चांदीची 'ती' बटने..!
आठवडाभरापूर्वी सौ च्या वाढदिवसानिमित्त तिचे शिक्षक डाॕ. विजय माने, तिच्या वर्गमैत्रिणी डाॕ. पल्लवी आणि डाॕ. स्नेहल यांच्यासोबत २२ वर्षानंतर छोटेखानी कार्यक्रमात एकत्र आलो होतो. भोजनानंतर डाॕ मानेसरांनी सर्वांना आवर्जून मसाला पान खाऊ घातले. पानवाल्याने ही थंडगार गुलकंदी पाने चांदीच्या आवरणात बांधून ठेवली होती. आवरण उघडून आतील मधूर पानाचा आस्वाद घेतानाच, तांबूल सेवनाची चर्चा करत थेट लिळाचरित्रात पोहोचलो. म्हाईंभट, चक्रधरस्वामी असा प्रवास करत हातातील पानाच्या चांदीच्या आवरणात पुन्हा परतलो.
लहानपणी मराठी शाळेत आणि अगदी माध्यमिक शाळेतील सुरुवातीच्या काही वर्गात असताना याच चांदीच्या कागदाच्या आठवणीत रममाण झालो. खरंतर हा अॕल्युमिनियमचा पातळ कागद ! परंतु, त्याला रुढ अर्थानं 'चांदीचा कागद' हेच नाव चिकटले आहे.
ती चर्चा तिथेच संपली. पण, मी मात्र त्या आवरणाभोवतीच फिरत राहिलो. आवरण उघडून आतील मधूर पान तोंडात घालताच आपसूक क्षणभर डोळे मिटावेत आणि त्या तांबूलसेवनात काही काळ हरवून जायला व्हावे. गुलकंदाचा गोडवा थंडगार अन्य साथीदारांसह उदरात खोलवर सरकतानाच बालपणीच्या खोलात दडलेल्या वा हरवलेल्या मधूर-गोड आठवणी चांदीच्या आवरणातून बाहेर पडताहेत.
गावात कुणा श्रीमंत व्यापाऱ्याच्या लग्नात, गणेशोत्सवात आरास करण्यासाठी आणलेल्या कागदात, वस्तूच्या पॕकींगमधून वा अशाच कुणा मित्राकडे कुठून तरी हा चांदीचा कागद आलेला असायचा. हाच कागद कधी पुस्तकांना आवरणासाठीही वापरत आसू. भले आतील पुस्तक जुने असो पण, चकचकीत आणि उन्हात अधिकच चमकणाऱ्या आवरणात ते विराजमान झालेले असे. वर्गात तो एक वेगळाच रुबाब सांगून जायचा. जडजवाहीर अगदी कोंदणात बसल्यासारखे हे जुने पुस्तक काही काळच स्थानापन्न व्हायचे. अतिशय पातळ कागद असल्याने ते फाटायचे आणि खट्टूपणाचा ओरखडा मनावर उमटायचा.
मग फाटलेला हा कागद आमची आभुषणे व्हायचा. कधी अंगठी बनून बोटात बसायचा. कधी शाई संपलेल्या बाॕलपेनाने कोरलेले वेगळे लेखन घेवून दर्शनी पडून रहायचा.
मला आजही आठवतेय, शर्टाच्या बटणांवर हा कागद अगदी बटणांच्या अंगाबरोबर चोपून मी बसवायचो. ही बटने तेव्हा चांदीची दिसायचीत. ती लावून मिरवण्यात त्यावेळी मोठा रुबाब मला वाटायचा.
फाटलेल्या, तुकडे होवून सापडलेल्या, मिळालेल्या या अॕल्युमिनीयमच्या कागदात चांदीचे समाधान सुखावून जायचे.
सध्या घरातून निघताना सौ. डबा देते. चपातीची गुंडाळी ही या फाॕईलमध्ये, अॕल्युमिनीयमच्या या कागदामध्ये आवर्जून देते. प्रिय मित्र सचिनने भेट म्हणून चांदीचा पेन दिला. काॕलर पीन, टाय पीन चांदीचे.. 'नवा जमाना..नव्या संकल्पना..' अंगावर कितीही सोन्याचे वा चांदीची आभुषणे घाला मित्रांनो, पण "त्या" चांदीच्या बटनांचा रुबाब नाही मित्रांनो..!
-प्रशांत सातपुते
p7sons@gmail.com
9403464101
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4508258895886300&id=100001067020937
Comments
Post a Comment