मुग्यांचं घरटं..!

     शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना..! 'घरटं' हे खास करुन पक्ष्यांसाठी वापरलं जातं. निसर्ग कवयित्री बहिणाबाईंची 'खोपा' ही त्यासाठी सर्वश्रुत आहे. मुंग्यांच्या घराला 'वारुळ' म्हणतात. बालपणापासून ते पहातही आलोय. या वारुळात साप अतिक्रमण करतो. म्हणून तर, 'आयत्या बिळात नागोबा' ही म्हण देखील रुढ झाली.
        होय, मुंग्यांचं जसं वारुळ असते, तसेच त्यांचे झाडावर खास करुन आंब्याच्या झाडावर मानवी डोक्याच्या आकाराएवढे वाऱ्यावर झुलणारे घरटं असते. हे देखील आपण कदाचित पाहिले असेल. परंतु, याच्या निर्मितीविषयी फार कमी माहिती घेतली असावी.
        लाल आणि काळ्या अशा प्रमुख दोन मुख्य मुंग्यांचे प्रकार सर्वत्र दिसतात. सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या हे आकारावरुन पडलेले प्रकार आहेत. काळ्या निरुपद्रवी तर, लाल, चावून चावून हैराण करुन सोडणाऱ्या. मग त्या आकाराने कोणत्याही असोत. पंख फुटून उडणाऱ्या मुंग्यांची जमात देखील विशिष्ट काळात दिसते.
     मुंग्या जमिनीखाली आणि वर वसाहत निर्माण करतात. त्यांना वारुळे म्हणतात. शेतात, जंगलात मुंग्या मातीचे गोलाकार किल्ले बांधतात. झाडांना पोखरुन त्यामध्येही आपली वसाहत थाटतात. अशाचप्रकारे विणकरी लालसर मुंग्या या आपली वसाहत झाडावर तयार करत असतात.
        सामाजिक सहकार्याची भावना आणि वास्तुनिर्मितीचा उत्तम नमुना म्हणून या मुंग्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच..! जमिनीवर घर बांधताना म्हणजेच वारुळ निर्मितीवेळी मातीचे कण गोळा करुन त्यात आपली लाळ मिसळतात. या लाळेत फाॕरमिक अॕसिड असते. त्याचा उपयोग हे कण एकमेकांना घट्ट धरुन ठेवण्यासाठी, चिकटण्यासाठी होतो.
      झाडावरील हिरव्या पानांचे घर बांधताना, मुंग्या आपल्या 'लार्वा'- अळ्यांचा वापर गोंद, डिंक म्हणून करतात. या अळ्यांमधून चिकट रेशिम धागे बाहेर पडून, ते पानांना एकमेकांशी बांधून ठेवण्याचे काम करतात. यासाठी असंख्य अळ्यांचा वापर केला जातो. वृक्षवासी मुंग्यांचा शक्तिशाली जबडा आणि पंज्यांच्या मदतीने झाडाची पाने ओढून धरुन ठेवली जातात. यासाठी कामकरी मुंग्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो.
       या वसाहतीमध्ये एक राणी मुंगी असते. ती आकाराने सर्वात मोठी असते. एकाचवेळी हजारो अंडी देण्याचे काम ती करते. तिला भरवण्याचे, मोठी करण्याचे आणि अंड्यांची देखभाल करण्याचे काम देखील या कामकरी मुंग्या करतात.
       या तयार झालेल्या घरट्यात लाखोंच्या संख्येने मुंग्यांचे वास्तव्य असते. पावसाचे पाणी वा शत्रू आतमध्ये जावू शकत नाही. एखादा कीटक आतमध्ये जातो, ते छमुंग्यांचे अन्न म्हणूनच.!
    ओरोसमधील जंगलात इंदोरजवळील कनाडिया येथील काही भागात पक्षी निरीक्षणाच्या भटकंतीत अशी कैक घरटी मला आकाशी, आंब्याच्या झाडावर आढळली.*
      *एके ठिकाणी कवठाने लगडलेले झाड आढळले. माझे ग्रामदैवत असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाताना अर्जुनवाडकर-कुलकर्णी वकिलांच्या घरी आजही मोठाले कवठाचे झाड, उन खात, गारा गात, उभेच आहे. ते मला आठवले. लहान असताना मंदिराकडे जाताना दररोज एक कवठ हमखास मिळायचे. हा प्रसंग आठवला आणि झाडावरील कवठ पाडण्याचा मला आणि सौ. ला मोह झाला. खाली पडलेली फांदी घेवून कवठ पाडताना नजिकच्या आंब्याच्या झाडावरील मुंग्यांच्या घरट्यावर चुकून फांदीचा तडाखा बसला. तशा लाखो लाल मुंग्यांची रिवणच क्षणार्धात आतून बाहेर पडली. या कामकरी-सुरक्षा रक्षक मुंग्या होत्या. आपल्या घरट्यावर कोणत्या शत्रू पक्षांकडून हल्ला झाला, हे पाहण्यासाठी गतिने बाहेर आलेल्या. जमिनीच्या गर्भातून लालबुंद लाव्हा बाहेर पडावा, अगदी तशा त्या अजूनही बाहेर पडत होत्या. घरट्याचा, पानांचा हिरवा रंग गायब होवून तो लालसर दिसू लागला. जणू हे घरटेच रागाने लालबुंद झाले.*
      *सहजच नजर अवती-भोवती गेली. पहावं त्या आंब्याच्या झाडावर, आकाशीवर मुंग्यांचे इमले अर्थात घरटी होती. काहिसी नुकतीच सुरुवात झालेली हिरव्या कच्च पानांची छोटीशी तर, काही भली मोठी वाळत आलेली. हा एक वेगळा नजारा आजवर पहात आलेलो. पण, इथे ती जरा जास्तच नजरेत भरणारी.
      शत्रूची टेहळणी आणि घराच्या नुकसानीची पाहणी करत उठलेले हे लाल मुंग्यांचे मोहोळ पुन्हा आतमध्ये गडप झाले. यावेळी मी जर त्यांच्या तावडीत सापडलो असतो तर, माझी खैर नसती. या मुंग्या कमालीच्या दंश करतात. लाळेतील जहाल फाॕरमिक अॕसिडचा दणका दिसल्याशिवाय राहत नाही.  शरिराची आग-आग करुन सोडतात. त्यांचे काही क्षण निरीक्षण करुन, आम्ही कवठाचा नाद सोडून पुढे सटकलो.
        मुंग्यांच्या झाडावरील या वसाहतीमुळे कीड नाहीशी होते. लहान कीटकांमधून मुबलक प्रथिने त्यांना मिळतात. त्यामुळेच केरळमधील काही भागात मुंग्यांची चटणी मानवी आहारात दाखल झाली आहे.
    मधमाशी, वाळवी आणि मुंग्यांचा वसाहतीबाबतचे जीवन जवळपास सारखेच आहे. वाळवीदेखील वारुळ बांधते. तिघांमध्येही 'राणी' असतेच. तिच्या सेवेसाठी सेवेकरी असतातच.
        मुंग्यांच्या सहजीवनाचे, संघटितपणाचे, सहकार्याचे, संरक्षणाचे, कष्टाळूपणाचे आणि प्रामाणिकतेचा समावेश आपणही आपल्या जीवनात करायला काय हरकत आहे..!
       -कुसुमानंद ( प्रशांत सातपुते )

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..