तुंगाकाठी..भाग-१ : दोनाचे आठ..चाराचे तेरा..

    माझे आणि सौ चे आजवर भरपूर पर्यटन झाले. परंतु, अगदी शेजारच्या राज्यात असणारे हंपी, बदामी जायचे जायचे म्हणत नेहमी ते रहायचे. सोनूला चल म्हणालो. तसा, 'आईबरोबर दोनवेळा जावून आलोय', असे तो म्हणाला. मला मात्र, ते आठवत नव्हते.
     सौ ची अन् माझी बहुतेकवेळा चर्चा व्हायची. परंतु, दुसरीकडेच आम्ही भटकून यायचो. त्यामुळे ते रहात होते. यावेळी मात्र, जाम ठरवूनच टाकले होते. हंपी-बदामीशिवाय कोठे जायचेच नाही.  काही झाले तरी यावेळी जायचेच. एक-दोघा मित्रांनाही येण्याबाबत विचारले. त्यातील काहीजण जावून आलेले. तर, काहींना नोकरी-व्यवसायातून वेळ मिळेल असे वाटत नव्हते.
       नेहमीप्रमाणे चर्चा झाली. सुरुवातीला माझे एनसीसी चे शिक्षक डाॕ ब्रिजकिशोर राठोड सर आणि त्यांच्या सौ, रेखा राठोड मॕडम असे चौघेच जायचे ठरले. त्यानंतर कागलचे अनिल पोवार, बिना पोवार हे दोघे येण्यास उत्सुक असल्याचे समजले. त्यांच्या जोडीला लगेचच चंदनशिवेसरांच्या जोडीचा 'पर्यटक संगम' झाला.
     सुरुवातीला इर्टिगामधून जायचे ठरले होते. चाराचे सहा अन् सहाचे कधी तेरा झाले समजलेच नाही. पर्यटक वाढले तशी सुरुवातीच्या इर्टिगाचीही मग इनोव्हा झाली. इनोव्हाची अखेर १४ सिटर मिनी बस झाली. मित्र मधूकर हेरवाडे यांने कर्नाटक पासिंगची गाडी, कन्नड येणारा, स्थानिक ठिकाणांचा माहीतगार विशेष चालक शिवराज हा मागणीप्रमाणे सोबत दिला.
     कागलचे भास्कर चंदनशिवे, त्यांच्या सौ हेमलता मॕडम, सरिता बेलेकर मॕडम, मिरजेचे लक्ष्मण कदमसर, त्यांच्या सौ शालन, जयसिंगपुरातून स्वाती कोले आणि शरावती माने असे हे ज्येष्ठ-जेष्ठतेकडे जाणारे सरमिसळ पर्यटक सज्ज झाले.
  आम्ही सर्वजण यापूर्वी कोणत्या ना कोणत्या पर्यटन संस्थेच्या माध्यमातून विविध पर्यटनात एकत्र आलेलो होतो. ही टूर मात्र, आम्ही सर्वजण एकत्र येवून प्रथमच ठरवलेली होती.
       'हंपी बदामी टूर' या व्हाटस अॕप समुहाची बांधणीदेखील काही पळात लगेच झाली. समुहावर पर्यटनाचा मार्ग ठरला. ज्या वाहनाने निघायचे, त्याची अंतर्गत, बाह्य छायाचित्रे समुहावर पडली. सुरुवातीला केवळ हंपी-बदामी असणाऱ्या पर्यटनात मार्गातील एकेक स्थळे आपसूक येवून 'अम्हालाही बघायला या की राव,' म्हणत त्यांची भर पडू लागली. मध्येच आडवाटेवरील १२ ज्योतिर्लिंगमधील आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्री शैलम श्रावण नुकताच सुरु होत असल्याने वाढले. कदमसरांनी मधूच्यामाध्यमातून थेट आॕनलाईन दर्शनाची तिकिटेही काढली. ती समुहावर पडली. मग, राघवेंद्र स्वामी मठासाठी मंत्रालयम वाढले. अशी एकेक स्थळं पर्यटनाच्या वाटेला जोडली गेली. जसे चौघा पर्यटकांचे तेरा झाले, तशी स्थळं देखील दोनाची आठ झालीत.
     अखेर पर्यटनाचा दिवस उजाडला. पहाटेच कागलमधून पाचजणांना घेवून, शिवराज जयसिंगपुरात एकेकजणांना गोळा करत आलेला. प्रभातीच्या प्रसन्न रंगात समस्त महिला आपल्या सुंदर छबी प्रफुल्लतेने टिपण्यात व्यस्त होत्या. ते 'प्रभातीचे दर्शन' मोबाईलच्या 'नेत्रपल्लवीत' कायमचे बंदिस्त करण्यासाठी अनेक मोबाईल यावेळी पुढे सरसावलेले.
    नटराजमधील चहा-नाश्त्याने भरलेली पोटं घेवून, गाडीने मिरजेकडे आता कूच केलेली. तेथे आमच्या प्रतिक्षेत कदम दांपत्य थांबलेले. सामानाच्या बॕगा वर चढवण्याचा सोपस्कार पार पडला. त्यानंतर त्यांना गाडीने आतमध्ये सामावून घेतले. झरोक्यातून अंगावर गारवा घेत, विजयपुरा अर्थात विजापूरकडे गाडीने धाव घेतली. इतिहासाच्या गुहेत डोकावून पाऊलखुणा पुन्हा एकदा धुंडाळण्यासाठी..स्थापत्यकला.. शैली पाहण्यासाठी..
  ©️ *- कुसुमानंद*
(प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..