बळी
उशाला दंडोबाचा डोंगर, पायाशी कावडीचा डोंगर, पुढे शुक्राचा डोंगर. अशा या डोंगर रांगांमधून विस्तीर्ण पसरलेल्या जाखाईच्या पठारावर वाड्या-वस्त्यांनी आपल्या पथाऱ्या पसरलेल्या. दिवस कासराभर वर आला होता. रखरखीत ऊन आग ओकीत होतं. अंगाची नुसती ल्हाई उडत होती. कुठंतरी गारव्याला बसून राहावसं वाटत होतं. अंगणात बसून, सारखं शेपटी उडिवणाऱ्या बोक्याबरोबर राम्या खेळत होता. जोरात शेपटी ओढताच ‘फिस’ करून तो राम्याच्या अंगावर गेला.
“हत..भोसडीच्या माझ्या अंगावर येतोस, थांब कापतोच तुला.” असं म्हणत राम्या त्याच्या मागे गेला. तसं बोक्याने लगेचच समोरच्या भिंतीवरून उडी टाकली आणि तो पसार झाला. हातभर लांब जिभ बाहेर काढून मोत्या कुत्रं सारख ‘ह्या-ह्या’ करत धापा टाकत बसून होतं. आता राम्या त्याच्याकडे वळला होता. कुत्र्याच्या पाठीवर उलटा बसत तो त्याच्या आधिच वाकड्या असणाऱ्या शेपटीला चिंधीचा गोंडा बांधत बसून होता.
चहाचं काळं कढूत पाणी ढोसून शिरपानं गोठ्यातली बैलजोडी सोडली, ‘चलतो..गं..’ म्हणून एकवार त्यानं बायकोला सांगितलं आणि तो रस्त्याला लागला. तशी ती धावत बाहेर आली. उंबऱ्याला रेटा देत आतूनच म्हणाली, “चार रोज झालं, घरातलं जुंधळं संपल्यात. रोज सांगते तुमास्नी. आज तरी काय जुडणी हुती का बगा.” शिरपानं एका जागी थांबून मान हलवून होकार भरला, आणि तो दाढीचे खुंट खाजवत चालू लागला. तेवढ्यात नाकाखालची पांढरी धोट रेघ आत ओढून घेत, एका हातानं चड्डी सावरत तो पळतच शिरपाजवळ गेला. तसं मोत्या कुत्र्यानंबी कान टवकारलं आणि ते उटून शेपटी हलवू लागलं.
“बा..श्याव चिरमुरं आण हं येताना..” अशी जणू त्यानं आपल्या बा ला ऑर्ड्र दिली. त्याला उचलून घेत, त्याचा एक मुका घेतला आणि त्याला खाली ठेवला. बा च्या पांढऱ्या दाढीची टोकदार खुंटं टोचली. तसा तो गाल चोळत परत आपल्या उठून उभं राहिलेल्या मोत्याजवळ पुन्हा पळाला. त्याच्या वाकड्या आणि हलणाऱ्या शेपटीशी खेळण्यात पुन्हा तो गुंतून गेला.
यंदाच्या दुष्काळात पुरतं राज्य तावडीत सापडलं होतं. कृतिका, रोहिणी ही पहिली नक्षत्रं वांझ ठरली होती. पण हुकमी मृग नृक्षत्रंही रंडकं ठरलं होतं. पुनर्वसूतला तरणा दमला, तर पुष्यातला म्हातारा काठी टेकलाच नाही. सासू-सुना त्याही भांडल्या नाहीत. ऑगस्ट संपत चालला तरी पाऊस बरसला नव्हता.
वाड-वडिलांची जमीन धरणाच्या भिंतीखाली कधीच शांत झाली होती. सरकारातून मिळालेली ही कुडी त्याच्यावरच प्रपंचाचा हा गाडा रेटलेला होता. गावच्या राजकारणनं दबलेला, एजंटाच्या गर्दीत भंजाळलेला, त्यात जन्मजात आडाणीपणा, शिरपाला प्रत्येकजण शोषत होता. सरकारी फंडातनं किती पैसे मंजूर झाले, हातात किती पडले, याचं गणित उभ्या आयुष्यात कधी जमलंच नाही. सगळ्यावर विश्वास ठेवला. म्हणेल तिथं अंगठा केला, आन, प्रपंचाचा गाडा तिथंच कोलमडला. पण सरळ मार्गी शिरपाच्या हे कधी लक्षात आलं नाही. शिरपा मुळातच एक शिवडी. गरिबीत पिचलेला आणि कर्जात रूतलेला. त्यात आता दुष्काळानं ओढाताण झालेली. त्याचा देह आता सुकला होता.
एकवार त्यानं साऱ्या शेतावरून नजर फिरवली. जागो-जागी जमिनी फाटल्या होत्या. हरण्या-दौलतीच्या मदतीनं कामं संपवून त्यांना तिथचं सोडून दिलं.
‘‘गाबडीच्या..कुटं उलतलाईस अजून पातूर..’’ पावसाला शिव्या हासडत तो पाण्यासाठी आसूसलेल्या जमिनीवरून फिरू लागला.
ओघळीकडंच्या झुडपांनी केव्हाचं तोंडं काळी केली होती. करपलेल्या तोंडातच आपली तोंडं त्यातच घुसळून बैलं चघळत होती. आशेवर केलेली पेरणीदेखील करपलेली. निसर्गच कोपला होता. भयावह परिस्थिती पाहून शिरपाच्या आतड्यांना पिळ पडत होता. दंडोबाच्या दारी ढालीगत असणारा आम्रवृक्ष तोही दमलेला भासत होता. दंडोबाचं दर्शन घेऊन, तो आंब्याखाली गारव्याला बसून राहिला. सभोवार सगळं रणरणतं ऊन. डोळ्यांना बघवत नव्हतं. बघावं तिकडं मृगजळ दिसत होतं. वाढणाऱ्या उकाड्यानं आजतरी पाऊस कोसळेल असं वाटत होतं.
दूरवर चरणाऱ्या बैलांना चुचकारत आता तो माघारी परतू लागला. चावडीजवळील पारावर गारव्याला साळुंख्याचा म्हातारा उघड्याबंब अंगाने खोकत बसून होता. तर आणखी दोन-चारजण पारावर लवंडली होती. कदम गुरूजी पेपरात आलेली बातमी वाचून सरकारनं आता टँकरनं पाणी पुरवठा करण्याचं ठरवल्याचं सांगत होते.
‘‘ गुर्जी, दरवरसाचीच बोंब हाय ती. यंदा जरा पावसानं लईच वड दिली.’’ शिरपाही तिथे जाऊन टेकत बोलला.
‘‘आरं, दुस्काळ आपल्या पाचवीलाच पुजलेला, पार रामाच्या काळापास्नं..’’
साळुंख्याच्या म्हाताऱ्यांनं चिलीम काढून तिचं चार झुरकं मारून त्यानं आपली छाती करपवून घेतली. बंदा रूपयासारखा बडका बाहेर काढत तो टाकून दिला. मघाशी लवंडलेले दोघेजण आता उजव्या अंगावर कलंडून उजव्या हाताचं कोपर पाराला ठेवून, त्याच्या पंज्याच्या आधारवर डोकं ठेवून, पडल्या जागेवरूनच बोलण्यात लक्ष देवू लागली. आलेली खोकल्याची उबळ शांत करून साळुंख्याचा म्हातारा सांगू लागला. तसे सगळे कान टवकारून ऐकू लागले.
‘‘एकेकाळी आपल्या भागात बक्कळ पानी हुतं. त्यावेळी आपल्या भागातनं कावडीतनं आई-बा ला घिवून सरावनबाळ काशीला निगालता. त्याचे तहानलेले आंधळं आई-बा पानी पित असताना तितंच दसरतानं बान मारला. आंधळ्या आई-बा पास्नं सरावन बाळाची ताटातूट केली, आन् दसरतानं सराप घेतला. तवापास्न पल्याडच्या डोंगराला कावडीचा डोंगूर आसं नाव पडलय.’’
‘‘त्याचं हितं काय कारान?’’ पंजाच्या आधारावर असणाऱ्या डोक्यातनं सवाल आला.
‘‘त्याचा आणि दुष्काळाचा संबंध काय ?’’ गुरूजी म्हणाले.
‘‘आवं गुर्जी, सरावनबाळाचं आंधळं आई-बा पानी न पिता मेलं की न्हाई ? त्यांनी दसरताला सरापच तसा दिला. तुजी आन् तुज्या पोराची ताटातूट तर हुईलच, पर तुज्या राज्यातली लोकंबी पानी-पानी करतील. तवापास्नं आपल्याकडं दुस्काळ हाय बाबानो.’’
‘‘ही दंतकथा असेल.’’ कदम गुरूजी बोलले.
‘‘असू द्या की दंतकथा, पण पाऊस-पानी हाय का आपल्या भागात ? गुर्जी,’’ सांळुख्याचा म्हातारा हनुमानाची आपली शेपूट पुढं ओढतच म्हणाला.
‘‘आपला पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.’’गुरूजी आता भूगोलात शिरले होते.
‘‘मंजे वो काय गुर्जी’’ शिरपानं विचारलं.
‘‘केवळं ढग येतात, पण बरसत न्हाईत, पुन्हा निघून जातात.’’ गुरूजींची शिकवणी सुरूच होती.
‘‘त्यालाबी एक कारन हाय, गुर्जी’’ चावडीच्या पायरीवरून उठून पारावर बसत गणू शिंदे सांगू लागला. तसे हाताला रग लागून हात दुखू लागल्याने हाताच्या कोपरावर कलंडलेले दोघेजण उठून बसले.
‘‘त्याचं असं हाय, राम-लक्शुमन आणि सीतामाई वनवासात फिरत फिरत आपल्या भागातनं जात हुते. संध्याकाळी एकदा राम बसला पूजंला. खाली राम पूजा करत आसतानाचं, वर आकाशात ढगांनी जाम गर्दी केली. पाऊस पडून आता रामाच्या पूजंत बाधा येणार म्हटल्यावर लक्शुमनानं ताप्यातून काडला बान, आनी मारला ढगावर. तसं ढग गेलं निघून ते कायमचंच. तवापास्न ढग नुस्तं येत्यात आनी जात्यात. पण गळत काय न्हाईत.’’
‘‘आरं..त्या लक्शुमनाच्या..’’ कुणीतरी बोललं.
‘‘या सगळ्या अख्यायिका आहेत.’’ गुरूजी सांगत होते.
‘‘गुर्जी, पाच-सात वरसापूर्वी आपल्या जिल्ह्यात क्रुस्नामाईला म्हापूर आल्ता की न्हाई ?’’ गणू शिंदेनं कदम गुरूजींना प्रश्न विचारला.
तसे गुरूजी म्हणाले, ‘‘होय, कृष्णेला चांगलाच महापूर आला होता. आठवडाभर नदीकाठच्या गावातून पाणी हटलं नव्हतं.’’
‘‘गावातनं नावा खेळल्या होत्या की न्हाई ? लोकांची सुटका करायला लस्कराला यावं लागलं. एकाच नावंतून वल्ली बाळंतीण आनी मढं दोगास्नीबी लस्कर भाईर काडत हुतं. तवा आपल्या भागात काय अवस्था हुती ? टँकरनं पानी देत हुतं की न्हाई सरकार ! एकीकडं म्हापूर आन् दुसरीकडं पान्याची बोंब हुती का न्हाई ?’’ साळुंख्याच्या म्हाताऱ्याच्या या पटलेल्या ज्ञानावर सगळेच माना हलवू लागले.
‘‘खरंय तुमच. मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, विटा, आटपाडी, जत आणि पुढे खटाव, माणपर्यंत अशा पट्ट्यात पाऊस- पाणी कमी आहे.’’ गुरूजी अजूनही भूगोलातच शिरून होते.
‘‘यंदा मात्र, बात्तरच्या दुस्काळासारखं दिस हाईत. आठवडा झाला लोकं गाव सोडायल्यात. आनी आठ दिसात गावात फकस्त म्हातारी-कोतारी उरतील.’’ रग लागून उठून बसलेलं डोकं बोलत होतं.
‘‘दुबार पेरणीचं राज्यावर संकट आहे. सरकार चारा छावण्या उभं करतयं. दुष्काळ परस्थिती जाहीर करेल असं वाटतय.’’ आता गुरूजी पेपरातील ताजी माहिती देत होते.
‘‘एक खरं आनी धा लबाड ! असं सरकारचं काम असतय. आम्ही मेल्यावर जाळायलादेखील कडबा पाठवायचं न्हाई. वांझंला एकवार अंकूर फूटंल पण, सोसायटीतल्या बेण्याला कोंब फूटायचं न्हाईत. असला समदा सरकारी कारभार.’’ गणू शिंदेचे बोल बहुधा सगळ्यांना पटलेले असावेत. यावर थोडावेळ कुणीच काही बोललं न्हाई.
दिवस उतरणीला लागला तशी कडकडीत ऊनं शाळा सुटल्यासारखी आपापल्या घरी माघारी पळालीत. दिवसभर होणाऱ्या काहिलीतून आता जरा उसंत मिळत होती. गप्पांचा फडदेखील रंगात आला होता. संपूर्ण गाव दुष्काळाच्या भीतीनं काळजीत होता. पारावर बसलेले गावातील वाड-वडील ‘आसं आक्रीत दिस कधी बगितलं नसल्याचं’ सांगत होती. बाहत्तरच्या दुष्काळाच्या आठवणींना उजाळा देत सुकडी खाल्ल्याचं सांगत होती.
‘‘ह्यो दुस्काळ कुणाला तरी गिळल्या बिगार गप्प राह्याचा न्हाई. धा उन पावसाळं खाल्लं तरी जल्मात आसं कधी बघीतलं नव्हत.’’ गावाला वडील असणारा आणि जिभेला तरतरीत शेंडा असणारा साळुंख्याचा म्हातारा बोलला, आणि करपलेल्या छातीच्या फासळ्यांवर एकदा हात फिरवून पारावर मढ्यागत निपचीत पडून राहिला. ऐकणारी मंडळी मात्र, अंगावर पाल पडावी तशी एकदम दचकली.
शिलाईचा धागा ओढल्यानंतर कपड्याची एक-एक शिवण उसवावी, तशी दचकलेली माणसं आता घरी परतू लागली. मधूनच तोंडाची हालचाल करीत बसून राहिलेल्या बैलांना हाकारत मग शिरपाही उठला, आणि तो आपल्याच तंद्रीत घराकडं चालू लागला.
‘गोठ्यातल्या जनावरांची अडचण झाल्ती. जनावरांच्या गळ्यात ‘दुस्काळ भागातील जनावर’ अशा पाट्या अडकवून दावणीच्या जनावरांला नदीकाठच्या गावांकडील रस्त्याला लावत हुती. ‘आरं.. एरवी हातात सुरा असणारा आमचा अब्दुल खाटिक, त्यो दिकील हातात खडू घेऊन पाटी लिवित हुता. बाबानो.. त्यो दुस्काळ लई वाईट हुता. सुकडी खावून दिस काडलं..’ पारावरच्या चर्चेतून त्याचं मन काही केल्या बाहेर पडत नव्हत.
‘‘शिरपा..’’ कुणाची तरी पाठीमागून हाळी आली. पण, आपल्याच तंद्रीत शिरपा पुढं चालला होता. पुन्हा एकदा ‘‘शिरपा..आर..ए शिरपा..’’ अशी खच्चून हाळी आल्यानंतर मात्र, वीज पडावी आणि भुईवरच्या विजेच्या तारा एकाएकी लोंबकळून डांबाच्या पायाशी याव्यात त्याप्रमाणं त्याच्या विचाराची तंद्री आता तुटली होती. जागच्या जागी उभा रहात पाठिमागील आवाजाच्या दिशेने तो वळला. त्याचा जिवा-भावाचा सवंगडी नारायण होता.
‘‘तू.. बी गाव सोडून निघालास व्हय?’’
‘‘शिरपा ! मर्दा वरसानू वरीस पावसानं आपल्याकडं पाठ फिरवल्याली. पोरगं मुतल्यागत पडणारा पाऊस, यंदा ते बी कुटं मुतला कुटं न्हाई.’’
‘‘खरं हाय गा, पण..’’
‘‘पण न्हाई आणि बीन न्हाई.. हे बग, सगळ्या राज्यालाच यंदा दुस्काळानं घेरलय. तवा शहरात जावून काय तरी करता यील. असं हातावर हात घालून किती दिस बसायचं ?’’
‘‘खरं म्हणतोस दोस्ता. पण, माझा ईस्वास हाय. तुला सांगतो त्यो बरसणार.’’
‘‘पण कधी ? आपून मेल्यावर..आर शाप हाय शाप आपल्या भागाला.. हीतं उपासी मरण्यापरीस तिथं काय तरी यवस्था हुईलच की.’’ नारायण आपल्या म्हणण्याला चिकटून बोलला.
नारायणाच्या कडा पाणावल्या होत्या. त्याला ठाऊक होतं, शिरपा तसा जिद्दीचा होता. पण शिरपा तसा डगमगणारा नव्हता. दोघांची एकवार गळाभेट झाली आणि खडखडणारी गाडी त्याच्या नजरेआड झाली. तिथंच थोडावेळ घुटमळून शिरपा घराकडं परतला. सवयीनं दोन्ही बैलं गोठ्यात गेली. शेव-चिरमुऱ्याच्या आशेने बाहेर आलेला राम्या आणि जोंधळ्याच्या आशेने बाहेर आलेली त्याची बायको निराश होऊन पुन्हा आत गेलीत. शिरपा मात्र अंगणातच बसून होता. खेळण्यासाठी एकेक सवंगड्याला सांगावा धाडून बोलवावं तशी एकेक चांदणी आकाशात जमू लागली आणि थोड्याच वेळात फुलांचा ताटवा बहरावा तशी आकाशात चांदण्यांचा गुच्छा दिसू लागला.
हरण्या, घरच्या गाईचा खोंड ! पोटच्या पोरावानी जपलेला आणि वाढवलेला. जत्रंपासून गावच्या नजरेत भरलेला. त्याला बाजार दाखवून तो दुबार पेरणीची बेजमी करणार होता. उधार-पाधार भागवणार होता. तसा त्यानं विचारच पक्का केला. दिवस उगवायला तो आज तालुक्याची वाट चालू लागला होता. वीस-पंचवीस हजाराच्या बैलाला फुकापासरीत मागत होते. सकाळपासून उनात उभं राहून अखेर त्यानं अगदीच नाईलाजानं सौदा केला. हरण्याला सोडून येताना त्याचं पाय तुटत होतं. दौलतीला, हरण्याच्या साथीदाराला यातलं काहीएक समजत नव्हतं. तो मात्र, त्याला सोडून येताना वाटेत तुंबून रहात होता. मध्येच मागे वळून आवाज देत होता. इतक्या वर्षाची असणारी साथ सुटलेल्याला साद घालतं होती.
घरी परतलेला दौलती सवयीनं गोठ्यात न जाता अंगणातच तुंबून बसून होता. आधीचं सुकून आभाळ झालेल्या आणि त्यात पुन्हा दमलेल्या शिरपाला आज कसंसच वाटत होतं. मोठ्या आशेनं ती आणि तो दोघेही आज पुन्हा बाहेर आली. शिरपानं आपल्या डोळ्याची बाहुली राम्यावरून एकदा फिरवली. सोग्यात लपवलेली श्याव-चिरमुऱ्याची पुडी त्यानं राम्याकडं फेकली. पुडी मिळताच राम्यानं हसून मिठी मारली. त्याच्या कोवळ्या गालावर पुन्ह्यांदा त्याची खुटं टोचली. तसा तो आनंदातच आतमध्ये पळाला.
पुडी उघडताच तिथंनच म्हणाला, ‘‘बा..यात फुटानं न्हाई आणलंस..’’आणि तो चिरमुऱ्याचा बोकाणा इवल्याशा तोंडात आधाशीपणे भरू लागला. आधीच नाकाखाली असणाऱ्या पांढऱ्याधोट रेघेवर आणखी दोन-चार पांढरे चिरमुरे चिकटले होते. वर ओढण्याच्या नादात चिरमुरेही नाकात घुसू पहात होते.
घरात येऊन बायकोला त्यानं गठळं दिलं. गठळ्यातील जोंधळं आणि तांदूळ-डाळ बघून तिला कोण आनंद झाला. आठवडाभरानंतर आज तिला पोटभर भाकरी खायला मिळणार होती. कण्या, आमटी आणि भाताच्या पेजवर पेटलेली आग तडम शांत झाली होती.
निशाराणीनं आपली नशा सर्वांवर चढविली होती. दूरवर केकाटणारी कुत्रीदेखील आज गप्पगार होती. गोठ्यात दौलती बहुधा आपल्या साथीदाराचा विचार करीत असावा. त्याचीही खसफस बंद होती. मोत्या कुत्रं अंगणातच मुटकुळं करून पडलं होतं. राम्या नुसताचं चिरमुऱ्यावर खूश होऊन चिरमुऱ्यासारखाच तिथंच विस्कटला होता. शिरपा नुसताच पडून होता. लिंबावर पिंगळ्याची जोडी भाकणूक करीत असावी.
‘‘ह्यो दुस्काळ कुणाला तरी गिळल्या बिगार गप्प राह्याचा न्हाई.’’
..आणि शिरपा जागेवरच हलला.
‘‘काय झालं ’’ तिनं विचारलं. ‘‘काय न्हाई. तंद्री लागलीती.’’
तिनं गाव सोडायचा विचार केला होता. पण त्याची जिद्द आडवी येत होती. तिची आशा दुष्काळानं करपून लावली होती.
बळ एकवटून ती म्हणाली, ‘‘घरातलं सगळं संपलंय. आसं किती दिवस काडायचं.’’
करपलेल्या आशेतून पालवी घेऊन ती पिळवटून बोलली.
‘‘आपलं काय तरी हुईल, पण लेकराच्या आत्म्याचा तळतळाट लागाय नको. आपण बी गाव सोडू. सांगलीला जाऊ कुठंतरी कारखान्यात जमवू.’’
‘‘ माझा अजून ईश्वास हाय त्यो बरसणार मंजे बरसणार. गावं, वाड्या, वस्त्या नव्या पाण्यानं न्हाणार. फाटलेली जिमिन बुजणार. खांडागत धगधगतेली भुईमाता पाणी पिऊन गपगार हुणार.’’
तो आपल्याच नादात बरळत होता. त्याचं मन पावसाचा नुसता जोसरा काढत होतं. धन्याचं असलं विचित्र बोलणं बघून ती गप्प बसली. तिच्या आशेच्या पालवीला तिच्या डोळ्यादेखत कीड कुरतडत होती.
दिवस उगवला. आपापल्या घराकडं पळालेली ऊनं एकेक करून बाहेर पडत होती. सूर्याबा चांगलाच डोईवर आला. उन्हांची दाटी झाली होती. सुस्तावलेल्या आजगरासारखा शिरपा अजूनही पडूनच होता. एकाएकी लक्कन उठतं तो आपल्यावरच वरमला.
त्यानं आणलेलं बियाण्याचं गठळं तो शोधू लागला. पण जोंधळ्याचं, बियाणांचं गठळं त्याला मिळत नव्हतं.
त्यानं जरा दमानं तिला विचारलं, ‘‘कुठं ठेवलीतीस ?’’
‘‘हितच कोनाड्यात ठेवलतं’’ चिंताग्रस्त चेहऱ्याने ती म्हणाली.
त्यानं आणि तिनं कोनाडं आणि कोनाडं चाचपून काढलं. ते बियाणांचं गठळं मिळत नव्हतं. रिकाम्या कणगीच्या आडोशाला अंधारात दिसणार नाही अशा बेतानं राम्या हातात गठळं धरून बसला होता. त्यानं पुरतं जाणलं होतं. हातात आलेलं धान्य बा शेतात नेणार. भाकरी मिळणार नाही.
‘‘अरे चोरा.. हितं हाय व्हय गठळं’’
‘‘मी न्हाई द्यायचा. बा मला भाकरी पायजेल.’’ त्यानं गठळं पोटाशी घट्ट धरलं. ‘‘शेतात पेरलं तर बक्कळ उगवंल, खा मग काय खायची ती भाकरी.’’ आश्वासित नजरेनं तो म्हणाला.
पोराची समजूत कशी घालावी, हे त्या दोघांनाही समजत नव्हतं. डोळ्याला पदरं लावून ती पुढं झाली आणि कणगी शेजारी लपलेल्या राम्याला तिनं बाहेर घेतलं. उभ्या-उभ्याच तिनं त्याला पोटाशी घट्ट कुस्करलं. कुणीतरी काळीज पिळवटतयं, जणू भुंगाच पोखरतोय त्या वेदनेनं भडभडून आलेल्या ह्दयानं दाटलेला हुंदका मोकळा केला. त्याला अलगदपणे उचलून घेत, त्याच्याकडून ते बियाण्याचं गठळं काढून घेतलं. तसा तो जोर-जोरात रडू लागला. हाती आलेलं धान्य तिलाही अजिबात सोडवत नव्हतं.
‘आपल्यां’साठी आतड्यात असणारी ओल आणि ‘त्याच्या’विषयी असणारा विश्वास या दोघांच्या कात्रीत शिरपा पुरता सापडला होता. हातात गठळं घेऊन निघालेला शिरपा अर्ध्या वाटेतून माघारी येत, त्यानं गठळं सोडलं. तिच्या ओट्यात चार-पाच ओंजळी घालून, त्यानं कुरी उचलली, आणि तो दौलतीच्या संगतीनं शेताची वाट चालू लागला. आजही उकाडा हैराण करत होता.
पार थकलेल्या शिरपाच्या पिंढरीवरची शिरांची गोम उठून दिसत होती. त्याचाही उरला सुरला दम आता संपत चालला होता. एकट्या दौलतीच्या सोबतीनं त्यानं कशीतरी आज पेरणी आटोपली. दौलतीला सोडून तो खाली बसला. हाताच्या दोन्ही मुठीत माती घेत, त्याने दोन्ही हात आभाळाकडे केले. आतडं पिळवटून तो बोलत होता.
‘‘हे मेघराजा आसं तूच पाठ फिरीवलीस तर, आम्ही बघायचं तरी कुणाकडं. आरं.. बायका-पोरांच्या मुखातून घास ओरबाडून आणलाय रं. तुझ्या मनात तरी काय हाय सांग की ? का असा कुणाच्या मुळावर उठलाईस..पड एकदाचा पड..रं..’’ खोलवर गेलेल्या विहिरीतील पाण्याला खरडवून काढावं, तसं त्याचे अश्रू डोळ्यांच्या खोबणीतून बाहेर पडून रापलेल्या चेहऱ्यावरून ओघळून काळ्या मातीत मिसळू लागले. फासळ्या दिसणारा दौलतीही उठून उभं रहात, त्याला चाटू लागला.
दिवे लागणीला परतलेला शिरपा नेहमीप्रमाणं अंगणात बसून राहिला. सवयीनं दौलती आपसूक गोठ्यात जाऊन उभा राहिला. आज आकाशात एकाही चांदणीला खेळायला सोडलेलं दिसत नव्हतं. पडल्या जागेवरून चांदणं शोधता शोधता त्याला एकाएकी हूडहुडी भरून आली. दातावर दात बडवून त्याचा आवाज वाढला. अंगाचं मुटकुळं करून तो थडथडू लागला. मोत्या कुत्रं एकाएकी भुंकू लागलं. तशी ती भाकरीच्याच हातानं बाहेर आली.
‘‘काय हुतय.’’ विचारत तिनं त्याच्या अंगाला हात लावला. चुलीच्या तोंडावरून नुकत्याच काढलेल्या भाकरीसारखं त्याचं अंग तापलं होतं. तशी ती एकामागून एक वाकळ, घोंगडी मिळेल ते त्याच्या अंगावर घालत होती. तरी त्याची हूडहुडी हटत नव्हती. ताप चांगलाच अंगात भरला होता. आता ती थंड पाण्याच्या पट्टया त्याच्या कपाळावर ठेवू लागली.
‘‘बा..तुला रं आनी काय हुतयं ?’’ राम्या गडबडला होता.
‘‘मला नको श्याव-चिरमुरं आनी भाकरी मला तू पायजेस.’’ त्यानं हातातली भाकरी तिथंच टाकून शिरपाला मिठी मारली. तिच्या डोळ्यांची आता धार सुरू होती. मनातल्या मनात दंडोबाला तिचं साकडं पडत होतं.
एकाएकी वावटळ उठलं. गोठ्याचं फाटकं तट वाऱ्यानं उडू लागलं. त्याच्या गोठ्याचा कूड उचकटत होता. वाऱ्याच्या आवाजानं मोत्या कुत्रं आणि बोका दोघंही बावरली होती. फुफाटा उडून रस्ता झकपक होत होता. कावडीच्या डोंगरावर विजा चमकत होत्या. उडणाऱ्या चगाळ्यावर कावळं नजर ठेवून होती. आलेलं चक्कार आलं तसं पुढं निघून गेलं. तसं चक्रात सापडून उडालेल्या वस्तू सावकाश भुईवर परतू लागल्या. पूर्णत: काजळून गेलेल्या आभाळातून, थोड्या वेळातच अंतरा-अंतरावर टपोरे थेंब खाली उतरू लागले. उतरलेल्या थेंबांनी मृदगंध नाकात भरू लागला. टपोऱ्या थेंबांनी घरावरल्या खापऱ्या थडथडू लागल्या. परसातली मांजरांची कळवण मघाशीच बंद झाली होती.
मोहरमात नालसाबासमोर ताशा बडवावा तसा आवाज दंडोबाच्या पत्र्याचा येवू लागला होता. वावटळाने मघाशी वाढलेली झाडांची खसफस अजिबात शांत होती. थेंबांची गर्दी झाली. दाटी-वाटीनं खाली उतरू लागली. क्षणार्धात ओढे-ओघळी नव्या लालसर पाण्यानं भरून वाहू लागली.
फटफटल्यागत शिरपा बुबुळं हलवू लागला. त्याच्या पुरत्या अंगात सौदामिनी संचारली आणि तो उठून खुळावल्यागत अंगणात आला. त्याची जिद्द फळाला आली होती. पावसानं तो चिंब भिजून गेला होता. त्याच्या पाठोपाठ ती ही आली. भिजलेली भाकरी उचलून राम्या बावरून बघत होता.
‘‘अरे वाद्या..कुठं दडलातास इतक्यांदी..’’ तो बेभान होऊन नाचत होता. मालकाच्या खुशीत सामील होण्यासाठी दौलतीनं गोठा केव्हाच सोडला होता. आपल्या मालकाला तो दाद देत होता. नाचता नाचता अचानक शिरपा आडवा झाला. तिनं त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो निपचीतच पडून होता. मघाशी चुलीच्या तोंडाला लावलेल्या भाकरीसारखं भाजणारं त्याचं अंग आता थंडगार झालं होतं.
‘‘धनी..’’
वीज कडकडावी आणि कुठंतरी आदळावी, तसा तिचा हंबरडा सबंध रात्रीला चिरून गेला. आपल्याच मस्तीत बरसणारा पाऊस आता तिच्या आसवांमध्ये भिजत होता.
-प्रशांत सातपुते
९४०३४६४१०१
p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
00000
Comments
Post a Comment