माझ्या लेकरांनो.. पुन्हा या रे…आठवणींच्या उबीला भेटण्यासाठी ..बळवंतराव झेले हायस्कूलमध्ये जमला 'दहावी 1992' चा गोतावळा

     
ए नानू..विनू..टक्कल पडली रे तुमची.. पण, अवखळपणा काही केल्या जात नाही तुमच्या अंगातला तुमच्या. संजू लेका सोड की तो खोडीलपणा..शिक जरा निर्मल आणि विनूकडून..दिपा, मनी, स्नेहल, वसू, वैशू तुम्ही पोरी मात्र, अजून तशाच तजेलदार, हसतमुख आहात बरं का. नाहीतर ही बाप झालीत तरी..अजून लहानच समजतात स्वतःला..वांडपणा करत असतात..!
      आपला दाद्या गेला..कवू गेली..सुजाता गेली..दावल, सलिम गेला..सोन्यासारखी माझी एकेक पोरं काळानं मड्यावर घातली.. वाटोळ्ळं होईल त्याचं..त्याचा तरी काय दोष म्हणायचा..त्यांचा इथला शेरच संपला म्हटल्यावर..पण, पालनकर्ती का असंना..तुमची आई म्हणून काळीज तुटतं रं..माझं..असो..!
    तुम्ही फार शिकला..मोठ्ठं झाला..बघून भारी समाधान वाटतंय. असंच एकमेकांची काळजी घ्या..माझ्या लेकरांनो..पुन्हा या रे..तुमच्या आईच्या पदराच्या उबीला मी वाट पाहीन..!
   मी बळवंतराव झेले हायस्कूल शाळा ! 1964 सालचा माझा जन्म…जन्मापासून माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी असंख्य लेकरांच्या किलबिलाटाने आणि त्यांच्या उत्साहाने न्हाऊन निघाली आहे. जन्मदात्री नसली, तरी पालनकर्ती यशोदा होवून मी आजवरच्या माझ्या या प्रदीर्घ प्रवासात कितीतरी पिढ्या माझ्या कुशीत शिकवल्या, वाढवल्या अन् आपले पंख पसरुन आपापल्या क्षेत्रात भरारी मारण्यासाठी सज्ज केल्या. तुम्ही सारी होता, सगळा नुस्ता गजबजाट होता. मन मोहरुन जायचं रं तुमच्या असण्यानं..
    काळ सरकत गेला..पाखरं उलगली. खळं रिकामं पडावं, अगदी तसं झालं. आज पुन्हा मला नव्या नवेलीचा दिवस आला. आजचा दिवस माझ्यासाठी सुवर्णक्षण होता. दहावी झाल्यानंतर तुम्ही सगळी पंख फडफडवीत जी गेला, ती गेलाच..
  आज तुमच्या येण्याच्या गंधानं, चाहुलीनं, जाणीवेनं माझ्या म्हातारीचं कान, नाक जवान बनले. पाहण्यासाठी डोळे भिरभिरु लागले. अंगात सौदामिनी संचारली रं नुस्तं.. 33 वर्षांनी माझ्या अंगणात माझी पोरं पुन्यांदा आली. हे करु, की ते करु माझ्या मेलीचं ध्यानच सुधरंना आज..
  *माझ्या लाडक्या पोरांना.. म्हणजेच माझ्याच अंगणात बागडलेल्या, माझ्याच ज्ञानमंदिरातून १९९२ साली दहावीचा उंबरठा ओलांडलेल्या माझ्या विद्यार्थ्यांना पाहून माझे मन अक्षरश: हरखून गेलंय. तुमच्या भेटीने माझ्या वयाला नवचैतन्याचा स्पर्श झालाय. माझ्या जुनाट भिंतींनाही जणू तरुणपणाची उब मिळालीय.
     अंगणात आज सकाळपासूनच तुमची लगबग सुरु झाली. अन, जुन्या आठवणींचा दरवळ अंगभर पसरत गेला. ३३ वर्षांपूर्वी माझ्याच अंगा-खांद्यावरील वर्ग खोल्यांमध्ये तुमची पावले थिरकत होती. तुमच्या स्वप्नांना माझ्याच छायेत पंख फुटले होते. तेच चिमुकले विद्यार्थी आज प्रौढ, कर्तृत्ववान बनून तुम्ही सारेजण आला आहात. डोळ्यातील तीच निरागस चमक, तीच बालसुलभ उत्सुकता आजही थेट दिसली. जी मी तुमच्या बालपणी माझ्या अंगणातील मैदानात खेळताना, व्हरांड्यात वावरताना पाहिली होती.
    काळाच्या ओघात शरिरावर कितीतरी खुणा उमटल्या असल्या, तरी तुमच्यात माझ्याप्रतीचे प्रेम, जुन्या मैत्रीची ओढ ठळकपणे दिसणारा गाभा तोच राहिला आहे. एकामागून एक माझी विद्यार्थी-लेकरं माझ्या भेटीला येवू लागली. प्रत्येक लेकराच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद आणि ओसंडून वाहणारी उत्सुकता होती. काहींनी इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एकमेकांना पाहिले होते. तुमच्या भेटीच्या क्षणांनी माझ्या जुनाट भिंतींनाही ओलावा निर्माण झाला. तुमच्या मिठ्यांनी डोळ्यांतील अश्रू हे जुन्या आठवणींच्या गहिरेपणाचे आणि पुन्हा एकत्र येण्याच्या समाधानाचे होते. कित्येकांच्या डोळ्यात भूतकाळाची रम्य सफर स्पष्ट दिसत होती. गप्पांच्या प्रत्येक शब्दांतून माझ्या बालपणीच्या आठवणी जिवंत होत होत्या. तर काहींच्या मनात गुलाबी आठवणी पुन्हा तळातून वर येवून तरंगत होत्या. त्या रुंजीत हरवलेल्या जाणवल्या.*
   आजचा दिवस केवळ एका भेटीचा नव्हता. तर, तो भूतकाळाला उजाळा देणारा, आठवणींचे मोहोळ उठवणारा होता. वर्ग-खोल्या, प्रशस्त मैदान, जुनी विशाल झाडे, मधूनच पळून जाणाऱ्या खिडक्या, लाकडी बाकं या साऱ्यांनी तुमचा खोडकरपणा,‍ निष्पाप हसणे, रुसवे-फुगवे, पुन्हा एकत्र येणं पाहिले आहे.
   माझ्या साक्षीने तुम्ही सर्वजण शालेय जीवनातील किस्से रंगवून सांगत होतात. गुरुजनांच्या लकबी, आठवणी, त्यांच्या नकला, त्यांच्या छडीने खाल्लेला मार, परीक्षेतील दाखवा-दाखवी, स्नेहसंमेलनातील अविस्मरणीय क्षण, नाटकाच्या तालमीतील आठवणी, शालेय स्पर्धेतील यश, पीटीच्या नावावर हिरवळीवर रंगलेल्या गप्पा.. हे सारं ऐकून माझ्या मनात वेगळ्या समाधानाची भावना उमटली.
    माझ्या पोरांनी जीवनात किती प्रगती केली, आई म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे. कोण डॉक्टर झाला, कोण इंजिनियर झाला, कोण शिक्षक झाला, कोण अधिकारी झाला. तर, कोणी यशस्वी उद्योजक बनून आपले स्थान निर्माण केले. कुणी घराला स्वर्ग बनविणारी गृहिणी बनली, तर, कोण समाजासाठी समृध्दी पेरत अन्नदाता बनला. माझ्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा, संस्काराचा वापर करुन खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांनी आपले जीवन उज्ज्वल केले. या सर्वात माझ्या मेलीचा मोठा वाटा आहे, यावर भरभरुन तुम्ही सगळ्यांनी स्तुती केलीत. हे जाणून माझ्या वृध्द देहालाही एक स्फूर्तीचा तजेला आला. खरंतर, तुमचे प्रयत्न, मान-अपमान, यश-अपयश पचवून तुम्ही प्रत्येक कसोटीवर स्वतःला सिध्द केलेत, तुमचे कर्तृत्व हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
    दगड-विटा, सळ्या-सिमेंटची मी केवळ एक इमारत नसून, मी एक जिवंत स्पंदन आहे. हे मला आज नव्यानं, तीव्रतेनं आणि प्रकर्षानं जाणवलं. माझ्या भिंतींनी कितीतरी पिढ्यांचे भविष्य घडताना पाहिले आहे. कितीतरी स्वप्नांना सत्यतेची भरारी दिली आहे. प्रत्येक वर्गात, वर्गातील बाकांवर तुमच्या अस्तित्वाच्या, आठवणींचा सुगंध दरवळतोय. आज माझ्या लेकरांनी, जुन्या विद्यार्थ्यांनी मला भरभरुन प्रेम दिले. तुमच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून माझे तुमची पालनकर्ती आई म्हणून सार्थक झाले. तुम्हा सर्वांनी दिलेलं प्रेम, हेच माझ्या मातृत्त्वपणासाठी खरे समाधान आहे.
    दहावी 1992 बॅचचा तुमचा गोतावळा माझ्या स्मृतिपटलावर कायमचा कोरला जाईल. माझ्या प्रिय लेकरांनो, तुम्ही असंच आयुष्यात यशस्वी व्हा. आनंदात रहा ! तुमच्या आठवणींनी माझे हे जुने दगडही नेहमीच आनंदाने डोलत राहतील. माझ्या अंगा-खांद्यावर खेळलेल्या तुमच्या आठवणींनी मला कायम टवटवीत ठेवतील. मी नेहमीच तुमची वाट पाहात राहीन, माझ्या या जुन्या घरात नव्या आठवणींच्या उबेत भेटण्यासाठी..! तुम्हीच तर माझे अनमोल वैभव आहात. काळजी घ्या रे.. इतक्या अकाली काळाच्या फसी पडू नका.. मैत्री टिकवा..आरोग्य जपा..पुन्हा येताना सोबत नातवंडं असू द्या..मी वाट पाहीन तुमची..!
 -कुसुमानंद (प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते)
९४०३४६४१०१
0000

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..