पिक्चरला दर्दी अन् तालमीत गर्दी..!
अगदी ५ वीला असल्यापासून ८ व्या गल्लीतील श्री विठ्ठल मंदिर येथे शरद सोनटक्के घेत असणाऱ्या सःस्कार वर्गाला आम्ही सगळे संध्याकाळी जात असू. सत्वशील जगदाळे, सचिन नानावटी, आप्पा-अतुल ही कुंभारांची जोडगोळी, अजित पाटोळे, लक्ष्मण पाटील, दशरथ शेटे, दीपक गाणबावले, अनिल हुल्लुरे अशी नाना कला (अंगात आणि डोक्यातही) असणारी सगळी असत. संध्याकाळी संस्कार वर्गाला आम्ही येणारी सगळेजण पहाटे याचा विठ्ठल मंदिराच्या टेरेसवर सूर्यनमस्कारसाठी येत होतो. सूर्यनमस्कार संपले की योगासने, लाठी फिरवणे, काठीवरुन चालणे असेही प्रकार व्हायचे. सगळेच तसे वर सांगितल्याप्रमाणे कलाकार! त्यामुळे एकहीजण मागे हटत नसे.
काही काळ संस्कारवर्गानंतर सूरपेटी आणि तबला शिकवण्याचा वर्ग भरला होता. उन्हाळ्यात कधी झेल्यांच्या विहिरीवर तर कधी नदीवर पोहायलाही जात असू. अशा या रम्य काळात माझी उत्तम जडण-घडण होत गेली. याच शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर आम्ही सगळे राना-वनात, गड-कोटांच्या मोहिमांसाठी जात होतो. अनेक कीर्द जंगले, दऱ्या-खोऱ्या पालथी घातली. आज हे सगळं आठवताना अंगातली रग शिवशिवते. हा काळ खरंच सुखाचा तसा सुखाचा होता.*
*दहावीला कोणत्याही विषयाची शिकवणी न करता मी ५६ टक्क्यांनी पास झालो आणि आयुष्याच्या शाळेत खऱ्या अर्थाने परीक्षा देवू लागलो. संस्कारवर्ग बंद झाला. मोहिमाही बऱ्यापैकी थंडावल्या होत्या. पण, सूर्यनमस्कारामुळे लागलेली शारीरिक आणि मानसिक व्यायामाची गोडी सुटली नव्हती. ती जागा नगरपालिकेसमोरील तालमीने घेतली. तत्कालीन नगरसेवक चंद्रकांत जाधव यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली आमचा व्यायाम (फि न देता ) सुरु झाला.
शेखर गंगधर, अमर लठ्ठे, सतीश राजापुरे, भूपाल खामकर असा यावेळी आमचा व्यायामाचा ग्रुप झाला होता. दररोज सकाळी आणि संध्याकाळी वेळ मिळेल तसा दोन्ही वेळेला तालीम सुरु झाली आणि येथे सगळ्यांना "बिल्डर" ही उपाधी मिळाली. जोर, बैठकांच्या जोडीला विविध साधनांच्या सहायाने अल्पावधितच छात्या (हा तालमीतला शब्द बरं का) बाहेर आल्या.*
*मस्तावलेला आणि धावत समोरच्याला ढुशी मारण्याच्या बेतात असणाऱ्या रेड्याचे चित्र असणारा "टी" शर्ट घालून मी फिरायचो. कमावल्यामुळे आकार घेवून बाहेर आलेली छाती या टी शर्टात आणखी वाढीव दिसायची. तालमीतल्या बहुतेकांचा "असाच" वावर असायचा. "छात्या काढून, काखंत लिंबू ठेवून फिरत्यात पोरं..!" असा उल्लेख ऐकून जरा बरं वाटायचं. गावच्या माळावर असणाऱ्या महाविद्यालयातही आम्ही असंच फिरायचो. पोरींचा घोळका समोर येताना दिसला, की काखंत आणखी एखादा लिंबू ठेवल्यागत छाती आणखी बाहेर यायची,(म्हणजे काढायचो) आमची ही फेरी कालेज सुटल्यानंतर नोकर हौसिंग सोसायटीमार्गे "के एम, जे जे" मार्गे स्टँड पर्यंत असायची. (अर्थात हिरवळ दर्शन हाच प्रांजळ उद्देश वयोमानानुसार असायचा.)एकदा शरीरसौष्ठव स्पर्धेतही मी आणि सतीश राजापुरेने सहभाग घेतला होता. यश मिळाले नसले तरी अपयशही पदरी पडले नव्हते. अंगाला "तेल्या मारुती" बनवून गर्दीसमोर पोझेस मारताना कसला आनंद झाला होता.*
*शेखर, अमर माझा बेंच मारतानाचा पार्टनर. दररोज संध्याकाळी आमची बेंचसाठी जोडी ठरलेली असायची.*
*एके दिवशी तालीमजवळ आलो तर व्यायामासाठी सिंगल बार, डबल बारजवळ ही गर्दी झालेली! (बारमधील गर्दी वेगळी ) दार ढकलून आत पाहतोय तर तिथेही गर्दी! सगळे नवे चेहरे! नियमित व्यायाम करणाऱ्यांवर आज वेटींगची वेळ आली होती.*
*दुसऱ्या दिवशी गर्दी तशी कमी होती, पण नवे चेहरे होतेच. नंतर पुन्हा हे सगळे चेहरे अचानक गायब झाले. पूर्वीप्रमाणेच नियमित मेंबरं(हा शंकर पाटलांचा शब्द) तालमीत दिसू लागली.*
*महिनाभराने पुन्हा हेच दृश्य दिसले. मग मात्र, जरा खोलात गेलो आणि सगळं इस्कटून पाहिल्यावर समजलं, झेले चित्र मंदिरला आर्नाल्डचा "टर्मिनेटर-२" हा चित्रपट लागला होता. ३ चा शो पाहून अर्नाल्डच्या बाडीने प्रेरीत झालेले हे सगळे "भावी" अर्नाल्ड एकाच दिवशी बाडी कमवायला त्याच रस्त्याने टाकीतून थेट तालमीत यायचे.*
*पुढे हा सिलसीला तालीम सोडून नव्याने सुरु झालेल्या "जिम" पर्यंत सुरुच होता. नुकतीच नव्यानेच चम्या खोताने नवी "जिम" उघडली होती. या ठिकाणीही शेखर पार्टनर होताच*
*एके दिवशी रफिक मियाँना घेवून शेखर आला. पहिल्याच एक-दोन दिवसानंतर पोट कमी करण्यासाठी रफिकला मशिनवर व्यायामप्रकार शिकवला. बहुधा एकाच दिवसात पोट कमी करण्याचा रफिकनेही चंग बांधला असावा. कारण रफिकने दुसरा कोणताच व्यायाम प्रकार त्यादिवशी केला नाही. अर्थात जे व्हायचे होते तेच झाले. दुसऱ्या दिवशी "बसताच" येईना. त्यानंतर रफिक पुढे जिमला फार दिसला नाही. हे वेगळे सांगायला नको.
तालमीची मजा या नव्या "जिमला" येत नव्हती. पुढेही आयुष्यात अनेक जिम आणि "आफिसर्स क्लब" जाईन केले. पण, तालमीतला परवलीचा "बिल्डर" हा मनाला आणि शरीराला उभारी देणारा ऊर्जा निर्मितीचा शब्द इथे नव्हता. शिवाय "पिक्चरला दर्दी अन् तालमीत गर्दी" करणारे भावी अर्नाल्डही कुठे भेटत नव्हते.
-प्रशांत सातपुते*
Comments
Post a Comment