इंडिया टुडे अन् दोज डेज
एकलम खाजे.. है..शा. दुब्बी राजे..है.. शा. तिरान भोजे.. है..शा. चारी चौकटी..है..शा..पंचम पांडव..है..शा..या आरोळ्यांमध्ये सगळे रश्शी खेचताहेत आणि रंगमंचकावरील पडदा बाजूला होतोय..हळूवार पसरत जाणाऱ्या स्पाॕट लाईटमध्ये पांढऱ्या रंगाच्या नेहरु शर्ट आणि तुमानीत निवेदक अवतरतो..
"१५ आॕगस्ट १९४७ ! भारताच्या इतिहासातील सोनेरी दिवस ! हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. काही फासावर लटकले तर, काहिंनी इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळ्यांनी भारतमातेस आपल्या रक्तांनं न्हाऊ घातलं. रक्त मातीत मिसळलं. मातीचं सोनं झालं. इंग्रज हिंदूस्थानातून निघून गेले. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला. स्वतंत्र भारतात लोकशाही नांदू लागली. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य लोकराज्य ! स्वतंत्र भारतातील नागरिक मोठ्या अभिमानानं आपली प्रतिज्ञा गाऊ लागला..!
इयत्ता आठवी आणि नववीला असताना श्री तुकाराम मोरेसर आणि श्री विवेक स्वामीसरांनी "इंडिया टुडे" ही जीवनकुमार शिंदे लिखित एकांकिका बसवली. भरत पाटील, शांतीभूषण तेरदाळे, समीर नानीवडेकर, शेखर गंगधर, संजय जिरगे, प्रशांत मगदूम, विनोद डोईजड, विजय माने, सुशीलकुमार हंकारे आणि काही पुढील वर्गातील असे कलाकार मित्र यात सामावले होते. यात निवेदकाची प्रमुख भूमिका मला दिली होती.
दिवंगत जयसिंग निकम हा अवलिया आमच्या तालमी घेत असे. हातात सूरपेटी तोंडात तंबाखूची कडक गोळी तब्येतीने अगदीच किरकोळ असणाऱ्या या जयसिंगचा चिरका आवाज मात्र, जरब बसवायचा. चूक झाली की, "कोण रे त्यो.." आणि मनातल्या मनात शिवी पुटपुटायचा. जयसिंगला संगीताची चांगली जाण होती. शाळेची गायिका लीना पालकर हिच्यासह तो समूह गीत बसवायचा त्यातही आम्ही असायचोच. तांत्रिक विभागातील सुतारकाम शाखेतील सभागृहात या एकांकिकेच्या तालमी अगदी शाळा सुटल्यावरही व्हायच्या.
खरं तरं सुरुवातीला भरतची त्याच्याच उंची इतकी (😝) निळी सायकल माझ्यासाठी असायची. मी उंच असल्याने ती मीच चालवायचो. आयुष्यातील पहिला अपघात याच सायकलीवरुन शाळेला जाताना झाला होता. नंतर मात्र, शांतीभूषणची सायकल माझ्यासाठी असायची. नाटकांच्या तालमीसाठी या सायकलीवरुन मी, भरत आणि शांतीभूषण अगदी तिब्बल सीट घुमवायचो.
इयत्ता आठवीमध्ये कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या एकांकिका स्पर्धेत "इंडिया टुडे"ला तिसरा तर नववीत सांगलीतील भावे नाट्यगृहात झालेल्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला. यात विनोदला प्रशस्तीपत्र आणि शाळेला एक मोठा कप मिळाला.
दुसऱ्या दिवशी प्रार्थना झाल्यावर आमचा सगळ्यांचा शाळेतील व्यासपीठावर गौरव करण्यात आला होता. शाळेतील व्हरांड्यातील काचपेटीत एकांकिकेतील आमची छायाचित्रे कित्येक दिवस प्रदर्शित केली होती. ते आजही आठवून ऊर भरुन येतोय. आर एस पी च्या किणी येथे झालेल्या शिबिरातही श्री पालसांडेसर दिग्दर्शित नाटक बसवले होते. त्याचीही या निमित्ताने आज आठवण झाली.
इंडिया टुडे चे दोज डेज आमच्यासाठी खरोखर गोल्डन होते. अगदी झपाटून आम्ही जिद्दीने तालमी करायचो. अक्षरशः तहान-भूक विसरुन भान हरपून जायचो सगळे. शाळा सुटल्यानंतरही कित्येकदा रात्र होईपर्यंत आमचे आम्हीच सराव करायचो. एकमेकांचे संवाद पाठ करुन घ्यायचो. सुट्टीच्या दिवशीही भरतच्या घरी सराव असायचा. समीरही कधी-कधी नृसिंहवाडीतून यायचा.
वपुंच्या भाषेत सांगायचं झालं तर, "कसलं ना कसलं वेड अवश्य हवं.! ज्याला वेडं होता येत नाही, तो शहाणा माणूस नव्हेच.."
"पंढरीचा पांडुरंग..धर्माला जागा..!
एक वो दोन पैसा द्या वो गरिबाला..!" महारोगानं जर्जर झालेली ही भूमिका करणारा भरत आणि त्याची गाडी ओढणारा शेखर, "दादासाहेब, आम्ही गरीब माणसं! दोन वेळच्या खाण्यात काटकसर करुन आम्ही मुलीचं लग्न केलं. काही मानपान राहिला असेल तर मी हस्ते हस्ते पुरा करीन.." अशी आर्जव करणारा अगतिक मुलीच्या बापाची भूमिका करणारा समीर, मुलाचा बाप अर्थात कठोर बनलेल्या दादासाहेबाच्या भूमिकेतील विनोद, बेदरकारपणे गोळ्या चालवून माणसांचा क्षणात रक्ता-मासांचा चिखल बनवणाऱ्या अतिरेकीच्या भूमिकेतील संजय, "पाप... पाप घडत असेल. अंगारा घे बायकोच्या गावाकडे फूक.. बायको परत येईल. परत आल्यावर, देवीला साडीचोळी आणि पेहरावा कर..आई राधाईचा उदं.." देवऋषीच्या भूमिकेतील प्रशांत, विजय माने असे कितीतरी कलाकार मित्र यात आपल्या परीने ताकदीची भूमिका साकारत होते ! १३-१४ वर्षातली, अगदी मिसरुडही न फुटलेली कोवळ्या देहयष्टीतील ही सगळी पात्रं ठसठशीतपपणे आठवणीच्या रुपानं पुन्हा एकदा आज अवती-भवती वावरताहेत. अंतरलेल्या असल्या तरी आम्हां प्रत्येकांसाठी त्या सर्व मंतरलेल्या आठवणी आहेत.
पुढे मी बी. एड. ला असताना ही एकांकिका पुन्हा सादर केली. त्यावेळीही जयसिंगच दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणून लाभला होता. तोंडात तंबाखूची गोळी ठेवून झालेल्या चुकांवर "रागेची गोळी" मारणारा जयसिंग आज नाही. पण, त्यांने कलेच्या क्षेत्रातील खूप काही शिकवले. स्वामीसर आजही भेटतात. पालसांडेसर, मोरेसरांची भेट शाळा सुटल्यानंतर परत कधी झाली नाही.
त्या- त्या वेळेला या सर्व शिक्षकांनी अभ्यासा व्यतिरिक्त आमच्यासारखे कच्चे मडके घडविले. जीवनाच्या रंगमंचावर विविध जबाबदारीची आणि नात्यांची भूमिका पार पाडताना हे पक्के मडके अजिबात "कच" खात नाही..
कारण, "आईच्या भूमिकेतून आतून हळूवारपणे तर पित्याच्या भूमिकेतून बाहेरुन दबावदार, जरबशील थोपाटत आमचे कच्चे मडके शाळेच्या चार भिंती पलिकडे पक्के केल्यामुळेच..!
-प्रशांत सातपुते
९४०३४६४१०१
p7sons@gmail.com
https://www.facebook.com/prashant.satpute.988
Comments
Post a Comment