ग्रामीण संस्कृतीतील सांघिक किमया लाकडी पाटावरील 'शेवया'..

       गुढी पाडवा आणि शेवयाची खीर हे समिकरण बालपणापासून बघत आलेलो. पोहे, उप्पीट. उकडलेली अंडी नाहीतर आम्लेट..या नेहमीच्याच नाश्त्यात बदल म्हणून शेवयाचे उप्पीट ! हा पर्याय रव्याला शेवयाने दिलेला. शिवाय तमाम गृहिणींचा नव्या पदार्थ बनवल्याचा, अविष्काराचा आनंद ! चारोळी, बदामाची शेवयाची खीर नेहमीच सुरुची जेवणाचे एवरेस्ट ठरणारी !
      चायनीजच्या बाजारात, यंत्रांच्या गर्दीत अस्सल गावगाडा व्यवस्थेतील हातावरच्या, लाकडी पाटावरच्या लांब शेवयांचे धागे कधीच तुटलेले हे आज प्रकर्षानं जाणवलं.
          मार्च, एप्रिल परीक्षांचा कालावधी. शिवाय वाढत्या उन्हामुळे आमची सकाळची शाळा असायची. या काळात समस्त गल्लीत घरा-घरात ऐपतीप्रमाणे जमेल तसा पापड, तिखट सांडगे, सालपापड्या, कुरडया, चटणीसाठी लाल मिरच्यांचे वाळवण आणि लाकडी पाटावर शेवया वळण्याचा विशेष कार्यक्रम चालायचा.
      शेवया करणे हा तसा सांघिक कार्यक्रम असायचा. गल्लीत कुणाकडे तरी शेवयाचा लाकडी पाट असायचा. वर्षभर बिचारा धूळखात अडगळीत वा खुंटीच्या आधाराने अंगावर जर्मन, पत्र्यांच्या डब्यांचे ओझे घेवून पडलेला असायचा. कुणाच्या तरी घरी त्याच्या अंगावर वाकळ, गोधड्या, काय-बाय भरुन दास्तानी ठेवलेली पोती असत.
        या दिवसात मात्र, त्याचे जडावलेले, अळसावलेले, अंग मोकळे व्हायचे. त्याला सन्मानाने स्वच्छ अंघोळ घातली जायची. मग, त्याचाही वर्षभराचा शीण निघून जायचा. दिवाळीला उटणं लावून घातलेल्या अभ्यंग स्नानाप्रमाणे तो खुशीत व्हायचा. एखाद्याच पाट्याला त्याला टेकू देवून आधार देणारा घोडा असायचा. नाहीतर बरेच पाट हे फळीच असायचेत.
      ज्या घरात आज शेवया करायचा बेत असे, त्या घरात एक दिवस आधीच असे पाट मागून आणले जात. बाळाला आंघोळ घालून, ड जीवनसत्वासाठी धुपट्यावर उन्हात ठेवल्याप्रमाणे, पाटदेखील सकाळीच स्वच्छ धूवून उन्हात वाळवण्यासाठी ठेवले जात.
       ज्या पाटांना घोडा नाही, त्यांना उंच डब्यांचा आधार मिळायचा. त्यावर हे पाट भिंतीच्या पायाशी आपले बुड ठेवून तोफेसारखे वर तोंड उचलून सज्ज केले जायचे. त्यावर वाकळ, उशीसारखी बैठक ठेवून जणू घोड्यावर मांड टाकून बसल्यासारखी शेवया वळणारी गृहिणी आपली बैठक जमवायची. डुगडुगणाऱ्या डब्याला पुठ्ठा, फरशी वा दगडाची चिप सांद्रीत सारुन ही बैठक अधिक भक्कम केली जाई.
         अशाच पध्दतीने आणखी एखादा पाट बाजूलाच उपलब्ध जागेनुसार तोंड वासून सज्ज असे. आजू-बाजूच्या शेजारणींना या शेवया वळायचे खास निमंत्रण दिलेले असे. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेवून वा एखादीच्या तलफेची गरज पाहून लिंबू सरबत व चहा ने या सांघिक उत्सवाची मूहूर्तमेढ रोवली जाई.
      पाटावरच्या शेवयांची प्रक्रिया सुरू व्हायची ती अगदी भल्या पहाटे. खपली गव्हाचे पीठ अतिशय मऊ आणि लवचिक मळले जाई. पीठ जितके जास्त मळले जाईल, तितकी शेवई शुभ्र आणि लांबसडक व्हायची. असे अधीच पीठ मळून त्या घरच्या गृहिणीने तयारी केलेली असायची. त्याचे गोळे या पाटावर ठेवून अनुभवी सुगरण सराईतपणे शेवया वळू लागत रहायची. तर नवी लेक-सून तिच्या प्रशिक्षणाखाली हा 'हस्तकौशल्याचा' खेळ सुरु करायची. हातांची लयबध्द चाल, बांगड्यांचा विशिष्ट नाद पिठाला पाटावर वर खाली सुतासारखा नाचवीत राही.
        पाटाच्या तोंडावर कोरलेल्या खाचांमधून नाद, लयीत, तालमग्न झालेला पिठाचा गोळा नर्तकीच्या गिरक्यांप्रमाणे स्वतःला वळवत साडपातळ बनवी. तो वाकळेच्या पांढऱ्या दोऱ्यात रुपांतरित होई. हे धागे पाटाच्या दोन्ही बाजूने दुधाच्या धारेप्रमाणे खाली उतरत. पाटासमोर मांडी घालून बसलेला मी स्टीलच्या ताटात हे दोन्ही बाजूने उतरणारे धागे दोन्ही हाताच्या सहायाने ताटात नक्षीदारपणे फिरवीत राही. हे एक वेगळेच 'इंजिनिअरिंग' यात दडलेले होते. जरा उत्साहाने खेचल्यास तो धागा तुटायचा. पुन्हा तो खाली उतरेपर्यंत वाट पहावी लागे.
          ताटात एकाच जागी जास्त पडून त्याचा ढिगारा साठणार नाही, ताटभर सर्वत्र समप्रमाणात नक्षिदार जाळी पसरवणे हे देखील वेगळे कसब असायचे. शेवया वळता - वळता एखाद्या अनुभवी माऊलीच्या मुखातून सुरेल ओव्यांची नादमधूर शब्दांची लगड बाहेर पडत रहायची. त्या ऐकत हातातली ताटं भराभर भरली जात. मंत्रमुग्ध करणारा हा क्षण काही काळ हवेतील उष्मा कमी करायचा.
     मध्येच उसंत घेत गप्पांचा फड रंगू लागायचा. यात गल्लीतल्या करामतींची, त्यातील बिलंदर पात्रांची उकल कानी पडायची. तर, नव्या माहितीचा जन्मही व्हायचा.
         कधी कुणी सवंगडी मला बोलवायला आलेला असायचा. नक्कीच कुठेतरी हुंदडायचा 'प्लॕन' असायचा. पण, अशावेळी शेवया चाळायचे काम अर्धवट सोडून उठता यायचे नाही. मग, 'बसून बसून कंबरेला रग लागली' म्हणून मी जागचे हळूच उठून पळायच्या बेतात असायचो. बाहेर वाळवत ठेवलेली शेवयांची ताटं शेळ्या, गाढवांपासून वाचवण्यासाठी राखणीची नवी जोखीम चाणाक्ष आई माझ्या अंगावर देई. यात बोलवायला आलेल्या मित्राचीही सुटका होत नसे. तो गेला तर एकट्यालाच बसावे लागेल, म्हणून मी देखील त्याला सरबताचे आमिष दाखवी आणि आमच्या दोघातील गप्पांच्या ओघात राखणीचे काम इमानेइतबारे पार पाडले जाई.
   अंगण पांढऱ्याशुभ्र फुलांनी फुलल्यासारखे वाटायचे. उन्हाच्या कडाक्यात वाळलेल्या या शेवयांची चकाकी आणि त्यांचा तो नाजूकपणा एखाद्या कलाकृतीपेक्षा वेगळा नसायचा.
        लग्नातील रुखवतात देण्यासाठी वेग-वेगळी नक्षी साकारली जाई. ताटात मधोमध उपडे फूलपात्र ठेवून, त्यावर शेवई चाळली जाई. वाळल्यानंतर ती न मोडता आतील फूलपात्र काढणे हे कौशल्य असे. बरीच ताटे अगदी वेलबुटीप्रमाणे, असंख्य सापांच्या गुताड्याप्रमाणे भरली जात.
          सरबत, चहा वा पोह्याने या सामुहिक शेवाया संस्कृती उत्सवाची सांगता व्हायची. उन्हाने कडक वाळलेल्या ताटातील शेवयांवर हात ठेवून तो फिरवला की शेवयाची गोलाकार नक्षीदार जाळी ताटापासून वेगळी होई. अशी वाळलेली ही शेवयाची ताटे मोठाल्या पत्र्याच्या वा जर्मनच्या डब्यात वर्तमान पत्राचा कागद पसरुन त्यात एकमेकांवर न मोडता रचली जात.
      गुढीपाडव्याला गुढी उभारल्यानंतर प्रसाद म्हणून या शेवया गुळाच्या पाण्यात वा दूध साखरेत घालून वरुन असलेच तर चमचा भर तुपाची धार सोडून खायला दिल्या जात. तेव्हा मिळणारा आनंद स्वर्गीय असायचा. त्या चवीत हातांचे कष्ट, एकात्मतेची भावना, मायेचा ओलावा अन् गोडवा असायचा.
     वर्षभरात सणावाराला, विशेषतः अक्षय तृतीया, गुढी पाडव्याला कुणाच्या लग्नात, कधी न्याहरीत बदल म्हणून लागतील तशा या शेवया डब्यातून बाहेर पडायच्या. कधी रुखवतात तर कधी उप्पीट, दूध शेवया म्हणून ताटात हमखास मिरवत रहायच्या
        नागरपणात गावपण गेले. गावातील संस्कृती सदनिकेच्या चौरसफुटात बंदिस्त झाली. पाटावरच्या शेवया बनवण्यासाठी गल्लीत असणारे अठरापगड जाती-धर्मातील गृहिणींचे लागणारे हात बदललेल्या रुपड्यात बंदिस्त झाले. एकात्मतेचा, एकतेची भावना जपणारा सांस्कृतिक उत्सवाचा ठेवा हरवत गेला. शेवयाचा पाट नुसताच फळी बनून अंगा-खांद्यावर ओझी अन् भांडी घेवून पडून राहू लागला. कुणाकडे शेवया करायला जाणं अन् कुणाला घरी बोलावणं कमीपणाचं वाटू लागलं. लाकडी पाटाची जागा यंत्राने घेतली. सांघिक आपुलकीची 'तेव्हाची भावना' नव्या व्यवसायात आर्थिक गणितात रुजली. यंत्रावरच्या शेवयांची पांढरी धोट ताटं पैशाच्या जोरावर घरा-घरात रुबाब दाखवू लागली.
        हा रुबाबही काळाच्या ओघात काळवंडून गेला. अटकल बांध्याची, नाजूक 'झीरो फिगर' तारेसारख्या लांब शेवयांचा पुडा बाजारात स्थिरावला. हातासरशी घरी असणारी 'ती' आता गरजेपुरती घरी येवू लागली. चायनीजच्या नावाखाली तीचे नामकरण झाले. 'नुडल्स' च्या नावाखाली जाडे-भरडे धागे पोटात जंतासारखे वळवळू लागले.
         सांघिक कामकाजाचा संदेश देणारी गल्लीत, समाजात  नाजूक दोऱ्यात आपलेपणाची भावना बांधणारी लाकडी पाटावरची शेवयी कधी तुटली समजलेच नाही. जाताना एकमेकांशी असलेले ऋणानुबंध देखील तोडून गेली.
      ग्रामीण संस्कृतीतील कष्ट, कल्पकता आणि चवीचा अवीट ठेवा म्हणजे 'लाकडी पाटावरच्या शेवया'. दिखाऊपणाच्या जमान्यात, यंत्रांच्या युगात हरवत राहिलेली, ही कला सणावाराच्या निमित्तानं विशेषतः आजच्या गुढी पाडव्याच्या निमित्तानं आजही अनेकांच्या आठवणींच्या कोपऱ्यात सुगंध दरवळत ठेवते..!
   ©️®️ - कुसुमानंद
9403464101 
p7sons@gmail.com

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..