कोकण-गोव्याच्या सीमेवरील सांस्कृतिक लेणं: लाल मातीत रुजलेला 'धालोत्सव'

_*श्री धालो गे बाई..धाल्याने खेळूया..*_
*_गे बाई धाल्याने खेळूया.._*
*_पिपळ पेटला पाऱ्यारं..पाऱ्यारं_*
*सावरं रंभे घरदारं.._*
_*वारो व्हावता जळीमळी जळीमळी..*_
*_पावस पडता झिळीमिळी झिळीमिळी.._*
*_वारो व्हावता जळीमळी जळीमळी.._*
*_पावस पडता झिळीमिळी झिळीमिळी.._*
*_पायात घातले कडे तोडे कडे तोडे_*
*चल गे रंभे पुढे पुढे..*
*_आयल्यान गाठी पहिल्यान गाठी निसरगाठी सवता गे..ss निसरगाठी सवता गे..ss_*
निसरगाठी सवता..ss निसरगाठी सवता..ss
    *प्रशासन अधिकारी गितांजली नाईक यांनी ठेवलेला धालोत्सवाचा हा स्टेटस पाहिला. लयबध्द तालातील मालवणी, कोकणी सुरावटीचा लोकगिताचा हा बाज मला माझ्या सिंधुदुर्गातील आणि गोव्यातील वास्तव्यात घेवून गेला. गोवा कार्यालयाचा पदभार असतानाच सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी पदाचाही माझ्याकडे अतिरिक्त पदभार होता. त्यावेळी इथल्या लोकपरंपरा, लोकसंस्कृती जवळून जाणून घेण्याचा योग आलेला. गोव्यामधील साळ गावचे गडे असोत वा सावंतवाडी-गोवा सीमाभागातील 'धालो'..! सुरेल लोकगीतांच्या लयीच्या लोकपरंपरेचा, लोकसंस्कृतीचा गोडवा आपसूकपणे मनात झिरपत गेलेला. लिहीन लिहीन म्हणत राहिलेला हा विषय झरझर मोबाईलच्या पडद्यावर उतरत राहिला.*
      *नुकत्याच सरलेल्या सावंतवाडीतील माजगाव-म्हालटकरवाडा येथील धालोत्सवाने मी त्या उत्सवात मनाने वावरलो. मालवणी गोडव्यात सुरेल गीतात गुंतून गेलो, रंगून गेलो..*
    *कोकण... जिथे निसर्ग केवळ बहरत नाही, तर तो तिथल्या माणसांच्या मनात रुजतो, वाढतो. परंपरा, लोकसंस्कृती मधून उमलतो. लोक गाण्यांतून फूलतो. निर्सगाच्या सानिध्यात राहणाऱ्या कोकणी माणसाचा प्रत्येक सण, उत्सव हे निसर्गाशी जोडलेले आहेत. कोकणाविषयी बोलताना असं म्हटलं जाते, इथल्या मातीत माणूस पेरला तरी तो रुजतो आणि माणुसकीच्या देवराईला पालवी फुटून तो उगवतो.
     *पौषातल्या थंडीत चिऱ्यांच्या घरांवर आणि माडा-पोफळीच्या बागांवर जेव्हा दवबिंदू साचू लागतात, तेव्हा साऱ्या मुलखातील महिला वर्गाला वेध लागतात ते एका अनोख्या सोहळ्याचे.. 'धालोत्सवाचे' ! समस्त स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा हा सण!*
      *दक्षिण कोकण सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्या सीमारेषा जरी नकाशावर असल्या, तरी संस्कृतीचा हा अखंड धागा दोन्हीकडच्या गावांना एका माळेत गुंफतो. हा केवळ सण नाही, तर निसर्गाशी नाळ जोडलेल्या कोकणी स्त्रीने धरतीमातेशी केलेला तो एक 'संवाद' आहे. धालोत्सवाचे गारुढ पाहायचे असेल, तर तुम्हाला दक्षिण कोकण आणि गोव्याच्या अंतर्भागात जावे लागेल. जिथे आजही परंपरांची ही मुळे घट्ट रुतलेली आहेत.*
        *महाराष्ट्राच्या टोकाला असलेल्या दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यांतील गावांमध्ये आणि गोव्यातील गावांत धालोचा उत्साह ओसंडून वाहतो. एखाद्या घरच्या कार्यासारखा साजरा होतो. 'सातेरी' आणि 'रवळनाथा'च्या मंदिरांसमोर सजलेले मांड रात्रभर जागते असतात.*
   *तिकडे गोव्यात तर धालो हा महाउत्सव आहे. गोमंतकीय लोकनृत्य आहे. इथल्या भागांत धालोचे मूळ रूप पाहायला मिळते. 'कोकणी' भाषेचा 'गोवन' लहेजा मन तृप्त करुन सोडतो. कित्येक दिवस तो सूर मनात झंकारत राहतो. प्रत्येक वाडीवर एक स्वतंत्र मांड असतो आणि तिथे जमणाऱ्या सख्यांची लगबग पाहण्यासारखी असते. धालोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्यं म्हणजे मांड!*
      *दिवाळी संपली की भात कापणीची लगबग संपते. अंगण मोकळे होते अन् घर धान्याने भरुन जाते. या अंगणात, गावातील एका सार्वजनिक मोकळ्या जागेवर किंवा मंदिराच्या आवारात हा मांड भरवला जातो. मांडावर शेणाने सारवले जाते. तुळशी वृंदावनाची स्थापना केली जाते. तांदळाच्या पिठाची वा रांगोळी काढली जाते. हा मांड लोकसंस्कृतीचा उपासक, त्यापाठीमागे पावित्र्याची, मांगल्याची संकल्पना असते. पौषाच्या या महिन्यात थंडीच्या अस्तित्वात घरातील सर्व कामे आटोपून नऊवारी साडी, नाकात नथ, गजरे घालून महिलावर्ग मांडावर जमतो.*
        *'धालो' म्हणजे धावो..डोलणे.. उत्साह..चैतन्य संचारते. धरित्रीचा उच्छ्वास ! असे मानले जाते या दिवसांत धरतीमाता नवनिर्मितीसाठी सज्ज होत असते. दोडामार्गातील डोंगरांच्या कुशीत असो किंवा गोव्याच्या माशेलमधील मैदानात, स्त्रिया दोन पातीत अर्थात रांगांमध्ये उभ्या राहतात. कमरेत हात गुंफून, पायांच्या तालावर जेव्हा त्या डोलू लागतात, तेव्हा वातावरण भारावून जाते. घाटावरील पिंगा खेळण्यासारखा हा कलाप्रकार असतो.*
      *निसर्गाने स्त्री शक्तीचा केलेला सन्मान म्हणजे हा उत्सव होय. कोणत्याही वाद्यांशिवाय टाळ्यांच्या मदतीने लयीत लोकगीते गायली जातात. धरित्रीला वंदन करण्यासाठी तिच्या कुशीतली उब अनुभवण्यासाठी स्त्रिया दोन रांगांत उभ्या राहतात. कमरेत हात गुंफून पायांच्या तालावर जेव्हा त्या डोलू लागतात तेव्हा वातावरण भारावून जाते. जात्यातून पांढरे शुभ्र पीठ सांडत जावे, तसे त्यांच्या मुखातून हे लयबध्द शब्द घरंगळत राहतात. यात पुराणातील कथा आहेत. तसेच सासरच्या जाचाच्या किंवा पतीच्या प्रेमाच्या गोष्टीही आहेत.  काळजातून आलेली आर्त हाक शब्दरुपानं मनाला हुंकारत राहते. मोकळे करत राहते.*
     _*आमी धालो खेळूंक येता,*_
_*धालो गे बाय, धालो..*_
_*मांड दडूली गेलो,*_
_*धालो गे बाय, धालो..*_
*आम्ही तुझ्या अंगाखांद्यावर खेळायला आलो आहोत. आमचा भार सोस आणि आम्हाला सुखी ठेव असे त्या या गाण्यांमधून सांगत असतात.*
     *एखाद्या गावात, ग्रामीण भागात, जेव्हा एखादी आजी गाणं सुरू करते, तेव्हा त्यात तिथल्या निसर्गाचं वर्णन येतं:*
*_अंगणातली तुळस, बाई ग डोलते.._*
*_माझ्या माहेरची आठवण, काळजात सलते.._*
*_धालो गे बाय धालो.._*
*तिकडे काणकोणच्या भागात, वनदेवीला आणि स्थानिक देवतेला साकडे घालताना म्हटले जाते,*
_*मांडो मांडू ग रसाचो..*_
*_खेळ खेळू ग सोपाचो.._*
      *पूर्वी हा धालोत्सव ११, ९, ७ दिवस चालायचा. बदलत्या धावपळीच्या जीवनशैलीत तो आता काही ठिकाणी ५ दिवसांवरही येवून स्थानापन्न झाला आहे. शेवटच्या दिवसाची रात्र ही सख्यांची साखळी आणि जागराची रात्र बनत राहते. लोकसाहित्याच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तर गायिका दिव्या नाईक यांच्या सुरेल गायनाने याची मोहिनी घालण्याचे काम केले आहे. ही लोकधारा सर्वदूर पोहचवण्याचे काम या दोघींच्या माध्यमातून होत आहे.*
  *एखाद्या गाण्यात निसर्गाचे किती लोभसवाणे रुप असते पहा -*
_*चंद्रावळीन मांडू घातला..*_
_*सूर्यानं दिला उजेडू*_
_*चांदण्या राती खेळती सती..*_
*_धालो गे बाय धालो.._*
   *अर्थात चंद्राच्या साक्षीने मांड घातला असून, सूर्याने तेज दिले आहे. या चांदण्या रात्री आम्हा सतीसाध्वींचा खेळ रंगला आहे. महिलांवर लादलेल्या बंधनाच्या जोखडातून, वेदनेतून ती बंधमुक्त होत राहते. तिला शांतता लाभते आणि अभिव्यक्ती साकारत जाते. काही गाणी तर थेट काळजाला हात घालतात. जिथे माहेरच्या आठवणींनी डोळे पाणावतात, तिथे 'शब्द' सूरांच्या आधी अश्रूतून पाझरतात.*
    *या उत्सवात कोणताही भेदभाव नसतो. खांद्याला खांदा लावून उभ्या असलेल्या या स्त्रिया जणू एक अभेद्य साखळी तयार करतात. ही साखळी असते विश्वासाची आणि माणुसकीची. फेर धरताना फुगडी खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू वयाचे भान विसरुन लहान झाल्याप्रमाणे असतो.* 
     _*रुकवात करतले गे सुंदरी*_
           *_धेडे बैसले बरोबरी.._*
        *_असे धेडे उतावळी_*
        *_लाडू उचलेले वरचेवरी.._*     
       *सात दिवस चालणारा हा पारंपरिक उत्सव शेवटच्या दिवशीचा 'जागर' तर अंगावर रोमांच उभा करतो. रात्रभर चालणाऱ्या या खेळात पिंगा, झिम्मा आणि विविध सोंगे आणली जातात. संगीताबरोबर नाट्य, विविध खेळाने हा जागर वाढत राहतो. यात एखादी महिला पिंगळीची भूमिका करुन ती घरोघरी भेट देते.*
 *_दारी पिंगळी आला ग बाई .._*
   *_धरम त्याला करा ग बाई_*
*या गाण्याने या प्रथेचे महत्त्व तेवत ठेवले आहे.*
       *पहाटेच्या वेळी जेव्हा मांडावरची ज्योत शांत होते, तेव्हा मनात एकच प्रार्थना असते -*
*"हे धरती माते, जशी तू हिरवा शालू नेसून बहरली आहेस, तसेच आमचे आयुष्यही सुखा-समाधानाने बहरून दे!"*
       *'धालो' हा केवळ उत्सव नाही. तर, तो या निसर्गाचा, इथल्या लाल मातीचा श्वास आहे. सिंधुदुर्गातील तळकोकण असो वा गोव्याचा निसर्गरम्य परिसर, इथल्या माऊलींनी आपली संस्कृती आपल्या पदराशी घट्ट बांधून ठेवली आहे.*
      *एव्हाना, या निमित्तानं मला मराठी पदवी शिक्षणात अभ्यासाला असणाऱ्या निसर्गकवी ना. धो. महानोर यांच्या 'पळसखेडची गाणी' या पुस्तकाची आवर्जून आठवण येत राहिली.*
 *जोपर्यंत पौषातल्या रात्री गोवा-कोकण सीमाभागातील  मांडावर टाळ्यांचा गजर होत राहील, तोपर्यंत कोकणचे हे चैतन्य असेच अबाधित राहील!*
         *- कुसुमानंद*
 (प्रशांत कुसुम आंनदराव सातपुते)

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..