'कल्हई’ चा ढंगच न्यारा..!
‘कल्हई’ करणार... तांब्या पितळेची भांडी कल्हई करुन देणार...चांदीचा रंग आणणार...' अशा आरोळ्यांनी गल्लीत झोपलेली दुपार जागी व्हायची. उंबऱ्याकडे लावलेलं उसं जागेवरच हलायचं. जागेवरुनच मुंडी तिरपी करुन किलकिले डोळे बाहेर डोकावायचे. फाटक्या बंडीतला, डोक्यावर मुंडासं गुंडाळलेला आणि धोतराच्या काचा गुडघ्यापर्यंत मारलेला अगतिक कल्हईवाला विनवणी करत दारात उभा राहिलेला दिसायचा.
कधी कधी हे चित्र उलटे असायचे. नागडं पोर काखेत मारुन, काळी पण, रेखीव चेहऱ्याची, जुनेर नेसलेली बाई आरोळी देत उभी असायची. मध्येच पोराचं गळणारं नाक डाव्या हाताच्या बोटांच्या चिमटीने क्षणात बंद करायची आणि बोटं जमिनीला मातीत, बाजूच्या भिंतीला नाहीतर कपड्याला पुसायची.
या आरोळ्यांनी गल्लीतील घरात हालचाल व्हायची. धूळ झटकत जुन्या कपाटातून, खुंटीवरील फळीवरुन वा माळ्यावरुन अडगळीतील पोत्यात कोंबून ठेवलेली तांब्या-पितळेची भांडी बाहेर काढली जात. यात विशेषत: पितळी पातेली, चुकून एखादा पितळी जेवणाचा डबा आवर्जून असायचा. गल्लीत एखाद्या लिंबाच्या, गुलमोहराच्या झाडाखाली गारव्याला वा दुकानाच्या, छपराच्या आडोशाला हा कल्हईवाला आपला भाता जमीन उकरुन मातीत त्याची नळकी सोंड लिंपायचा. त्याच्या सोंडेला कोळसं टाकून, प्रथम आपली कानावरची बिडी काढून ती पेटवायचा. आपल्या तोंडात ठेवायचा. भात्याची सोंड पेटवण्याच्या तयारीत कल्हईसाठी येणाऱ्या भांड्यांची वाट पहात धूर सोडत रहायचा. हे बघताना मजा वाटायची.
माझ्या बालपणी आमच्या घरी, जवळपास सर्वांच्याच घरी त्यावेळी कमी-जास्त प्रमाणात पितळेची भांडी हमखास होती. यात पाणी तापविण्यासाठी हंडे, पिंप, तांबे, पातेली यांचा खास राबता असायचाच. सकाळच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणापूर्वी त्यांना लख्खपणा देण्यासाठी समस्त महिला वर्गाचा सायंकाळी खास राखेने भांडी घासण्याचा, धुण्याचा कार्यक्रम असायचा. मीठ, रांगोळी, चिंच किंवा लिंबूच्या सहायाने ही भांडी लख्ख काढण्यात महिलावर्गाची चढाओढ लागायची. यावेळी गल्लीतल्या विशेष घडामोडींवर हमखास गप्पा हाणल्या जायच्या.
भांड्यांच्या वजनदारपणामुळे त्यांची हाताळणी अधिक जडावायची. शिवाय दररोज त्यांचे घासणे-पुसणे हे दिवसेंदिवस कठीण व्हायचे. शिवाय आर्थिक चणचणीमुळे, घरच्या व्यसनीपणामुळे अशी भांडी समस्त घरचा उंबरा ओलांडून भांड्याच्या दुकानातील मोडीत विसावलीत. कधी मोडीवर, जुन्या कपड्यांवर विशेषतः साड्यांवर मिळणारी ॲल्युमिनीयमची हलकी चंदेरी, स्टीलची चकचकीत नाजूक भांडी नव्या सुनेप्रमाणे घरात वावरु लागली. कर्त्या सुनेप्रमाणे त्यांनी घराचा कब्जा घेतला. पितळी हंडा, तांब्याचा बंब यांच्या जागी डिचकं, मोठे पातेलं झाकणासह आलं. लाकडी काटवट जावून परात आली. स्वयंपाक घरातही स्टीलचा चकचकीतपणा रुपडं दाखवत होता.
माझ्याही घरी त्याकाळी असणारी पितळेची जडशीळ भांडी काळाच्या ओघात, परिस्थितीनुरुप कधीच मोडीत काढलेली होती. आज हे सगळं आठवण्याचे कारण म्हणजे सौ कडे असणारी पितळेची चार नवी पातेली ! ४० वर्षांपासून तिच्या घरी असणारी ही पातेली लग्नानंतर सौ ची पाठराखीण म्हणून घरी आलेली. माझ्या आणि तिच्या नोकरीच्या निमित्ताने ही वजनदार भांडी सतत सोबत वावरायची आणि ती दृष्टीस पडली की ‘एक साधा कल्हईवाला मिळत नाही..शोध ना प्रशांत...’ असे तिचे नेहमीचे बोल परत परत ऐकून घ्यावे लागत. मी ही 'शोधतो' म्हणून वेळ मारुन न्यायचो. कामाच्या व्यापात विसरुन जायचो. तर कधी आठवणीने कल्हईवाला शोधत रहायचो.
माझ्या लहानपणी १२ व्या गल्लीत दत्तमंदिराशेजारी स्टोव्ह, गॕसबत्ती दुरुस्तीच्या दुकानासमोर एक कल्हईवाला आपले काम करीत बसून असायचा. शाळेला जाताना तो नेहमी नजरेस पडायचा. त्याची ती चंदेरी कला येता-जाता डोळ्यात साठवत असू.
कल्हईवाल्याला शोधताना चिपरीतही एकजण होता. परंतु, ती पिढी कधीच लोपलेली, हे समजले. दत्तमंदिराजवळ जावून गॕस दुरुस्ती दुकानात चौकशी केल्यानंतर अखेर कल्हईवाल्याचा शोध थांबला. नांदणी रोडला टेकडीच्या सुरुवातीलाच विलास माने 9552622879 यांचा नंबर मिळाला. तसे ते रिक्षा चालवतात. पण, कल्हईची कामे आल्यास, ती करुन देतात.
त्या सायंकाळी मी आणि सौ भांडी घेवून त्यांच्या घरी गेलो. त्यांचा मोबाईल बंद लागत होता. तेथील मुलाने सांगितले, ते रद्दी घालण्यासाठी गेले आहेत. वाट पाहून घरी परतलो.
दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळीच त्यांना फोन केला. तर, ते हे सांगलीला गेले होते. 'परत आल्यावर फोन करतो,' असा निरोप त्यांनी दिला. मला सोमवारी पहाटे रत्नागिरीला निघायचे होते. आजच रविवारी इतरही सर्व कामे उरकायची होती. त्यातच मोठ्या मुश्किलीने सापडलेला, प्रलंबित असलेला कल्हईचा कार्यक्रम एकदा उरकायचा होता. वाट पाहून सायंकाळी मीच पुन्हा फोन केला. भांडी घेवून या म्हणाले. तसे आम्ही दोघेही तडक त्यांच्याकडे गेलो.
विलास माने कथिल आणायला गेल्याचे समजले. तोपर्यंत त्यांच्या वृध्द आईशी गप्पा मारल्या. त्यातून समजले की, त्यांचे मालक कल्हई करण्याची कामे करायचे. विलास यांनी ही कला त्यांच्याकडूनच शिकली आहे.
कथिल नवसागर घेवून ते आले होते. मोठी गॅस शेगडी पेटवून त्यांनी तासाभरात चारही पातेली कल्हई करुन, अगदी आतून चांदीची करुन दिलीत. ती नवी चांदीची लख्ख भांडी पाहून सौ चा चेहरा एकदम खुलला होता आणि माझाही ! बऱ्याच वर्षांनंतर भात्यावर चालणारी ही कला गॕस शेगडीवर पहायला मिळाली होती. चला एकदाचे.. मोठे कठीण काम संपले.., अशा अविर्भावात मी ही समाधानी ठरलो.
तांबे आणि पितळ हे दोन्ही धातू आम्ल आणि क्षारांशी लवकर क्रिया करतात. भांड्यांमध्ये पदार्थ 'कळकायला' सुरुवात होते. म्हणजे अन्नपदार्थ खराब होतात. ही भांडी तापवून नवसागराच्या सहाय्याने कथिलचा पातळ थर दिला जातो. कथिल हे मानवासाठी एक वरदान मानले जाते. कारण, रोगप्रतिकारक शक्तीच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.
‘चुडा माझा सावित्रीचा’ या १९७१ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात अभिनेते शरद तळवळकर यांनी कल्हईवाल्याची भूमिका करुन, या व्यवसायाला प्रतिमा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. काळाच्या ओघात पितळेची भांडी गेली. पुन्हा नव्याने ती आता कौतुकाने दिमाखात नव्या पिढ्यांमधील घरात स्थिरावत आहेत. ‘कल्हई करणार..चांदीचा रंग करुन देणार..’अशी आरोळी ठोकणारा कलाकार वर्ग काळाच्या पोटात गडप झाला आहे.
कौतुकाने यू-ट्युब च्या माध्यमातून कधीतरी करणे हे ठिक. पण, नव्या पिढीत ही कला फार कोणी शिकेल आणि त्याला उर्जितावस्था देईल, हे सांगणे कठीण आहे. 'माझ्या कल्हईचा न्याराच ढंग, देतो भांड्यांला चांदीचा रंग..’ या शरद तळवलकरांच्या गाण्यातून मात्र, या कल्हईगार..कलाकाराचे अस्तित्व तेवढे टिकून राहील..तहहयात..
- कुसुमानंद (प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)
Comments
Post a Comment