श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र महावीर तपोभूमी

      उज्जैन येथील महाकालेश्वरचे दर्शन घेवून इंदोरला परतताना अवघ्या काही अंतरावर अगदी महामार्गालगत वाटेतच भगवान महावीरांची तपोभूमी आहे. पूज्य गुरुदेव मुनिश्री प्रज्ञासागरजी महाराज यांच्या प्रेरणेने या सुंदर, सुव्यवस्थित, अती रमणीय तपोभूमीची निर्मिती करण्यात आली आहे.
    उज्जयनी ही एक ऐतिहासिक, पौराणिक आणि अतिप्राचीन नगरी आहे. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेल्या या उज्जयनीचे आज उज्जैन नामकरण झाले. भगवज्जिनसेनाचार्य कृत 'आदिपुराण' मध्ये भगवान ऋषभदेव यांनी भारताला ५२ जनपदांमध्ये अर्थातच जिल्ह्यात विभाजित केले होते. त्यामध्ये 'अवंती' हा एक होता. प्राचीन काळात अवंतीची राजधानी उज्जयनी होती. सातव्या-आठव्या शतकात अवंतीचे नाव मालवा झाले.
        आचार्य गुणभद्र स्वामींनी उत्तर पुराणात लिहिले आहे की, दीक्षा घेतल्यानंतर भगवान श्री महावीर स्वामी मुनी अवस्थेमध्ये विहार करत उज्जयनीला आले आणि योग धारण करुन ध्यानस्थ झाले.
     येथील स्मशानात राहणारा स्थाणू रुद्र नावाच्या दैत्याने त्यांची ध्यानधारणा भंग करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने पराजय स्वीकारुन क्षमायाचना करुन तो निघून गेला. भगवान महावीरांच्या याच पवित्र स्थानाला आज तपोभूमी हे नाव देण्यात आले आहे.
      उज्जैनपासून अवघ्या १० किमी अंतरावर असणाऱ्या या तपोभूमीचे भूमीपूजन १७ नोव्हेंबर २००५ मध्ये करण्यात आले. सद्यस्थितीत भगवान श्री महावीर स्वामी यांची लाल पाषाणातील २१ फूट मूर्ती आहे. या मूर्तीच्या उजव्याबाजूला लाल पाषाणात पद्मासन श्री आदिनाथ भगवान यांची मूर्ती आहे. तर डाव्या बाजूला श्यामवर्णी श्री पार्श्वनाथ भगवान यांची सहस्त्रफणी मनोहारी मूर्ती आहे.
      विश्वातील प्रथम गणधर चोविसी..!
    देशातीलच नाही तर विश्वातील प्रथमच गणधर चोविसीचे दर्शन या ठिकाणी होते. मूळ मंदिराच्या गुहेतील गर्भगृहात अत्यंत देखण्या, मनमोहक गणधर मूर्तींचे दर्शन येणाऱ्या भाविकांना मोहीत करतात. या ठिकाणचा कमालीचा गारवा लक्ष वेधून घेतो. हा गारवा, सोबत कानावर पडणारा ओमचा नादब्रम्ह या ठिकाणी आपल्याला आपसूकपणे ध्यानस्थ करतो. मनातील विचारांचे काहूर, मोहोळ अगदी थंडगार, शांत नितळ पाण्याप्रमाणे तळ गाठतात. याची प्रचिती स्वतः घेतल्याशिवाय मिळत नाही. 
      याच ध्यान केंद्रात समोरील भिंतीवर ६×६ आकारात लाल पाषाणात श्री कलिकुंड पार्श्वनाथ यंत्राची स्थापना केली आहे. सारेच मनाला कमालीची शांतता देतात. आपल्याला विश्वापासून 'स्वत्वाची' अनुभुती देतात. 
     मंदिरपरिसरात अनेक मंदिरे, सभागृह, ध्यान बगिचा आहे. यात आणखी लक्ष वेधून घेणारे विश्वातील सर्वात मोठे इथले पदचिन्ह होय. अवंतीचे संस्थापक भगवान श्री ऋषभदेव यांचे ७ फूट × ७ फूट इतक्या आकारातील पदचिन्ह आहे. हे विश्वातील सर्वात मोठे पदचिन्ह आसल्याचे इथे सांगितले आहे. 
       गर्भगृहेतील ध्यान केंद्रात सुरुवातीला पाहताना दिव्यांचे झुंबर वाटणारे परंतु, कमळ पाकळ्याप्रमाणे पसरत स्वतःभोवती गिरक्या घेणारे वैशिष्ट्यपूर्ण पंखेही तितकेच लक्षवेधी आहेत. आज या तपोभूमीचे दर्शन मी आणि सौ ने घेतले. इथल्या ध्यान केंद्रात आम्ही कधी ध्यानस्त झालो,  हे दोघांनाही कळाले नाही. ध्यानातून बाहेर पडलो तसा दिवस चांगलाच कलंडायला लागला होता. इंदोरला घरी परतताना भगवान महावीरांच्या तपोभूमीची शांतता, मग्नता सोबत होती, अगदी हा लेख लिहितानाही ती अनुभुती, गारुड उतरल्याचे जाणवत नव्हते..
      *प्रशांत सातपुते*

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..