माझी शाळा
"ही आवडते मज मनापासुनी शाळा..लाविते लळा ही जसा माऊली बाळा.."
मनाच्या कोंदणात अगदी खोलवर रुतलेलं, कदाचित जपलेलं हे गीत आज उसळी घेवून वर आलं. तिसरी-चौथीत असताना माझ्या शाळेवरील हे प्रेमगीत हातामध्ये शाळेची पुठ्ठ्याची प्रतिमा घेवून म्हटलेलं आजही जसंच्या तसं आठवतय.
गल्ली क्रमांक १२ मधील जयसिंगपूर नगर परिषद शिक्षण मंडळाची शाळा क्रमांक ७ ही माझी प्राथमिक शाळा..! या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत मी शिक्षण घेतले. श्री. लंगरेसर अरे हो, त्यावेळी सर नाही गुरुजी हे संबोधन होते शिक्षकांना. दिवंगत लंगरे गुरुजी हे मुख्याध्यापक होते श्री राजमाने गुरुजी हे वर्गशिक्षक पै. पठाण बाई, श्री कोळी गुरुजी, श्रीमती आपटे बाई आणि वर्गमित्र शशीची आई श्रीमती हंकारे बाई असा शिक्षकवृंद होता.
तर, राजू भोसले, शशिकांत हंकारे, रफिक शेख, शुभदा मल्लाडे, सुषमा बुकशेट, विद्यासागर आरबाळे, राहूल जाधव, मेहेरअली गवंडी, शबाना शेख, रेहाना मुजावर, अगदी शाळेसमोर राहणारी राधा आवळे असे आम्ही सर्व वर्गमित्र! यात बरीचशी नावं अजून घालता येतील.
मारकुटे गुरुजी असा खाक्या कोळी गुरुजींचा होता. आपटेबाईंचे आपटेगुरुजी कधी कधी कथा अर्थात उत्तम गोष्टी सांगायला शाळेत येत असत. शाळेत कधी जादूगार यायचा तो जादूचे मनोरंजनात्मक प्रयोग करुन सुखावून जायचा. हे प्रयोग विज्ञानावर आधारित असतात, याची माहिती दिवंगत लंगरे गुरुजी सांगायचे. शाळेत लेझीम, घुंगुर काठीचे खेळ चालायचे. वस्तुतः शाळा ही सातवीपर्यंत असल्याने विशेषतः मोठ्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा यात सहभाग असायचा.
हातगा
काळ्या कुळकुळीत पाटीवर पांढऱ्या शुभ्र खडूने हत्तीचे चित्र काढले जायचे. शाळेच्या शेवटच्या टप्प्यात सर्व मुली या पाटीवर फुले वाहून गोल फेर धरुन हातग्याची गाणी म्हणत. आम्ही हे सर्व पहायचो. गाणी म्हणून समाप्तीनंतर आणलेल्या डब्यातील खाऊ वाटून संपवत. बऱ्याचवेळा हे डबे आधिच आम्ही खायचो😜😄 यात प्रामुख्याने फरसाण, बिस्किटं, लकडी, गुडदाणी असे यात जवळपास पदार्थ असायचे.
शाळेसमोरच राहणारी आणि सातवीत असणारी जरीनाचा यात विशेष पुढाकार असायचा. आज हातगा गायब झालाय. काही मराठी मालिकांमधून अधून-मधून डोकावतोय. तर मुंबईमध्ये हौसेने आणि स्पर्धेच्या माध्यमातून !
सहल
शाळेत चौथीमध्ये असताना वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड, महाड,पाचाड आणि रायगड अशी ३५ रुपयांत ७ गावांसाठीची सहल निघाली होती. या सहलीचे पैसेही पोलीस असणाऱ्या माझ्या एका काकाने तेही दोन किंवा तीन हप्त्यात भरले होते.
या सहलीला जाण्यासाठी मला वेळ झाला होता आणि शेवटी माझ्या जागेवर अतुल खरात याला घेवून जाण्याचे ठरले. हा ही अगदीच समोर रहायचा. पण तेवढ्यात मी शाळेसमोर उभ्या असणाऱ्या एस टी जवळ पोहचलो आणि ऐनवेळचा सहलकरी अतुलला उतरावे लागले. पुढे अकरावीला याच अतुलच्या प्रिंटींग प्रेसमध्ये माझे कमवा व शिका धोरण सुरु झाले.
आयुष्यात बरेच पर्यटन आणि ते ही बऱ्याच "प्रांतात" झाले. पण, सहल नावाची जी गोष्ट असते ना, शालेय जीवनातील ती पहिली आणि शेवटची इथेच ठरली! या सहलीतही महाबळेश्वरमध्ये विविध पाॕईंटवरील निसर्गाचा नजारा पाहण्यासाठी अवघी दोन-चार रुपयाला घेतलेली दूर्बिण आणि तिचा हरवण्या-सापडण्याचा इतिहास सर्रकन रात्रीत डोळ्यासमोरुन गेला.
याच सातारा जिल्ह्यात पुढे ना एक दिवस कमी-ना एक दिवस जास्त अशी चार वर्षे आपणास नोकरी करायला मिळेल, असं क्षणभरही वाटले नव्हते त्यावेळी.
रायगडावर पायऱ्या चढताना सहलकऱ्यांना जागोजागी ताक देणारे त्यावेळचे "ते" हात आज काय करत असतील? हा प्रश्न आता उगीचच विचार करायला लावतो. अवघ्या ५-१० पैशाला मिळणारे गारेगार, २५ पैशाला मिळणारी दूध कँडी, ५० पैशाला मिळणारी कुल्फी शोधताना मन सैरभैर होते. स्वप्नवत रममाण होवून हरवलेले बालसुख शोधताना हिंदोळ्यावर अगतिक व्हायला होते.😌
पण, या आठवणिच्या समृद्ध ठेव्याने आजही जगातील सुखी कोण? तर मीच ही बिरुदावली मिरवायला भारी वाटतय.
राजू भोसलेच्या वाढदिवसाला सगळ्या शाळेला पानगोळ्या वाटल्या होत्या. पुढेही शिल्लक राहिलेल्या या गोळ्या आम्ही वर्गातच चघळत असू आणि तोंडाला येणारा सुवास मुद्दाम इतरांसमोर तोंड वासून दाखवत असू. आज या बालिशपणावर माझे मलाच हसू येतय.पण, मन सुखावूनही जातयं. श्रीखंडाच्या गोळ्या, लेमण गोळ्या, चिंचा, इलाई(अर्थात विलायती) चिंच, भाजलेले चिंचोके आणि बाटली, प्लास्टिक, पत्रा-लोखंडावर घेतलेले गारेगार ही अक्षरशः त्यावेळी मेजवानी असायची!
याचा एक मजेशीर किस्सा आठवतोय. तो मी माझ्या कथेत घातला आहे .पण इथे सांगतो.
शनिवारची शाळा सुटली की आई तंबाखूच्या कोट्यात कामाला जात असल्याने घरी जाण्यापेक्षा शाळेजवळच असणाऱ्या मामांकडे मी थांबायचो. मग गल्लीत राहणारे आणि शाळेत असणारे आमची गँग एकत्र यायची. दुपारी भर उन्हात गल्ली चिडीचूप व्हायची. ही संधी साधून घराबाहेर खुंटीला टांगलेले असो नाहीतर बाहेर ठेवलेली टमरेलं आम्ही गल्लीत येणाऱ्या गारेगारवाल्याला द्यायचो आणि मनसोक्त लालेलाल गारेगारचा आनंद लुटायचो. कालिमातेसारखी लाल जीभ बाहेर काढून मिरवायचो. सगळं कसं भारी वाटायचं. 😜😍😄
संध्याकाळी- सकाळी सार्वजनिक शौचालयासाठी जाणाऱ्यांची पंचाईत व्हायची आणि नव्या टमरेलाच्या शोध मोहिमेनंतरच शिव्यांचा तोंडाचा पट्टा थांबायचा. कधितरी नाव फुटायचे तशी आमची पाठही!
आज आठवणींच्या डोहातून वेगवेगळी गाठोडी सुटत आहेत. हे लिहावं- की ते..!
पुढे मी बरेच साहित्य वाचलं आणि काही प्रमाणात लिहिलंही. बऱ्याचवेळा मी लिहिलेही मलाच आठवत नाही.
पण, शाळेतील "धीवर पक्षाच्या वर्णनाची "तळ्याकाठी गाती लाटा, लाटामध्ये उभे झाडं ! झाडावर धिवराची हाले चोच लालं जाडं! शुभ्र छाती पिंगे पोटं, जसा चाफा यावा फुली! पंखजणु थंडीमध्ये, बंडी घाली आमसुली..!"
ही कविता आजही चालीसह पाठ आहे. मराठी शाळेतील बाईंनी त्यावेळी अतिशय सुंदर चालीत ती शिकवल्याने आजही आठवते. हे याचे कारण धुंढाळताना सापडले.
अशा अनेक आठवणी आज पोतडीतून बाहेर पडत आहेत. तुर्त इतकेच! आयुष्याच्या शाळेत अनेकांनी "शाळा" केल्या. जागोजागी "गुरु" भेटले. पण, "आईचा लळा" लावणारी माझी मराठी शाळा आजही वंदनीय आणि गुरुस्थानीच राहिलीय. आयुष्यात यश-अपयश, मान-अपमान हे सगळं पचविण्यासाठी केवळ माणूस राहण्याच्या बाळकडूची बिजे याच शाळेत खोलवर रुजवली आहेत..!
-प्रशांत सातपुते
(केवळ सध्याचा भाग पूर्ण)
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4508258895886300&id=100001067020937
Comments
Post a Comment