*"मोडा"तून भरलेत कुंडीत बटाटे..!*😄

    "सौ" बरोबर भाजी खरेदी करताना आपण केवळ "भार वाही हमाल..!"😝 याच भूमिकेत मी असतो. समस्त पुरुष मंडळींना हा अनुभव नवा नसावा, असो..!
   आठवड्याची भाजी "सौ" बरोबर खरेदी करताना कांदा-लसूणच्या जोडीला बटाटा हा आलाच. तसा याही वेळेला बटाट्यांचा नंबर हा लागलाच होता. गोल-मटोल, गरगरित वाटोळे, तुक-तुकित कांतीचे हे बटाटे बाजारातील विस्कटलेल्या उन्हातील जागेतून थेट घरातील मुदपाकखान्यातील भाजीपात्रातील हक्काच्या जागेत समाधानाने स्थिरावले होते.
    मुदपाकखान्यात गरजेप्रमाणे यांचा नंबर जवळ येत होता. यातले बरेच त्यांच्यासारखीच आमची गरगरीत 'ढेरी' बनवण्यासाठी 'क्षुधाशांती' च्या नावावर खर्ची पडले होते.😍😋 अशारितीने अखेर त्यांचा इहलोकीचा प्रवास संपला होता.😝
   कांदा-लसूणच्या आडोशाचा आधार घेत दोन 'छुपे बुटुटूम' एके दिवशी दिसून आले. आणले त्यावेळी असणारा गरगरितपणा जरा ढिला होवू पहात होता. तुकतुकित कांती सोडून जात होती. अकाली वृद्धत्वाच्या रेषा पसरत होत्या. भरीस-भर म्हणून की काय त्यांना बसून-बसून आलेला जाम वैताग 'सर्वांगावरील मोड'ने आतापर्यंत दाखवून दिला होता. 'बसून-बसून मोड आलाय,' हा वाक्यप्रचार त्यांनी प्रत्यक्षात भाजीपात्रात दाखवून दिला होता.
   अलगदपणे या 'मोडा'तून त्यांची सुटका करुन त्यांनाही 'सुखाच्या पुढील प्रवासाला' धाडले. त्यांच्या जिवा-भावाच्या मैत्रीच्या 'स्मरणार्थ' त्यांचे 'मोड'  टेरेस गार्डनमधील आधीच कुंडित असणाऱ्या इतर झाडांसोबत लावले.
    'मैत्रिच्या या 'स्मारका'ने चांगलाच जोर धरला आणि हिरव्यागार पानांचा गुच्छ सगळीकडून बहरु लागला.
    कुंडितील माती वर-खाली करुन आज पाणी घालताना या 'स्मारका'ची फलश्रुती उघडी पडली अन् पुन्हा गरगरीत, गोल-मटोल वाटोळे, तुकतुकित 'हिरवार' कांतीचे बटाटे दिसून आलेत.
   शाळेत उभे करुन 'तू सांग रे..' असा प्रश्न शिक्षकांनी विचारल्यावर क्षणात जी अवस्था व्हायची ती आजही शब्दात लिहू शकत नाही. न आलेल्या आणि चुकलेल्या उत्तरांसाठी, 'डोक्यात नुस्ते बटाटे भरलेत..' अशी मग शिक्षकांची शेरेबाजी व्हायची.
  काही का असेना..आज 'डोक्यात भरलेत' की नाही माहीत नाही, पण 'मोडा'तून थेट 'कुंडित बटाटे भरलेत' इतकं मात्र नक्की..!😊😍
       - प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, 
कोल्हापूर
9403464101 
 p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988
             00000

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..