भोसले सायकल मार्ट..दळण-वळणाचे एक केंद्र..!
"अंधेरी रात थी..वो मेरे साथ थी..मैं उसके उपर था..वो मेरे निचे थी..बताओ वो मेरी कौन थी..?" अशी अनेक तर्कावर आधारित बौध्दिक चाचणी घेणारी शाब्दिक कोडी ज्याला कधीकाळी 'हुमान' म्हणून ओळखले जायचे, ती प्रत्येकांंनीच अवकाशातील टांगलेल्या झुंबरांच्या, तारकापूंजांच्या चमचमणाऱ्या काजव्यांत अंगणात बसून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. काहिंनी सोडवली देखील असतील.
होय, वाचकांनो वरील प्रश्नाचे अपेक्षित उत्तर 'सायकल' आहे. पूर्वीच्या काळी घड्याळ, रेडिओ आणि त्यापुढे जावून सायकल असणे, हा गावात कौतुकाचा आणि प्रतिष्ठेचा विषय गणला जाई. या वस्तू पहायला कधीकाळी गाव लोटले जाई, हे आजच्या पिढीला नवल वाटेल.
पुढे म्हणजेच आपल्या बालपणी ज्यांना सायकल विकत घेणे परवडत नसायच्या, त्यांच्यासाठी सायकली भाड्याने मिळत. जयसिंगपूर बसस्थानक आताच्या क्रांती चौकात कोणी उतरला तर तेथूनच पुढे अवघ्या २५-३० पावलांवर 'भोसले सायकल मार्ट' आहे. अगदी आजही जसेच्या तसे मूळ अंगात वसलेले. लाकडी फळ्यांच्या झडपेत बनवलेला दरवाजा ही 'दुकानाची' खरी ओळख आजही मार्टने टिकवून ठेवली आहे.
आतमध्ये प्रवेश करताच पूर्वीच्याच काळ्या पाषाणातील दगडी फरशा आजही ज्येष्ठतेचा अनुभव देतात. समोरच सागवानी लाकडातील कपाटे, संदूक हे अस्सल भक्कमतेची साक्ष देतात. उजव्या बाजूच्या भिंतीवर मार्टचे संस्थापक दिवंगत दत्तात्रेय भोसले त्यांचे चिरंजीव दिवंगत वसंत भोसले यांच्या तसबिरी टांगलेल्या आहेत. डाव्या बाजूला आणि दारात विक्रीसाठी ठेवलेल्या नव्या सायकली, मोटरसायकलींचे टायर्स, अडकवलेले काही सुटे भाग यातून कालानुरुप कात टाकत स्वीकारलेले नवेपण दिसते.
राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर व्यापारी नगरीत शेजारच्याच जैनापूर, दानोळी, कोथळी, उमळवाड, नांदणी, हरोली, सांगली, धामणी, अंकली, उदगाव, आगर या भागातून व्यापारानिमित्त शेतकरी, कामगार, छोटे-मोठे व्यापारी यांची रेलचेल असायची.
चौकात उतरल्यावर जवळच्याच भोसले सायकल मार्टमधून सायकल भाड्याने घ्यायची आणि आपली दिवसभरातील कामे उरकून, ती जमा करुन पुन्हा एस टी ने माघारी परतायचे. कधी-कधी वेळ झाला आणि वस्तीची शेवटची एस टी गेली की गावी माघारी परतण्यासाठी भाड्याची सायकल हा एकमेव हक्काचा पर्याय असायचा. याचे कारण म्हणजे दुकानाच्या मागेच भोसले कुटुंबीय रहायचे, म्हणजे आजही रहात आहे. रात्री-अपरात्री हक्काने दुकानाच्या लाकडी फळ्यांवर प्रवासी याचकाची थाप पडायची ती केवळ सायकलीसाठीच!
दिवंगत बंडा ऊर्फ शिवाजी आणि राजू भोसले हे दोघेही माझे शाळकरी मित्रच! राजू तर अगदी ७ नंबर शाळेपासूनचा वर्गमित्र. त्यामुळे बहुतेकवेळा भोसले सायकल मार्टमध्ये जाणं असायचं. सायकलीत हवा भरणे, पंक्चर काढणे, रिमचा आऊट काढणे यासारखी कामे पहाताना अगदी गंमत वाटायची. तो सुलोचनचा वास आजही नाकात बसलेला आहे. घरी बाटलीचा दिवा बनवायला लागणाऱ्या इनर ट्यूबच्या व्हाल्वची गरज इथूनच पूर्ण व्हायची.
सायकल चालवायला शिकणे हे बालपणी एक दिव्यच असायचे. खरंतर उंच असणारा २४ इंची, मध्यम उंचीचा २२ इंची सायकलीला मोठ्यांकडून मागणी असायची. सुरुवातीला नळ्यांच्या त्रिकोणी सांगाड्यात उजवा पाय घालून डाव्या हाताने उजवे हँडल पकडून आणि उजव्या हाताने सुरुवातीला आडवी नळी नंतर जमेल तसे उजवे हँडल पकडून हे प्रशिक्षण जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली चालायचे. अगदी काही काळच हे 'जाणकाराचे' मार्गदर्शन लाभायचे. यानंतर हाताचे कोपर-ढोपर सोलटायचे, गुडगे फुटायचे, कधी सायकल अंगावर घेवून उताणे पडलेले अनेक प्रशिक्षणार्थी याच 'भोसले सायकल मार्ट' च्या कार्यशाळेच्या सौजन्याने पुढे उत्तम सायकल पटू तयार झाले.
सायकल पडल्यानंतर हँडल एका बाजूला वळलेले असायचे. आता सायकल बिघडली, सायकलवाल्याला भरुन द्यावी लागणार म्हणून घस्याला कोरड पडायची. वर आणि घरचा मार मिळणार, या भितीने पोटात गोळा उठायचा तो वेगळा. परंतु, गल्लीतील एखादा जाणकार दोन्ही पायांच्यामध्ये सायकलीचे पहिले चाक धरुन हाताने हँडल सरळ करुन देई. यानंतर खूप हायसे वाटायचे. विहिरीत पोहायला शिकण्यानंतर सायकल चालवायला शिकणे, हे त्याकाळी एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद देवून जाई.
सायकल शिकताना ज्याची ढोपरं- कोपरं आणि गुडघे सोलटली नाहीत, असा दुर्मीळ बहाद्दर मिळणं अशक्यच आहे.
सायकल शिकण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या सायकलींसाठी ५० पैसे तास भाडे असायचे. परंतु, आमची नजर १६ इंची बारक्या सायकलीवर टपून बसलेली असायची. तिचे भाडेही दुप्पट म्हणजे १ रुपया तास असायचे. तीच तमाम बालचमूंना पाठीवर बसवून फेरफटका मारण्यासाठी आकर्षित करायची. दुकानदारापेक्षा तासाचे अचूक मोजमाप आम्हीच करायचो. कारण, बारक्या सायकलीसाठी आपला नंबर लवकर लागावा, हीच भाबडी आशा त्या पाठिमागे होती.
गावात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सायकली भाड्याने देणारी दुकानेही वाढली. पण, भोसले सायकल मार्टच्या सायकली लक्ष वेधून घ्यायच्या. एक म्हणजे ते गावच्या केंद्रस्थानी होते. दुसरे म्हणजे सायकलीच्या पहिल्या चाकाच्या 'मडगार्ड'वर मास्याच्या आकाराचा छोटा काळा फलक होता. त्यावर बुरसे पेंटरने 'भोसले सायकल मार्ट' अशी पांढऱ्या आॕईलपेंटमध्ये उठावदार आणि तितकीच वळणदार अक्षरे लिहिलेली होती. ती आजही डोळ्यांसमोर तरळताना दिसतात. हे मार्टचे वैशिष्ट्यं होतं.
आम्ही एन सी सी ला असताना दिवसाला ५ रुपये भाड्याने ही सायकल घेवून बाहुबलीला जात असू. गावातील-गल्लीतील थोड्या मोठ्या व्यक्ती विशाळगडला जाताना याच सायकली भाड्याने घेत. हा सोहळा पाहताना मोठा आनंद व्हायचा. आपणही मोठे झालो की, सायकलीवरुन विशाळगडला जावू, अशी खूणगाठ मनी बांधायचो. पण, पुढे भाड्याच्याच काय स्वतःच्या सायकलीवरुन देखील विशाळगडला जाण्याचा कधी योग आला नाही. थेट मोटरसायकलवरुनच जाण्याचा आला.
काळ बदलत गेला तशी काही अपप्रवृत्तीही वाढू लागली. गरज म्हणून भाड्याने घेतलेल्या या सायकली दारुच्या गुत्त्यांवर या प्रवृत्तीकडून विकल्या जावू लागल्या. अनेकवेळा या सायकली सोडवून आणायची पाळी दुकानातील कामगार, कधी अप्पा तर कधी बंडा किंवा राजूवर यायची.
काळ बदलला. कौतुक आणि प्रतिष्ठेचे लक्षण असणारी सायकल गरजच म्हणून विकत घेतल्या जावू लागल्या. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गरज सायकल बनली. तो काळ पुढे 'चल मेरी लुना'वर सरकला. आणखी पुढे विविध कंपन्यांच्या मोटरसायकली, चारचाकीवर स्थित्यंतरे झालीत. सायकली भाड्याने घेण्याचा काळ जवळ-जवळ थांबला.
हाच बदल भोसले सायकल मार्टनेही अंगिकारला. १९६२ ला दिवंगत दत्तात्रेय भोसले आणि त्यांचे चिरंजीव दिवंगत वसंत भोसले यांनी सुरु केलेले हे मार्ट आज दिवंगत शिवाजी ऊर्फ बंडानंतर मित्र राजू समर्थपणे पेलत आहे. नव्या सी एन जी, बॕटरी आणि सोलरवरील वाहनांच्या काळात आरोग्यासाठी पुन्हा एकदा सायकलींना चांगले दिवस आले. हे ओळखून भोसलेंच्या तिसऱ्या पिढीने आपली यशस्वी वाटचाल सुरु ठेवलीय. नव्या सायकलींबरोबरच मोटरसायकलींचे टायर्स, त्यांना लागणारे आवश्यक भाग याची विक्री सुरु आहे. माझ्या मुलासाठी वेळोवेळी त्याच्या दोन्ही सायकली घेण्याचं भाग्य मला याच 'भोसले सायकल मार्ट'मध्ये मिळालं. या दुकानाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी बाबुराव लाटवडे हे गेली ५० वर्ष आजही दुकानात कार्यरत आहेत आणि आजही सायकलीवरच दिसतात.
जब पहली बार गिरा था, तब उठना कैसा है ए सिखाया था तुमने..
जिंदगी दो पय्यों पर कैसे चलती है यह ज्ञान भी दिलाय था तुमने..
पिछे बैठे दोस्त बोझ नहीं होता..दोस्त का मतलब सिखाया था तुमने..
हर पैडल के बाद मेहनत और मंजिल का रिश्ता दिखा दिया था तुमने..
जीवन की अनमोल बातें, रास्ते और बेइंतहा प्यार के रिश्ते सब कुछ आजमाने दिया था तुमने..
कभी दोस्तों की, कभी किराए की थी पर मेरा बचपन सँभाल दिया था तुमने..
तुम बनी थी मेरी जरुरत, सुख-दुःख की साथी..बस सायकल थी बाकी..
अनेकांच्या आयुष्यात साथ देणारी, कोपरं-ढोपरं- गुडघं फोडून जीवन उभं करणारे दळण-वळणाचे केंद्र ठरलेले 'भोसले सायकल मार्ट' जयसिंगपूरच्या पाऊलखुणात आपले असे अस्तित्व आजही टिकवून आहे.
- प्रशांत सातपुते
Comments
Post a Comment