत माळ्याचा म्हातारा बोलला.
“पापं...दुसरं काय? लई पापं वाढली..त्यो तरी कुठवर करणार गा..”असं म्हणत दिगानानाही त्यांच्या चर्चेत सामील झाला. दिगानानानं तंबाखूची डबी उघडत डाव्या हातावर तंबाखू घेतली. उजव्या हाताच्या अंगठ्याने डबीतील चुना खरवडत त्याने मळणी केली. तंबाखूची गोळी तोंडात ठेवून हात झाडला, आणि अगदी आलकट-पालकट घालून बगलतला घाम पुसत बसून राहिला.
“वळीव तर कुठं पडला..” मशिन थांबवून कानावरची बिडी पेटवत इब्राहीम टेलर बोलला.
पचकन थुंकून दिगानाना म्हणाला, “वळवाचं जाऊ द्या हक्काचा हुकमी मिरग तरी कुठं पडलाय अजून.. ”
दोन-चार झुरकं मारून चिलमीतली राख खाली झाडत ती थंड होण्यासाठी तशीच खाली ठेवून दिली.
“आयला या उन्हाच्या जातोय का राहतोय आता ” खोकतच माळ्याचा म्हातारा बोलला.
एकाएकी वारा सुटून वावटळ उठलं. मातीचा फूफाटा जोरदार उठला होता. डोळ्यात माती जाऊ लागली. वावटळ चांगलच घोंघावत आलं. कागदं, चगाळ्याबरोबर कुणाची कपडेही त्यात फिरत होती. त्याच्या मागून कपड्यासाठी सुनी आणि वावटळात नाचायला यमन्या, नकटा सुन्या, जांगड्याचा आश्या ही सारी धावत आली.
“मीठाचं खडं टाक वावटूळात मग भूत दिसतय बघ” सुनी म्हणाली.
“एक गल्लीत आसताना ते आणि कशाला ईल” नकटा सुन्यानं टवाळकी सुरू केली. तशी सगळी हसली.
“गाढवा.. मला भूत म्हणतोस मेल्या थांब तुझ्या आईला तुझं नाव सांगतो.” सुनी फणकारून म्हणाली.
“जा जा तू येणार म्हणून त्याची आई तुझी वाटच बघत बसल्या” यमन्या दात विचकत बोलला. पडलेली कपडे उचलत सुनीनं मारक्या म्हशीगत दोघांच्याकडे पाहीलं, आणि 'नकटा..बुरश्या तोंडाची कुठली..'अशी पुटपुटत ती निघून गेली. तसं आलेलं वादळही शांत झालं.
जून संपला तरी उन्हाळा कायम होता. वाढणारा उष्मा पाहून जो तो 'आज पाऊस कोसळणार 'असं वांझ भाकीत करायचा. पेपर वाचतानाही आज बाबूमामाच्या दुकानात वाढत्या उन्हाळ्याचीच चर्चा होती.
“जागतिक तपमान वाढीमुळे मान्सून लांबणीवर” पेपरात डोकं घालून नकटा सुन्या जोरात बातमी वाचून दाखवत होता. बाकीची मंडळी टवकारून ऐकत होती.
“ते आणि काय असतयं म्हणायचं ?” माळ्याचा म्हातारा चिलमीचा झुरका काढत म्हणाला.
“हे..हे धुराडं सुरू केलयं न्हवं..ह्या असल्या गोष्टींमुळं तापमान वाढलय, आणि पाऊस बोंबल्लाय.” नकटा सुन्या चिलमीकडं हात करत बोलला.
“सुक्काळीच्या माझ्यावर घसरतोस..नकटं ते नकटं आणि वर म्हणं धाकटं.. ” रागानं शिवी हासडून तो बाजूला बसून राहिला. पुन्हा नकट्यानं राहिलेली सगळी बातमी वाचून दाखवली. आणखीही तपमानवाढीची काय काय कारणं तो सांगू लागला.
“नकट्या लेका तू शाळा मधनंच सोडायला नको होतास. शिकला असतास तर मोठा मामलेदार झाला असतास. गल्लीचं नाव काढला असतास” सुन्याच्या 'जनरल नॉलेज' विषयी बाबूमामानं मत मांडलं.
“ह्यो नकटा आणि मामलेदार ! घसरणारी चड्डी सांभाळायला येती का अगोदर..” रावश्यानं टिपणी केली.
बाबूमामाच्या बोलण्यानं मात्र सुन्या सुखावला होता. त्याची छाती जरा फूगल्यासारखी झाली होती. तशातच आयती संधी त्याला चालून आली होती.
“आपणबी बेडकाचं न्हाहीतर गाढवाचं लग्न करून बघू की” सुन्यानं प्रस्ताव मांडला. तसं आणखी दोघांनी त्याची री ओढली.
“काय हरकत न्हाई खरं..” दिगानाना बोलला.
“आरं पाणीच न्हाई तिथं बेडकं कुठली रं घावणार.” बडका थुकत माळ्याचा म्हातारा म्हणाला.
“बेलदाराच्या गल्लीत गाढवं भरल्यात, गाढवांना काय तोटा?” रावश्यानं सुन्याच्या प्रस्तावाला मंजुरीच दिली.
“जावा रं..दोन झ्याकपैकी गाढवं आणा धरून.” दिगानानानं आर्डर देताच शिंद्यांचा सुध्या, सुन्या, यमन्या, आण्ण्या आणि दोन-चारजण बोळा-बोळातनं पळत बेलदार गल्लीकडे निघाली.
जरा पुढं जावून माघारी येत सुन्या म्हणालं,”जंगमाच्या संज्याला बोलवू सगळं कसं म्हू्र्तानं हूं द्या.” आणि पुन्हा ते बेलदार गलल्लीकडं पळालं.
“ए..पोरा..जा जरा जंगम हाय का बग जा घरात” दिगानानानं जांगड्याच्या आश्याला पाठवून दिलं. तसा हा आश्या रेड्यावर पाऊस पडल्यासारखा एकेक पावलं टाकत मधीच तुंबून राहात जंगमाच्या घरात गेला, आणि माघारी येत "हाय घरातच बसलाय” असा निरोप त्याने दिला.
“त्याला आता बोलवून कोण आणणार?” त्याच्यावर तडकत दिगानाना म्हणाला. ” हूबलाकच हाईस.. बोलवून आणायचं न्हाई ? का बघून ये म्हटल्यावर नुस्तच बघून आलाईस मर्दा.."
तुंबून उभ्या राहीलेल्या आश्याला बघून तो पुन्हा म्हणाला,"का आता जमखंडीचा बेंड देऊ तुला संग ? ” चिडलेल्या नानाला बघून पुन्हा ते गेलं आणि त्याला पुढं घालूनच घेऊन आलं.
बेलदार गल्लीतल्या रिकाम्या दोऱ्या बघून यमन्या म्हणाला, ”हुब्या आयुष्यात ह्या गाढवांना बेलदारांनी कधी विकतची वैरण घातली नसणार. आयला ह्यंच्या कामं करून घ्यायची आणि गावभर मोकळं सोडायचं गाढवांना चरायला.”
बोळातल्या कचरा कुंड्या हूडकत ही सारी फिरू लागली. बाजाराजवळच्या एका बोळातील कचरा कुंडीत चार-पाच गाढवं तोंड घालून उभी होती.
“घावली घावली मर्दानू दोनाला चार हैत.” हरवलेला ऐवज सापडावा तसा सुन्या म्हणाला. दोन नेटक्या गाढवांच्या गळ्यात आणलेली कासरं घालून हळूवार त्यांना पुढे आणत त्याच्यावर ते बसलं. तसा दुसऱ्यावर यमन्या अगदी टेचात बसला. मग काय जो-तो आळीपाळीने या गाढवांवर घोड्याच्या अविर्भावात बसत, ही वरात तासाभरानंतर गल्लीत आली.
पांगा-पांग झालेली सगळी मंडळी लग्नाला निमंत्रण दिल्यासारखी आपसूक जमली. कुणीतरी पटकूर आणून दोन्ही गाढवांच्या पाठीवर टाकली. चारजणांच्या परड्यात फिरून फुलं आणून त्याच्या माळा केल्या. गाढवांच्या गळ्यात त्या घातल्या. जो-तो ठरवून दिल्यासारखा कामाला लागला होता. सायकलीवरनं जाऊन कुणीतरी चिरमुरं आणलं. त्याच्या मुंडावळ्या करून गाढवांच्या कानाला बांधल्या. उरलेलं चिरमुरं सॅंपलवारी कधी संपलं समजलंच नाही. जंगमाचा संज्या सगळं कसं नियमानं आवरत आला होता.
सुताराची वनी आणि कोळ्याची सुनी दोघी स्नो-पावडरी थापून करवलीगत नटून आल्या होत्या. त्यांच्या हातात कुणीतरी आरतीचं ताट दिलं होतं. डोंबाऱ्याच्या नाचणाऱ्या ताराला बघायला जशी गर्दी होते, तशी आता गर्दी झाली होती.
या साऱ्या गोमघाल्यात नकटा सुन्या कुठेतरी बराच वेळ गायब झाला होता. थोड्यावेळानं तो आला, ते येताना अण्णा धनगराचा ढोल घेऊनच ! अण्णाच्या पोराच्या हातात कैताळ होतं. बिऱ्या पसाऱ्यानं घरातनं हलगी आणली. कोणतीही कमतरता ठेवायची नाही, असा सुन्यानं जणू विडाच उचलला होता.
धरून आणलेली गाढवं गर्दीनं आता भेदरली होती. ती इकडं तिकडं पळू पाहात होती. त्यांचं कासरं पकडून यमन्या उभा होता. जंगमानं लग्नाचा विधी पार पाडला, तसा वाजंत्र्यांनी एकच गलबलाट केला. ढोल, कैताळासह हलगी कडाडली तशी गाढवं जाग्यावर राहीनात. ती सारखी उधळू लागली. कासरं जोरात धरून यमन्याच्या हाताला रग लागू लागली. सगळ्यात पुढे वाजंत्री त्यानंतर 'वधू-वर' आणि पोरं-टोरं अशी ही वरात एका गल्लीतून दुस-या गल्लीत फिरत होती. घराघरातनं बायका-माणसं बाहेर आली होती. कोण भक्तीभावानं त्यांची पूजा करीत होतं. तर बहुतेकांची करमणूक चालली होती. तशातच गाढवं मध्येच उधळू पाहात होती.
निम्म्या गावात फिरून वऱ्हाडी मंडळी आता जाम वैतागली होती. तरी उत्साहात असणारा नकटा सुन्या 'अजून एक कोपरा करू' म्हणत होता. कासरं धरून भेंडाळलेला यमन्या आणि वरातीतील पाहूणे मंडळी सुन्याला शिव्या घालू लागली. फिरून दमलेली वरात एकदाची गल्लीच्या तोंडाला आली. हाताला रग लागलेल्या यमन्यानं हातातली कासरं सुन्याच्या हातात देत तो जरा दम खाऊ लागला.
तसा जोशात येत सुन्या म्हाणाला, 'आता दमू नका, झालच आलोच गल्लीत आता, ए वाजवा रे जोरात.' चेव आल्यागत ढोल वाजू लागला, एकमेकावर कैताळ बडवली जाऊ लागली, हालगीपण पुन्हा जोरात कडाडू लागली. बसलेला जांगड्याचा म्हातारा एकाएकी उठून गाढवांजवळ येत त्यानं खाली वाकून पाहीलं, आणि म्हणाला,
“तुमच्या बा नं लगीन लावलं हुतं का असं ?”
सगळा आवाज जागच्या जागी थांबला. जो-तो एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागला.
“बांबलीच्यानो गंड्याचं लगीन गंड्याबरोबर लावताय..सोताच्या हातानं असं विपरीत कराय लागलाय माणूस..त्यो तरी काय करील मग..पाऊस पानी बोंबलणार न्हाई..तर काय हुईल ?..”
सगळी गाढवांच्या खाली वाकून पाहू लागली, जांगड्याचा म्हातारा म्हणत होता ते खरं होतं.
“इदरकल्याणीच हाईत पोरं..काय रं नकट्या, गाढवीण मिळाली न्हाई व्हय रं तुला..” दिगानाना असा एकेकाला फैलावर घेत होता.
मघापासून जोशात असणारा सुन्या एकदम वरमला होता. आणि दम खाऊन ताजातवाना झालेला यमन्या गमतीला आला होता. सुन्याची टर उडवत ते गाढवांच्या मागं गेलं आणि जोरजोरात ढोल वाजवायला लागलं. आपसूक कैताळ आणि हलगी कडाडली. तशी वरातीनं तंगलेली गाढवं जोराचा हिसडा देत उधळली. कासरं धरूनं बेसावध उभा असणारा नकटा सुन्या सप्पय आडवा झाला. त्याचं अगोदरच नकटं असणार नाक, हनुवटी, दोन्ही हाताची कोपरं आणि दोन्ही गुडघं फूटलं. पाठीमागं ढोल वाजवणाऱ्या यमन्याला सणसणीत लाथ बसून ढोलासकट तोही उताणा पडला होता. उधळलेल्या गाढवांच्या तावडीतनं ज्ञान पाजळणारा जांगड्याचा म्हातारादेखील सुटला नव्हता. दोन्ही पाय आकाशात होऊन तोही सपशेल कंबरेवर आदळला होता.
पाणी पिऊन कलायला झालेली जगतापांच्या न्हाणीची भिंत गाढवानी कधीच झोपवली होती. कोळ्यांच्या पांगिऱ्याच्या कुडाला भगदाड पाडून दोन्ही 'उपवर' वधूच्या शोधात चौखूर उघळली होती. नकटा सुन्याची इच्छा पूर्ण होता होता डाव उधळला होता. त्याची दुसरी इच्छा परंतु पूर्ण झाली होती. पेपरात बातमी आली होती. बाबूमामाच्या दुकानात बसून रावश्या वाचत होता, 'लग्न गाढवांचं आणि वरात गल्लीची.'
---प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
Nice
ReplyDelete