लुप्त कलंदर अन् गंगाराम

         सोनूचे हे महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष होते. सौ ला पहिली पदोन्नती मिळालेली आणि  दुसऱ्या पदोन्नतीसाठी रत्नागिरी साद घालत होती. तब्बल चार वर्षानंतर इंदोर सोडून गावी परतण्याचा निर्णय झालेला. चला तर मग उरले-सुरले, राहिलेलेही इंदोर फिरुन घेवू, म्हणून मी आणि सौ दुचाकीवरुन बाहेर पडलो. महानगरपालिकेच्या प्रसिद्ध 'कमला नेहरु चिडिया घर' अर्थात प्राणी संग्रहालयात गेलो. तिकीटाचा सोपस्कार पूर्ण करुन आतमध्ये प्रवेश केला. देखण्या वन्यजीवांची एकेक दालने पार करत पुढे सरकत होतो. एका भव्य जाळी समोर आल्यावर आतमध्ये खाली खंदक दिसला. वरुन पाहताना खंदकाला लागूनच एका बाजूला एक काळे अस्वल आपल्याच तालात एका टोकाहून दुसऱ्या टोकाला अगदी चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे एकसारखे येरझाऱ्या घालत होते. जणू शतपावलीच ती ! दुसरीकडे त्याची जोडीदारीण बसून होती. बराचवेळ त्याची चावी संपलेली दिसत नव्हती. आम्हाला पाहून अजिबात त्याचे लक्ष विचलित होत नव्हते. आपल्याच येरझाऱ्यात तो रममाण झालेला.
       सिक्किमनंतर आज पुन्हा प्राणी संग्रहालयात अस्वल पहात होतो. मनाच्या गाडग्यात आठवणींच्या रविने क्षणात घुसळायला झालं. अन् खोलवर रुतलेला 'गंगाराम' नवनितासारखा वर तरंगू लागला, अगदी त्याचा मालक 'कलंदर' सोबत..!
        तो आठवड्याच्या सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार असायचा. हा तसा गावच्या बाजाराचा दिवस ! या दिवशी समस्त गल्ली गजबजलेली असायची. शनिवारीच संध्याकाळी पगार झाल्याने, गल्लीच्या हातात रात्रीतूनच पैसा खेळायचा. हे खुळखुळणारे हात दुकानदाराची जुनी उधारी भागवत. दुकानदारही खुशीने लागेल ते वाणसामान देवून, उधारीचे नवे पान वहीत लिहीत रहायचा. खुळखुळणाऱ्या पैशाची किणकिण माहीत असल्याने जणू त्यात 'आपला हक्काचा हिस्सा' समजून भटक्या, कलाकार मंडळींचा राबता त्या दिवशी ठरलेला. डोक्यावर जग घेतलेली जोगतीण, हाती परडी घेतलेले जोगते, वाघ्या-मुरळी अशा देवभोळ्या जोगवा मागायला आलेल्या माणसांबरोबरच ओंजळभर पीठ, तांदूळ, ज्वारीसाठी आणि चवली-अधेलीसाठी कलाकारांची गल्लीत रेलचेल वाढायची. त्यातच काखेत हत्यारांच्या पत्र्याची पेटी अडकवून बादली, घागरीला तळ मारुन देणारा, गळक्या प्लास्टिक बादलीचा बंदोबस्त करणारा हमखास दत्त असायचा. बिडी शिलगावत तो गिऱ्हाईकाच्या शोधात बसून रहायचा. त्याची सोबतीण भाता पेटवण्याच्या लगबगीत रहायची.
     महिना-सहा महिन्यातून कधीतरी एक-दोनदा 'कलंदर' दरवेशी यायचा. कधी जनावरांसारखे चार पावलांवर, तर कधी माणसांप्रमाणे मागच्या दोन पावलांवर चालत सोबत काळेकुट्ट केसाळ 'गंगाराम' अस्वल त्याच्या सोबत असायचे. हा गल्लीत येतोय याची प्रथम चाहूल भटक्या कुत्र्यांना लागायची. त्यांच्या एकसारख्या भुंकण्याने ती गल्लीला कळायची. गंगारामच्या हाता-पायातील आणि गळ्यातील घुंगराच्या निनादाने घरातली पावले त्याच्याकडे ओढली जायचीत.
      लगेचच त्याच्या भोवती कोंडाळे पडायला सुरुवात होई. यात आम्हा पोरा-टोरांचा भरणा अधिक ! रेंगाळणारी मोठी माणसेही एकेक पावले टाकीत कोंडाळ्यात विरघळायचीत. भोळ्या-भाबड्या बायका तान्हुल्याला हाती नाचवत, पाठीवर टाकत, तर कोणी नागड्या-उघड्या शेंबूड गळक्या नाकांना काखेत मारुन सावरुन कोंडाळ्याच्या भिंतीत स्वतःला लिंपून घेत.
      अंगात मांजरपाट बंडी, त्यावर दोन-चार ठिकाणी उसवलेला, मळकट, घामेजलेला सदरा. कंबरेला लुंगी, एका हातात वेताची काठी आणि दुसरा हात गंगारामची दोरी पकडलेला. असा हा कलंदर दरवेशी अघळ-पघळ हिंदी मिश्रीत मराठी बोलून नावाप्रमाणे कलंदरपणे खेळ करायचा. गंगाराम अस्वलाच्या नाकावर, गळ्यात चामडी पट्टा असायचा. त्या पट्ट्यावर बरोबर कपाळावर लोखंडी रिबीट मारलेले असायचे. हा मोळा 'अस्वलाच्या कपाळातच मारलाय. म्हणून ते गपगुमान सांगेल तसं ऐकतय..' असा शोध कुणीतरी लावलेला असायचा. ते ऐकून भारी आश्चर्य वाटायचं.
     दरवेशाच्या इशाऱ्यावर हे मुके जनावर मान डोलावी. कधी नकार घंटा दाखवत, तर कधी 'गंगाराम लढाई मे जाएगा..' म्हटल्यावर होकारार्थी मान हलवत दोन पायावर ताडकन उठून उभे राही. आणखीही पाल्हाळीकपणे निवेदन करत तो खेळ लांबवत रहायचा. अधे-मधे  त्याच्या निवेदनावर गंगारामने केलेल्या हरकतीमधून कोंडाळ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलत रहायचे.
       या खेळातून कोंडाळ्याच्या कोनाड्यातून दरवेशाला चार-आठ आणे मिळायचे. कोणी धान्य-धुन्य द्यायचे. त्यावर त्याची रोजी रोटी चालायची. काही महिला श्रध्देने अंगडं-टोपडं घातलेल्या बाळुत्यातल्या बाळांना अस्वलाच्या पाठीवर झोपवण्यासाठी द्यायच्या. अलगदपणे गंगारामच्या पाठीवर झोपवून आशीर्वाद द्यायला लावायच्या. गंगाराम पुढील उजवा पाय हाताप्रमाणे वर उचलून निष्णात तपस्वीप्रमाणे आशीर्वाद द्यायचा. मग काखेतील शेंबडं पोर नागड्यानेच पाठीवर बसवायला बायका त्याच्या हातात द्यायच्या. ते घाबरलेलं पोरदेखील गंगारामच्या पाठकुळी बसून, आशीर्वाद घेवून आईच्या हाती जाई. एखादी पोरगी जोरात भीतीने केकाटायची. त्यावर, 'की गे..क्या हुया..घाबरु नुको..' असे म्हणत तिला बेताने त्याच्या पाठीवर बसवायचा.
       कलंदर, अस्वलाची महती बडबडून रुपया-दोन रुपया बायकांकडून बिलंदरपणे काढायचा. चिमटीने केस उपटून बायकांना द्यायचा. ताईत करुन बाळाच्या गळ्यात बांधायला सांगत रहायचा. 'बाळाला कुणाची नदर लागणार नाय. ते डरणार नाय. झोपेत दचकणार नाय. बच्चा रोता नै सोता रहेगा..' असे काय बाय सांगून आणखी दोघा तिघांना गिऱ्हाईक बनवायचा.
  आम्ही पोरं त्याची नजर चुकवून मिळतील तेथून गंगारामचे केस चिमटीने उपटायचो. तो वेदनेने रागात आवाज काढून आमच्याकडे गुरकायचा. तसा कलंदर कधी आमच्या दिशेने, तर कधी त्याच्या दिशेने वेताची काठी हळूवार दोरीवर आपटायचा. तो पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असल्याने, कधीही तो त्याच्यावर चिडायचा वा त्याला मारायचा नाही. 'चुकून-माकून त्याला काय झालं, तर एवढं शिकल्यालं जनावर पुन्ना परत घावायचं नाय', ही चिंता त्याला कायम असायची.
      बाजारचा दिवस असल्याने कुणी पिशवी भरुन नुकताच बाजार घेवून घराकडे चाललेला असायचा. कोंडाळ्यातील कुणाचे तरी हात त्या पिशवीत आपसूक शिरत. एखादी काकडी, गाजर काढून गंगारामला दिले जाई. कधी मजेने टोमॅटो दिला जाई. काकडी-गाजर खुशीने खाणारा गंगाराम हा आंबट तोंडाने अर्धवट टोमॅटो मातीत घोळवायचा. हाती जमलेला चिल्लरचा खुर्दा डोकं खाजवत कलंदर मोजत रहायचा. 'गंगारामला कण्या खायला आवडतात. दोन किलो येरवाळी आणि दोन किलो संध्याकाळी भरडून द्यावं लागतं त्याला.' असं सांगून तो त्याच्यासाठी जोंधळे आणि कुटुंबासाठी पीठ, तांदूळ मागायचा. मिळालेलं सगळं तो काखेतल्या खाकी मळकट पिशवीत जमा करायचा. कापडी पिशवीला वेगळे कप्पे असत. त्यात तो धान्य वेग-वेगळं ठेवी. गरजेनुसार पोरा-सोरांची, एखादं घरवालीसाठी लुगडं मागून घ्यायचा.
      *खेळ संपल्यानंतर मिळालेली बिदागी घेवून, गंगारामसह तो हसऱ्या समाधानी चेहऱ्याने दात्याला भरभरुन आशीर्वाद देत, पुढच्या गल्लीत प्रस्थान करायचा. आता त्या गल्लीतील दबा धरुन बसलेली कुत्री, तो येत असल्याची वर्दी गल्लीत द्यायला कमी करत नसत.*
    *हा दरवेशी म्हणजे केवळ मनोरंजनाचा खेळ नव्हता. तर, तो वाहत्या लोकसंस्कृतीचा अन् प्राणीमात्राविषयी विशेषत: जंगली प्राण्यांविषयी आपुलकी निर्माण करण्याचा फिरता कलामंच होता. ते अस्वल केवळ जंगली प्राणी नव्हते. तर, दरवेशाच्या आयुष्याचं, कुटूंबाचे स्पंदन होते. रानवाटा सोडून माणसांच्या वस्तीत आलेलं ते एक अबोल नृत्य होतं. मालकापरी समर्पण होतं. दरवेशी आणि अस्वल म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातील अनोख्या, अनामिक नात्याची, ओढीची ती गाथा होती. जिथे भाषेची गरज नव्हती. तिथे भावनांनी संवाद साधला जात होता.
     दरवेशाच्या काळजीच्या रेषांवर ती हुकमी मात्रा होती. त्याचे ते समाधान होते. त्याच्या आवाजातली ती विशिष्ट काळजाला हात घालणारी हाक आणि अस्वलाच्या गळ्यात रुळणाऱ्या घंटेचा, घुंगरांचा तो निनाद..हे सारं आजही मनाच्या खोल कप्यात कुठेतरी घर करून आहे. त्याचे फाटके कपडे, त्याच्या हातातली ती जुनाट डफडी आणि त्यातून निघणारा तो जीवघेणा स्वर, हे सारं क्रूर काळाच्या जबड्यात कधीच ढेकर होवून गेलं. त्याची जागा आज हातातील यंत्रातून बाहेर पडणाऱ्या कृत्रिम ध्वनीने आणि निर्जीव दृश्यांनी घेतली आहे.
     वन्यजीव संरक्षण कायद्याने प्राण्यांच्या खेळांवर बंदी आली. जसे सर्कशीमधले प्राणी गायब झाले. तसाच बालपणीचा मला गल्लीत भेटणारा माझा गंगाराम ! अस्वलाचा खेळ 2009 ला शेवटचा ठरला. बदललेली जीवनशैली आणि आधुनिकतेच्या लाटेत दरवेशाची कला आणि त्याच्या आयुष्याची दोरीच तुटली. एकेकाळी लोकांना आनंद देणारी ही कला, हे नातं आता केवळ इतिहासाच्या पानांवर कोरलं गेलं. हा केवळ एका व्यक्तीरेखेचा अंत नव्हे, तर एका परंपरेचा, एका कलेचा आणि एका हृदयस्पर्शी जीवनशैलीचा कायमचा विसावलेला प्रवास होय..!
       आजच्या अन् नव्या पिढीला प्राणी संग्रहालयात अनेक अस्वलं पहायला मिळतील. ती आपल्याच नादात आजच्यासारखे इकडून तिकडे फिरताना दिसतील. पण, कलंदरच्या भाषेवर, इशाऱ्यावर आपले कसब दाखवणारा आणि त्याला जगवणारा आमचा 'गंगाराम' मात्र, कदापि आता थेट गल्लीत दिसणार नाही. काळाच्या ओघात अनेक तारे निखळतात. काही नवे जन्माला येतात. दरवेशी हा देखील निखळून काळाच्या उदरात लुप्त झालेला. 'डर घालवणारा' गंगारामच्या केसांचा तो ताईतही त्यापैकीच एक ! त्याच्या आठवणीने अलगद हात उगीचच गळा चाचपत राहिला..
    -कुसुमानंद
(प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..