चंद्रामतात्या
"मुलगी पसंत हाय न्हवं.. तुमास्नी.."
"व्हय तर.. हे काय इचारनं झालं व्हय.."
"झालं तर मग.. आता जरा देण्या-घेण्याचं बोलू.."
"देण्या-घेण्याचं आनी काय त्यात?"
"तसं न्हवं.. रित-भात हायच की.. ती सोडून चालत्या व्हय.."
"आरं ए मर्दानू.. का उगीच वात्या कुटाय लागलाय? पाव्हणं तुम्ही तुमचा मुलगा सजवा, आणि पाव्हणं तुम्ही तुमची मुलगी ! झालं न्हवं मनासारखं.. चला, आता घ्या साखर आनी करा एकमेकांचं त्वांड गोड"
चंद्रामतात्यानं शेवटी अधिकारवाणीनं तोडगा काढला. गेले चार तास चाललेल्या चर्चेवर हुकमी तोड निघाली होती. वायफळ बडबडून हातघाईवर येणारं प्रकरण क्षणार्धात शांत झालं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेलं दिसत होतं. फिसकटणारी बोलणीच नाही, तर दोन कुटुंबं, दोन मनं आणि नवी सोयरिक चंद्रामतात्याच्या मध्यम मार्गानं जोडली गेली होती.
साखरपुडा संपन्न झाला. इकडं मुठी भरभरून साखर एकमेकांच्या तोंडात घालत, पाहुणे मंडळी खिदळत होती. तर तिकडं आतमध्ये आता बायकांची एकच धांदल उडाली होती. उपवधुला हळदी-कुंकू लावून तोंडात साखर घालणारे मघाचे हात, आता पदर खोचत स्वयंपाकात गुंतले होते. भराभर रवा भाजून शिऱ्याला आधण ठेवलं गेलं. दुसरीकडं मसाला भाताला आणि आमटीला फोडणी पडली. खमंग वासानं वाढलेली रसना आणखीनच चाळवली गेली. तर आमटीच्या ठसक्यानं सबंध माजघरात खोकला उसळला. तशी मंडळी ठसकत, उसकत बाहेर आलीत. पण, अगदी काही वेळापुरतीच ! चाळवलेली रसना, पत्रावळीच्या ओढीनं पावलं तिथंच घुटमळू लागलीत. जेवण बनवण्याची घाई चालली होती.
तर दुसरीकडं घरातल्याच एका तरण्याबांड पोराला सायकलीवरून गावात पिटाळत वायचळच्या दुकानातून याद्याचे कागद आणायला चंद्रामतात्यानं सांगितलं. ते पोरगं सायकलीवर टांग टाकून गावात निघून गेलं. तसा चंद्रामतात्या पाव्हण्यांच्या घोळक्यात गुरफटला.
थोड्या वेळातच आतमधली धांदल मंदावली आणि बाहेर पत्रावळ्या मांडल्या गेल्या. तसा मघापासून भुकावलेला प्रत्येक देह आता पत्रावळीवर विसावला होता. 'बसा' म्हणायचा आग्रही पाहूणचार अधीरतेनं कधीच लोपला होता. विसावलेला तो देह आता अधाशीपणानं पत्रावळीवर आडवा तुटून पडला होता. घामाघूम आणि शेंबूड पातळ होईस्तोवर आमटीचं द्रोण भुरकत होता. भूकंपात जमीन भेगाळावी आणि पडलेल्या भेगेत डोंगर गडप व्हावा, तसा भाताचा आणि शिऱ्याचा ढिग भुकेल्या पोटात गडप होत चालला होता.
जेवून-खाऊन दमलेल्या पोटातून समाधानाच्या तृप्तीची ढेकर बाहेर टाकत मंडळी गरगरीत भरल्या पोटानं बाहेर पडत होती. कुंकवाचा नाम कपाळावरून नाकावर ओघळून शेंड्यावरुन खाली ठिबकण्याच्या तयारीत होता. काहीजण मघापासून हुळहुळणारी नाकं तिथंच मोकळी करण्यात गुंतली होती. निथळणारा घाम आणि नाकं पुसणाऱ्या हातात आता पानाच्या चंच्या दिसू लागल्या होत्या.
‘‘मघापास्नं नुस्ती वांझ चर्चाच चाल्ली हुती.’’
आता सुपारीची खांडं तोंडात पडून समाधानाच्या चर्चेनं जोर धरला होता.
''तर काय जेवणाचा टाईम कधीचा उलटून गेला की राव''
‘‘उलटून ? सांजंचं आणि दोपारचं एकच झालं की राव आज.’’
''माज्या तर पोटात खड्डा पडला हुता नुस्ता"
‘‘मला तर वाटलं फिसकटतया सगळं ! बाँब हुतिया जेवणाची."
"तर काय..? म्हशीनं चघळावं तशी चर्चेची नुस्ती रवथ चाल्ली हुती न्हवं. फेसच नुस्ता !’’
‘‘चंद्रामतात्यानं मात्र नामी तोड काडली.’’
"नामी ? हुकमी म्हणा..अशी मोडत आल्याली कैक लग्न जोडली हाईत चंद्रामतात्यानं."
"मोठ्ठं पुण्ण्याचं काम हाय ते."
पानाचा तोबरा भरून कुणी वर तंबाखूची चिमूट सोडून मंडळी आता चंद्रामतात्याचं भरल्या पोटानं, दाढवान दुखेस्तोवर तोंडभरून कौतुक करत होती. पट्टी लावून पाटीवर रेघ मारावी तशी चर्चेमधूनच दोन बोट तोंडासमोर धरून तंबाखू मिश्रीत लाळेची रेघ हवेतून थेट जमिनीवर काढत होती. बोटानंच मिशा साफ करून पुन्हा चर्चेला जोर धरत होती. चंद्रामतात्या मात्र, मघाशी मागवलेल्या याद्या हातात घेवून, चांदीच्या काडीनं दात टोकरत याद्या लिहीण्यात गुंतला होता. दोन्ही मंडळींच्या मनासारख्या याद्या लिहून झाल्यानंतर त्याचं आदान-प्रदान टॉवेल, टोपी आणि नारळाच्या साक्षीनं उरकून घेतलं. जेवण छान झाल्याचं सांगून ‘अन्नपूर्णेचं’ आता तो कौतुक करत होता. यातच लग्नाचा पुढचा मुहूर्त कधीचा धरायचा ? या विचारात दोन्हीकडंच्या जाणकार पाहुण्यांबरोबर बोलण्यात गुंतला होता.
शिडशिडीत बांध्याचा, जवळजवळ सहा-सव्वासहा फूट उंच, डोक्यावर पांढरीधोट गांधी टोपी, तीन बटणी शर्ट, पायघोळ धोतर, करकर वाजणारं कातडी पायताण. हातात पानाची पिशवी आणि तोंडात कायम पानाचा तोबरा, मध्येच चांदीच्या काडीनं दात टोकरणारा असा आमचा चंद्रामतात्या ! म्हणजेच चंद्राम दादू टोणपे होय. पोटापुरती शेती. त्यात ऊस लावलेला. दोन मुली, एक मुलगा आणि बायको, असं पंचकोनी कुटूंब असणाऱ्या चंद्रामतात्याला लग्नं जमवण्याचं भारी वेड होतं. त्यासाठी तो पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. ‘घरची सोडून गावची उसाभर करण्यात जिंदगी गेली.’ असं पालुपद त्याची बायको त्याच्यामागे नेहमी लावायची.
एका अर्थानं ते खरंच होतं. चंद्रामतात्याचा पाय स्वत:च्या घरात कमी आणि पाहुणे मंडळींच्या दारात जादा पडलेला असायचा. नेहमी तो गावोगाव फिरायचा. कुणाचा निरोप यायचा अवकाश, तो लागलीच निघाला. लग्नाची स्थळं पाहण्यासाठी तो घर-दार सोडून आठवडा-आठवडाभर पाहुण्यांच्या घरी जाऊन राही. कधी-कधी पदरमोड करुन अगदी कर्नाटकातसुद्धा तो जाई. नवख्या पाहुण्यांच्या घरात राहून त्या घरातल्या माणसांची सगळी माहिती काढीत असे. अशी कितीतरी लग्नं त्याने जमविली होती. त्यात अगदी मोडत आलेली देखील ! कधी हिकमतीनं तर कधी समजुतीनं त्याने सराईतपणे जमवली होती. ताणून धरलेला देण्या-घेण्याचा विषय परिस्थिती बघून सोडवण्यात त्याचा हातखंडा होता. इथं त्याला पाहुण्याच्या घरात आठवडाभर मारलेला ठिय्या कामी यायचा. या ठिय्याच्या अनुभवाचा आणि जवळीकतेचा वापर तो खुबीने करायचा. अशा त्याने फुलविलेल्या संसारवेलीवर लागलेल्या फळा-फुलांची लग्न जमविण्याचं कार्यदेखील तो निर्मळपणे करायचा.
‘‘तुझ्या आई-बा चं लगीन म्याच जमिवलंय", असं तो अधिकारवाणीनं सांगायचा आणि सांगताना चांदीच्या काडीनं दात टोकरायचा. या त्याच्या मोकळ्या-ढाकळ्या स्वभावामुळं नवे पाहुणेही त्याचा अदबीने मान राखत आणि समजुतीनं बोलणी करत.
देसिंगच्या माध्यमिक शिक्षकाला डी. एड. किंवा बी.एड. झालेली मुलगी हवी असल्याचा सांगावा चंद्रामतात्याला गेला. तसा रात्रीतनं त्यानं जयसिंगपूर जवळ केलं. खरंतर रात्री-अपरात्री येणाऱ्या माणसाला पाहून, कुणीतरी गेल्याचं वाईट कारण समजलं जायचं. परंतु, चंद्रामतात्याच्या येण्यामागे नेहमी सुखद कारण असायचं. उपवर मुला-मुलींसाठी हक्कानं स्थळ आणणं, हेच असायचं. जयसिंगपुरातील डी. एड. झालेली मुलगी असल्याचं त्याच्या डोक्यात फिट होतं. त्याच जोरावर त्यानं येणं केलं होतं. मुलीकडची परिस्थिती बेताचीच होती. पोटाला चार पोरी, लहान मुलगा, वडील व्यसनी आणि आई कामाला जाणारी अशा गरिबा घरची मुलगी डी. एड. झाल्याचे त्याला माहीत होतं. हे लग्न जमलं तर मुलीचं कल्याण होईल, चार पोरींपैकी एकीचा तरी भार हलका होईल, अशी आशा ठेवून तो आला होता. रात्रीच चर्चा करून त्यानं सकाळीच देसिंगच्या पाहुण्यांना मुलगी पहायला निरोपही धाडला. हातचे स्थळ जायला नको, हे आवर्जून सांगण्यासही तो विसरला नाही. मुलगीला पहायला पाहुणे मंडळी येईपर्यंत याचा ठिय्या जयसिंगपूरला होता.
दुसऱ्याच दिवशी नवरा मुलगा, त्याचे आई-वडील आणखी एकजण असे चौघे मुलगी पहायला दत्त झाले. बशीतून आलेले कांदेपोहे आणि वाटीतून आलेला गुळमाट चहा झाल्यावर खऱ्या अर्थाने पाहुणचाराचा सोपस्कार पार पडला. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम म्हणजे केवळ औपचारिकताच ठरली होती. तत्पूर्वीच चंद्रामतात्यानं बोलणी घडवून आणली होती.
‘‘मुलगी डी. एड. झाल्या.. तिला नोकरी लावणार का न्हाई..?’’ चंदा्रमतात्यानं पोराला प्रश्न विचारला.
‘‘हे काय विचारणं झालं.. त्यासाठीच तर डी. एड. झालेली बघितल्या’’ नवरा होऊ पाहणारा मुलगा उत्तरला.
‘‘तिचा पगार तुमीच घेणार.. काय आम्हाला देणार हाईसा व्हय?’’ या प्रश्नावर समोरून केवळ होकाराच्या माना डोलल्या.
अपेक्षित समोरून डोलणाऱ्या माना पाहून ‘‘आम्ही केवळ मुलगी आणि नारळ देणार’’ असं त्यानं अधिकारवाणीनं सरळ सांगूनही टाकलं.
‘‘ते ठिक हाय..लगीन तर करून देणार न्हवं ?’’पाव्हण्यापैकी एकानं विचारलं.
तसा चंद्रामतात्या म्हणाला, ‘‘तुमी म्हणत असाल, तर आत्ताच यादी पे शादी करू की..’’
या त्याच्या अनपेक्षित उत्तरानं वराकडची मंडळी तशी दचकली. काहीशी सावरून मगाचाच पाव्हणा बोलला, ‘‘तसं न्हवं..आम्ही केवळ चौघंच आलोय.. तयारी बी तशी काय न्हाई’’
‘‘त्याला काय लागतयं.. मनी मंगळसूत्र आणि दोन साड्या आणल्या की हुतय की सांजंपतर सगळं’’
“तसं कसं..भावकीतली माणसं तर पाहिजेत की”. यावेळी मात्र, होवू पाहणारी वरमाई नाकातल्या मंजुळ आवाजात बोलली.
मुलगी पाहण्याच्या या कार्यक्रमाला मुलीकडची मंडळी मात्र शांत बसली होती. वास्तविक, त्यांची तशी खर्च करण्याची ऐपत नव्हतीच. शिक्षक असणारे स्थळही त्यांना सोडायचे नव्हते. हे सर्व माहीत असणाऱ्या चंद्रामतात्याने स्वत:हूनच पुढाकार घेऊन सारं जुळवत आणलं होतं. मुलाकडच्या मंडळींनाही आतापर्यंत मुलीच्या घरच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. त्यामुळे ते ही समजुतीनं, डी. एड. झालेल्या मुलीकडं पाहून बोलणी करत होती.
‘‘मग असं करू, तुमच्याकडची दहा-पंधराजण येऊ द्यात. त्यापेक्षा जास्त वाढवू नका. सगळी परिस्थिती तुमच्या डोळ्यानं बघतायच न्हवं.’’ असं तो म्हणाला, तशी समोरची पाहुणे मंडळी काय बोलायचं या विचारात दिसली.
‘‘भावकीतली आली.. जवळच्या माणसांना तरी लग्नाला बोलवायला नको ?’’असा समोरून सूर येताच, ‘‘तर ओ.. बोलवायला पाहिजेलच.. तेवढीच बोलवायची.. माणसं वाढवून मानपानाच्या खर्चात उगी दोघास्नीबी पडाय नगो.’’ मुरलेल्या चंद्रामतात्यानं समोरचा प्रश्न खाली पडायच्या आतच हजरजबाबीपणानं उत्तर देवून अपेक्षित प्रश्नाला घायाळ केलं.
‘‘राहिलेल्या पाव्हण्यास्नी लग्नानंतर पूजा घालून, पुजेला बोलवायचं.’’असं सांगून, ‘‘जवळची माणसं तर कुठं सुद्दीनं वागत्यात ? आपलंच खावून आपल्याला नावं ठेवून जात्यात.’’ वर असं आणि वेगळं सुनावलं.
तसं त्यानं सुनावलेलं हे सामाजिक सत्य सगळ्यांनाच मनापासून पटलं होतं.
त्यामुळं समोरून ‘‘व्हय.. ते बी खरंच हाय..’’ असा खालच्या आवाजात दुजोराही मिळाला.
अशी सकारात्मक चर्चा पुढं-पुढं सरकत होती. चंद्रामतात्यानं आता पानाची चंची काढून डाव्या हातात सुपारी आणि उजव्या हातात अडकित्ता धरून एका अर्थानं सुपारी कातरण्यापेक्षा सुपारी फोडण्याचं काम चंद्रामतात्यानं सुरु केलं. फोडलेल्या सुपारीतला एक खांड तोंडात टाकून समोर बसलेल्या पाव्हण्याकडं सुपारी आणि अडकित्ता सरकवला. समोरचा पाव्हणा आता सुपारीचं खांड करून आपल्यासह होणाऱ्या वरपित्याला देवू लागला. नवऱ्या मुलाला खुणेनच सुपारीची विचारणा करताच, त्यानं मानेनंच नकार देवून ‘आपल्याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसल्याचं’ प्रमाण दिलं.
चंद्रामतात्यानं गुंडाळलेल्या पानांमधून दोन हिरवीगार पानं काढून ती दोन्ही हातात एक-एक धरुन दोन्ही बाजूनं धोतराला एकदा पुसली. साफ-सफाई केलेल्या त्या पानांची देठं त्यान हातानं खुडून ती खुडलेली देठं एकदा दातानं चावून टाकून दिली. सफाई झालेली ती पानं मधोमध उभी दुमडत स्टीलच्या चुन्याच्या डबीतून चुना काढून पानाला चुना लावला.
चुना लावलेल्या पानाची घडी करतानाच समोरच्या सुपारी फोडणाऱ्या पाहूण्याकडं उर्वरित पानाची गुंडाळी देवू केली. घडी केलेले पान तोंडात टाकून त्याने चंचीतून काताचा चौकोनी तुकडा बाहेर काढला. अंगठ्याच्या नखानं कात कुरतडत त्याला तोंडात मटकावले. कुरतडलेला चौकोनी कात पाहूण्याला देवू केला. तोपर्यंत समोरच्या पाहूण्याचा पानाला चुना लावून झाले होते. चंद्रामतात्याच्या या पानाच्या पाहूणचाराचा अगत्याने स्वीकार करुन पाहुणेही आता चर्चेसोबत रंगले होते.
सगळं मनासारखं जमत आल्याचा राग-रंग ओळखून ‘‘जवळचा म्हूर्त बघू आणि उरकून टाकू एखाद्या देवळात.. नाहीतर दारात मांडव घालून !’’ चंद्रामतात्यानं उठून उभं रहात पांढऱ्या मातीच्या भिंतीवर लटकवलेलं महालक्ष्मी कॅलेंडर हातात घेतलं आणि तोच लग्नाचा मुहूर्त शोधू लागला.
दोन्हीकडच्या संमतीने अखेर लग्नाचा मुहूर्त ठरला. सकाळी साखरपुडा आणि त्याच दिवशी लग्न, असं ठरवून उपवधुची खणा-नारळानं ओटी भरण्यात आली. यावर आणखी एकदा चहाच्या गुळमाट वाट्या तयार झाल्या. तशी पानानं रंगलेल्या तोंडानी पाण्याचा तांब्या जवळ केला. भरलेलं फुलपात्र घशात रिकामं केलं. तोंड खंगाळून गुळमाट चहाचा आस्वाद घेतला. चहाचा गुळमाटपणा जिभेवर घेवून पाहुणे मंडळी आनंदानं बाहेर पडली.
मुलीच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर लग्न ठरल्याच्या आनंदात लग्न खर्चाच्या चिंतेची लकेर मिसळून गेली. चंद्रामतात्याला मात्र, लग्न जमल्याचा विशेषत: शिक्षक स्थळ हातून सुटलं नाही, याचं मोठं समाधान झालं होतं. तसं त्यानं बोलूनही दाखवलं.
मुलीच्या घराजवळच रोटरी क्लबची एक शाळा होती. या शाळेमध्ये बहुतांशी लग्न होत होती. या लग्नालाही हिच शाळा विवाहस्थळ म्हणून ठरली. नियोजित ठरलेल्या मुहूर्तावर ठरल्याप्रमाणे याही लग्नाचा बार उडाला. या लग्नात चंद्रामतात्या निरपेक्ष भावनेने दिवसभर मिरवत होता. आज तो खूप उठून दिसत होता. नेहमी डोक्यावर असणाऱ्या गांधी टोपीच्या जागी देसिंगच्या पाहुण्यांनी फेटा बांधला होता. त्यामुळे गडी जाम खूश होता. वधूच्या पाठवणीनंतर तोही आपल्या गावी समाधानाने जायला निघाला. जाताना वधू-वरासोबतचा आपला फोटो पाठवून द्यायला तो अजिबात विसरला नाही. पाच दिवसानंतर होणाऱ्या सत्यनारायणाच्या पुजेसाठी चंद्रामतात्याला मुलाकडच्या मंडळींकडून खास आग्रहाचे आमंत्रण आजच मिळाले होते.
‘‘गोडाधोडाच्या पुजेच्या जेवणाचं तुम्ही बघा, आम्हाला आपली तोंडाची बाभळं काढू द्या.’’ असं मिश्किलपणे सांगत अघळ-पघळपणे नव्या पाहुण्यांनांही खास मेजवानीचा बेत करायला त्याने बिनदिक्कतपणे सांगूनही टाकले. ‘मटणाचं जेवण’ ही चंद्रामतात्याची कमजोरी होती. मटणाचा बेत असला तर हा गडी अगदी वस्तीलाच रहायचा. मनसोक्त राहून यथेच्छ ताव मारायचा. बोकडाच्या नळीतला मगज तोंडानं ओढता-ओढता रश्याच्या भुरक्याबरोबर कानानं माहितीही ओरपायचा.
या क्षेत्रातला त्याचा जनसंपर्क, अनुभव, हजरजबाबीपणा कमालीचा होता. दिवाळीनंतर तुळशीची लग्नं झाली की, चंद्रामतात्याची लगीनघाईला सुरुवात व्हायची. हे सगळं केवळ ‘चढत्याला वेल चढू द्यायचा, त्यात मोडता घालून उतरवायचा नाही’ या चांगुलपणातून तो करत असे. या चंद्रामतात्याने माझ्याही दोन्ही बहिणींची आणि मामांच्या मुलांची लग्ने जमवली होती. शिवाय लग्नात लक्षात राहणारा संसारोपयोगी आहेरही त्याने दिला होता. त्यावर ठळक अक्षरात स्वत:चे ऑईल पेंटमध्ये नाव टाकून दिले होते. मामांच्या घरात गेल्यानंतर तिजोरीच्या आरश्यात केस विंचरताना ‘चंद्राम दादू टोणपे’ ही पांढऱ्या रंगातील अक्षरे आजही उठावदारपणे त्याची आठवण करून देतात.
काळ बदलला ! विवाहेच्छुकांना तुळशी लग्नाची प्रतीक्षा संपली. अन् काढीव मुहूर्तावर कधीही लग्न होवू लागली. आंब्याच्या किंवा करंजंच्या पानांच्या डहाळ्यांचा दारात मांडव घालून होणारे लग्न, सार्वजनिक शाळेत, देवळात होणारे लग्न आता थेट मंगल कार्यालयात होवू लागले. पळसाच्या पानांच्या पत्रावळीत वाढला जाणारा सांजा, मसाले भात, त्याच द्रोणातील आमटी कालबाह्य झाली. मंगल कार्यालयातील स्टीलच्या चकचकीत ताटांमध्ये तशाच चकचकीत वाट्या स्थिरावल्या. त्यापुढे जावून बुफे सिस्टीम आली. प्लास्टिकच्या थाळ्या आणि वाट्या आल्या. पत्रावळीतील ‘त्या’ मोजक्या पदार्थांच्या ठिकाणी विविध पदार्थांची दाटीवाटी झाली. पत्रावळीतील सांजाचा गोडवा, द्रोणातील आमटीचा ठसका नव्या सभ्यतेच्या चकचकीत स्टीलच्या थाळीमधून हरवून गेला.
चंद्रामतात्यासारख्या अनुभवी मध्यस्थांच्या जागी व्यापारी प्रवृत्तीचे वधू-वर सूचक विवाह संस्थेचे फलक जागोजागी दिसू लागले. निरपेक्ष भावना लोप पावून ‘मानाजीरावा’च्या जागी ‘धनाजीराव’ विसावले. खोटी प्रतिष्ठा, फुकाचे मोठेपण, भौतिक सुखाने ग्रासलेल्या समाजात मानापमान नाट्य घडू लागले. नवख्या दोन घराण्यांचे संबंध होवू लागले. पण, ‘मनोमिलन’ कमी घडू लागले. हा काळ आणखी पुढे सटकून टीव्ही, मोबाईलच्या जमान्यात ऑनलाईन प्रथेत संकेतस्थळावर उतरला. लग्न जमवण्याची प्रथाही बदलत गेली. मुठीतल्या मोबाईलवर, लॅपटॉपच्या पडद्यावर अंतरपाटाचा शोध होवू लागला.
आभासी विश्वात रमणारी मनं तकलादू ऑनलाईन मध्यस्थांच्या माध्यमातून जोडली जावू लागली. यात विश्वासापेक्षा फसवणूकच जास्त होवू लागली. काही घडलीत तर बरीचशी मोडलीत. नव्या आयटी विश्वात ‘ऐटित वावरणाऱ्या’ नव्या पिढीत ‘लिव-इन-रिलेशनशिप’ हा वेगळाच ‘विना अंतरपाटा’चा प्रकार रूजला. ‘तुझं- माझं जमलं तर ठिक नाहीतर सोडून दिलं’,असाच काहीसा नवा विवाहपूर्व, अर्धविवाह दिसू लागला.
वयोमानपरत्वे सहा-सव्वासहा फूट उंचीच्या चंद्रामतात्याच्या ताठ कण्याने आता धनुष्याचा आकार घ्यायला सुरूवात केली होती. याच काळाच्या ओघात चंद्रामतात्याच्याही दोन्ही मुलींची लग्ने झाली. दैवदुर्विलास म्हणजे त्यातील एका मुलीची सोडचिठ्ठीही झाली होती. तिच्या चिंतेने ग्रासलेल्या चंद्रामतात्याने बऱ्याच दिवसानंतर तिचा दुसऱ्यांदा घरोबा करून दिला. तोही एका विधुराशी. त्याच्या मुलाचेही लग्न होवून, सून घरी आली होती. तिलाही आता मुलं झाली होती.
शिशिर ऋतुत पानगळती व्हावी, तशी शरीराची उमेद आणखी गळाली होती. पानगळतीने झालेले उघडे-बोडके झाड भयाण वाटावे, गळलेली पाने, फुले इकडे-तिकडे विखरून जावीत, तसा तो आता दिसू लागला होता. पहिल्यांदा एका डोळ्यात फूल पडले आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची ओढाताण ओढवली. काही दिवसानंतर दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया करावी लागली. याकामी कारखान्यातून आलेलं ऊसबील खर्ची पडलं. घरात पाय न ठरणारा एकेकाळचा चंद्रामतात्या आता दिवस-दिवस दारात पडून राहू लागला. उमेदित बायकोचं कमी ऐकले. त्याची कानाने आता परतफेड सुरू केली होती. सुरूवातीला बरेच दिवस काळ्या चष्म्यातील आणि नंतर जाडसर चष्म्यामागील किलकिल्या डोळ्यांनी, थरथरत्या हातांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांशी त्याचा संवाद होवू लागला. हा अधु संवादही दुर्लक्षित होत होता.
मुलगा जमेल तशी शेती करायचा. मध्येच एमआयडीसीत कामाला जायचा. एव्हाना त्याचा नातूही लग्नाला आला होता. त्याच्या लग्नासाठी चंद्रामतात्याची धडपड चालली होती. मनात असूनही शरीर साथ देत नव्हते. जाड भिंगाचा चष्मा असणाऱ्या नातूचे लग्न होत नव्हते.
“साऱ्या जगाची लग्नं ठरवली. आता कोण येतय का आपल्या नातवासाठी ?” बायकोचे हे बोल त्याच्या जिव्हारी लागत. मग काचा झालेल्या डोळ्यातून आपसूक आसवं ओघळत. गालाच्या खपाडावर सरकत. बऱ्यापैकी शिकल्या सवरलेल्या नातवाकडं पाहून त्याला भडभडून यायचं. गतकाळात अनेकांच्या लग्नाची बोलणी करणाऱ्या चंद्रामतात्याला नातवासाठी वर्तमानात बोलणी खावी लागत होती. कधी-कधी एकटाच टिपं गाळत तो बसलेला असायचा. गत काळातील आठवणीत कुढत रमलेला असायचा.
दारात कुणाची चाहूल लागली, तर ‘‘कुठल्या गावचं पाव्हणं?’’ असा त्याचा प्रश्न समोर ठाकलेला असायचा. बहुधा या प्रश्नाला कधी उत्तर मिळायचे नाही. तोही उत्तराची वाट न पाहता, हतबलतेनं नातवासाठी मुलीच्या स्थळाची चौकशी करायचा.
‘‘पोटापुरती शेती हाय.. मुलगा चांगला शिकलाय...गरिबाघरची असली तरी चालंल...’’ असा काहीसा त्याचा संवाद सुरू व्हायचा. कधी-कधी हा संवाद त्याचा एकट्याशी चालायचा. ‘चढत्या वेलाला मोडता घालू नये’, असं म्हणत आजवर कितीतरी जणांची लग्नं जमवलेल्या चंद्रामतात्याला वय उलटून गेलेल्या नातवासाठी अजून स्थळ मिळालं नव्हतं. त्याच्यामुळे जमलेल्या संसारात रमलेले काहीजण क्वचित प्रसंगी, यात्रा-जत्रेच्या निमित्ताने वाकडी वाट करून त्याला भेटायला येत. आपल्यासोबत असलेला नातू, पणतू कौतुकाने त्याला दाखवत आणि निघून जात. त्यांच्याकडेही चंद्रामतात्या नातवासाठी स्थळाची चौकशी करून मनातली घालमेल बाहेर व्यक्त करायचा. पण, ‘बघुया, सांगूया’ या शब्दाने त्याची नेहमीच बोळवण होत राहिली.
‘खातं पितं घर असावं, भविष्यात येणाऱ्या परिस्थितीवर मात करुन संसार करण्याची नवरा-बायकोची तयारी असावी...आई-वडील, सासू-सासरे काय जल्माला पुरल्यात व्हय !’ असं साधं सरळ तत्वज्ञान सांगून, विश्वासानं मनोमिलन घडवणारा चंद्रमतात्या नातवाच्या लग्नासाठी पाक झुरणीला लागला होता.
काळाच्या ओघात दिवस बदलले. हिरव्या-पिवळ्या शिवाराच्या लपेटीत एकेकाळी असणाऱ्या गावानेही बकालपणाची चादर लपेटली. छप्परांची जागा काळ्या कौलारू घरांनी घेतली. त्याही घरांची जागा तांबड्या बेंगलोरी कौलांनी घेतली. बेंगलोरी कौलांची घरे सिमेंट काँक्रीटच्या टुमदार बंगल्यात वस्तीला आलीत. रस्त्यांच्या कडेला हिरवागार उभा असणारा ऊस, सोयाबीन, शाकाहारी-मांसाहारी धाब्याच्या फलकांखाली कधीच आडवा झाला होता. गावात सुबत्तेच्या नावावर पर्यावरण बदल दिसू लागला. पारंपरिक असणारा भोवताल बिघडू लागला. गावाला शहराच्या नव्यापणाचा सदरा बसू लागला. घरपण, गावपण नवखं झालं. माणसं मोठी झाली. मनं मात्र, कोती झाली. माणुसकीची जागा पैशानं घेतली. जेथे विश्वास होता तेथेच घात होवू लागला.
असमतोल झालेल्या बदलांचा समतोल राखण्यासाठी पहिल्यांदा पूर आणि नंतर महापूर आला. हा इशारा होता की, फटका कमी होता, म्हणून नव्याने पुन्हा महापूर आला. तो ओसरताना स्वत:ची जाणीव आणि माणासामधली उणीव दाखवून गेला.
महापुरातनं सावरायला बराच काळ लागला. याच फटक्यात शेतीवाडीसह तोही चांगलाच गारटला होता. सगळी माणसं महापुरातून सावरत उभी रहात असतानाच, चंद्रामतात्या मात्र, अंथरुणावर निपचीत पडून असायचा. सहा-सव्वासहा फुटाच्या कण्याला काळजीच्या भुंग्याने कधीच पोखरायला सुरुवात केलेली होती. आता त्याचा भुगा पडत होता. शिवारात आलेलं महापुराचं पाणी ओसरून ते पुन्हा नदीपात्रात शिरावं आणि त्या पाण्याने संथ गतीने आपली वाटचाल करावी, अशीच वाटचाल निपचीत पडलेल्या शरीराची झाली. एके दिवशी त्याच्या फासळ्या दिसणाऱ्या उरातून जीव कधी भूर्रकन उडाला हे कुणालाच समजलं नाही.
रक्षा विसर्जनाच्या दिवशी म्हणे कावळ्याने त्याच्यासाठीचा घास शिवलाच नाही.
“चटदिशी जेवून घ्या. स्वत: ला ही आणि आम्हालाही मोकळं करा बघू..” अशी याचना तिष्ठत बसलेल्या मंडळींपैकी कुणीतरी बोलून दाखविली. बराचवेळ घुटमळणारी कावळं उडाली. ती परतलीच नाहीत.
“तात्या, आम्ही सगळी आहोत. मुलाला, नातवाला वाऱ्यावर सोडणार न्हाई. नातवाचं लगीन हुईल. आम्ही सगळी पुढाकार घेतो. जेवून घ्या एकदाचं.” अशी भाबडी हमी देवून जाणकार मंडळींनी मांडलेल्या नैवेद्याला नमस्कार केला. बर्याचवेळानंतर गाईला घास चारण्याची सूचना एकानं बोलून दाखविली. त्याचा आत्मा आस लागून भटकतोय, की त्याला मुक्ती मिळाली, हे त्याचे त्यालाच माहीत. पण गाईला घास चारल्यानंतर तिष्ठत बसलेल्या सर्वांची मात्र स्मशानभूमीतून एकदाची सुटका झाली.
गावात लग्नसराईच्या दिवसात पाहुण्या-रावण्यात आजही विवाहाची बोलणी सुरु झाली तर, चंद्रामतात्याची आठवण निघाल्याशिवाय लग्नाची ही चर्चा पुढं सरकतच नाही. विवाह संस्थांच्या ऑनलाईन आभासी जगात भासमान चंद्रामतात्या चालतं- बोलतं प्रसंगी अगदी पदरमोड करुन लग्न जमवणारी एक संस्थाच होती. अगदी विश्वासाने लग्नाचा वेल अनेक पिढ्या वर चढवणारी !
--प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर p7sons@gmail.com https://www.facebook.com/prashant.satpute.988
9403464101
000000000
Comments
Post a Comment