"विल्सन" सातपुते..अन् वर्गातील "चांदणे"..!

   बहुधा मी १२ वीला असेन. सुरुवातीला मी वाणिज्य शाखेला होतो. पुढे मी कलाशाखेतून (वाणिज्य 😃😜 न झेपल्याने) पदवीधर झालो तो भाग वेगळा.😉
  जयसिंगपूर महाविद्यालयात संजय जिरगे, गुरुदास पवार, विनोद घाडगे, संदीप पाटील, शेखर गंगधर, रफिक शेख, विजय देसाई अशी दिग्गज विद्यार्थ्यांसोबत मी एक गरीब बिचारा(😜) होतो. 
  गंमत अशी, कोण कला शाखेला तर कोण वाणिज्य शाखेला असूनही आम्ही सगळे एकाच वर्गात एकाच प्राध्यापकाच्या वर्गात बसत असू. कशाला ते वेगळे सूज्ञांस सांगायला नको.(तेवढी अक्कल हुशारीच आमची😄) 
   अक्षरशः लहान मुलांच्याप्रमाणे प्राध्यापकांकडे एकमेकांच्या तक्रारी करत असू. यात अगदी यानं मला डिवचलं सर, यानं मला मारलं यांचा समावेश असायचा.(अजूनही वेगवेगळ्या तक्रींचा सूर यात होताच.😁) वर्गात अशा तक्रारी करुन प्राध्यापकांची खेचा खेची करण्यात जो तो पुढे असायचा. 
  यात आमचे जिरगेअण्णा चतूरच! सरांनी चिडून एखाद्याचे नाव विचारले तर त्याच्या बापाचे किंवा त्यावेळी जे आठवेल ते सांगत असू. मग ते सर त्याच नावाने काॕलेजकुमारला वर्गात हाक मारायचे आणि सगळा वर्ग हसायचा. 
  वर्गात काॕलेजकुमार उभे आहेत.. गुरुजन त्याच्या पिताश्रींच्या नावाने त्याला संबोधत आहेत.. आणि सगळा हास्यकल्लोळ.. त्यानंतर हे महाशयही हसतायेत आणि गुरुजन मात्र गोंधळलेत.. केवळ याची आज कल्पना केली तरी आपसूकपणे मुखकमल विलग होवून आतील दंतपक्ती समोरच्याला दिसतील. किमान इतपत तरी हास्य लकेर उमटेल.
  शिवाय पुढे ते शिक्षक आणि त्यांच्यासोबतचेही त्याच नावाने म्हणजे काॕलेजकुमारांच्या पिताश्रींच्या नावानेच हाक मारायचे तो भाग आणखी वेगळा. शेवटी बापाचा वारंवार होणार उद्धार पाहून आम्हा मित्रमंडळींना चार-दोन शिव्या या नित्याच्याच ठरलेल्या. याची मांडवली मग  काॕलेज कँटीनमधील रामाच्या अर्ध्या वड्यात व्हायची.
   असेच एके दिवशी आम्ही सगळे प्रा चांदणे यांच्या इतिहासाच्या तासाला बसलो होतो. फळ्यावर त्यांनी, "प्रकरण पहिले" असे लिहिले आणि पाठीमागून आवाज आला, "सर, आशी आजून किती प्रकरणे हाईत...तुमची? ...म्हणजे शिकवायची ओ."😂
  यात बिचारे ते थोडे गोंधळून गेले. पुन्हा फळ्यावर वेगवेगळ्या इतिहास संशोधकांची नावे लिहिली यात एक नाव 'विल्सन' असेही होते. 
दरम्यानच्या काळात एक-दोन उद्धार, दोन-चार लाडीक तक्रारीझाल्या. झोपाळलेल्या तानसेनाकडून मध्येच तोंड वासून मस्त तान सोडला गेला. आतापर्यंत वर्गाने चांगलाच 'सूर' पकडला होता. दिवसाही प्रखरपणे 'चांदणे' पडलेले असताना. सरांच्या तोंडावर अमावस्येचा काळोख पसरु लागला होता. ते सपशेल गोंधळले होते आणि या सगळ्यात माझ्या डोक्यात नेमकी याच वेळेला शंका कडमडली.
  मी प्रामाणिकपणे उभे रहात, "सर शिवशके आणि इ. स. यात नेमके किती वर्षांचा फरक पडतो?",असा प्रश्न विचारला. 
  माझ्या प्रश्नाने वर्गावर काडीचाही फरक पडला नसला तरी, सरांच्या चेहऱ्यावर  पडलेला दिसला. एव्हाना पोरं आपली खेचताहेत हे त्यांना उमगलं होतं. मग गोंधळलेल्या अवस्थेत ते म्हणाले,"तुमची काय शंका असेल तर स्टाफरुममध्ये तास संपल्यावर येवून भेटा. काय नाव काय तुमचं?"
  कोणत्याही प्रश्नावर उत्तराची अपेक्षा वर्गाकडून कधीच नसताना 'नावाच्या' प्रश्नावर मात्र दोन-चार उत्तरे एकावेळी येत. झालेही तसेच. आपले संजय जिरगे यांनी मी स्वतःहून नाव सांगायच्या आधी वर्गाला हाताने शांततेचा इशारा करत  फळ्यावर लिहिलेले आणि माझे आडनाव यांचा सुंदर मिलाप घडवून पुन्हा नव्याने बारसे घालत, अगदी ठासून, अधिकारवाणीने 'विल्सन सातपुते' असे सांगितले. 
  यावर माझे मलाच हसू आवरेना. वर्गही हसतोय आणि सर थोडे चिडून म्हणाले," विल्सन, तुम्ही तास संपल्यावर भेटा. तुमच्या सगळ्या शंका निरसन करु."😃😆
   या सगळ्या हलकल्लोळात 'ऐतिहासिक नामकरणाचा' तास अखेर संपला. नंतर स्टाफरुमलाही मी प्रामाणिकपणे गेलो. तर, तिथेही ही सगळी अगदी "मला पोहचवायला आणि त्यांना खेचायला" सोबत होतीच. सरांनी शंका दूर केली. पण, ते मला विल्सन म्हणूनच बोलवत राहिले. अगदी काॕलेज पूर्ण होवूनही कित्येक वर्ष ते मला 'विल्सन' नावानेच हाक मारत होते. शेवटी मीच एकदा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटल्यावर खरं सांगितलं. यावर ते एवढंच म्हणाले, त्यात तुमचा काहीएक दोष नाही. आम्हीही तुमच्या वयाचे होतो कधितरी..!
  आता मात्र माझ्यावर खरोखरच दिवसा 'चांदणे' पसरले होते
-प्रशांत सातपुते
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0ZgtQjoHxz6BJDvGwQ2gUH5RrApLSbdHwxmBWyA5VTrzKPTRCXXQvzWwrbz46PTL9l&id=100001067020937&mibextid=Nif5oz
९४०३४६४१०१
p7sons@gmail.com

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..