खीर..मोदक..रोट..मलिदा..अन् चोंगे..


   बाप्पांचे आगमन म्हणजे आम्हा सर्व बालगोपाळांसाठी पर्वणी असायची. घरातल्या दिवळीत बाप्पांचे पाच दिवस वास्तव्य असायचे. कालांतराने माझ्या पुस्तकांच्या दरवाजा नसलेल्या कपाटातील पहिला कप्पा बाप्पांसाठी राखीव झाला. आदल्या दिवशीच हरळीकरांच्या रंगाच्या दुकानातून रंग आणून तो रंगवत असू. पुढे कित्येक वर्षी रंगाऐवजी वायचळच्या दुकानातून रंगीत गोटीव ताव, वेगवेगळ्या रंगांचे, चमकदार कागदांच्या आणि पुठ्ठा, थर्माकोलच्या सहाय्याने खास बाप्पांसाठी आरास करण्यात मी गुंतलेला असायचो. सुंदर रांगोळी काढायचो.
   साक्षात गणेशाचे आगमन झाले तरीही संध्याकाळपर्यंत सजावट ही सुरुच राही. आईने खपली गव्हाची खीर, मोदक, आळुच्या वड्या, पापड, हळद घालून केलेला पिवळा भात असे पदार्थ बनवलेले असत. मी या कामात आईला त्यावेळी मदतही करायचो. खरे तर या गोड-धोड पदार्थांच्या रेलचेलीमुळेच बालपणी बाप्पांचा उत्सव मला पर्वणी असायचा.
   संध्याकाळी खास आरतीच्या निमित्तानं मित्र-मंडळी जमत. चिरमुरे-बतासे-खोबऱ्याबरोबर प्रसाद म्हणून खीर, मोदक आणि तोंडी लावायला चविष्ट आळूची वडी ठरलेली असे.  मग, आरतीसाठी गल्लीत पुढच्या मित्राच्या घरी आम्ही सगळे जात असू. हा सिलसिला पहिल्या दिवशी बहुधा फिक्स ठरलेला असायचा. याच प्रसादाने त्या दिवशी आम्हा सगळ्यांचे पोट भरुन जाई.
  स्टोव्हवर पातेले ठेवून, त्यावर मोदकाच्या चाळणीत गुळ, खोबरे घालून केलेले उकडीच्या मोदकांची आईच्या हातची लहानपणी चाखलेली चव आजही रेंगाळते आहे. "गणपतीची आरती, मोदका पुरती", असे मी गंमतीने त्यावेळी म्हणत असू.
  पुढे सिक्किमच्या पर्यटनात 'मोमोज' हा पदार्थ चाखला आणि आपल्याकडील उकडीच्या मोदकाचा हा 'तिखट' भाऊबंद निघाला.
   आठवीला असताना भरत पाटील, दत्ता दळवी, विजय जाधव अशा मित्रांच्यासोबत आम्हीही वर्गणी गोळा करुन गणपती बसवला होता. पण नंतर ते बंद झाले होते.
 गल्लीत गणपती बरोबरच नालसाब पीर पंजा बसवला जात होता. गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन सण मागेपुढेच आसायचे तर कधी-कधी यंदासारखेच सोबत आसायचे. अशावेळी मांडवात पीर पंजाबरोबरच गणपती बाप्पा अगदी सर्व धर्म समभावाचा, हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत बसलेले असायचे. विशेष म्हणजे या दोन्ही उत्सवात अगदी मांडवाचे खड्डे काढण्यापासून ते विसर्जनापर्यंत राबणारे हात हे हिंदू-मुस्लीम समाजातील कष्टकऱ्यांचे असत. यात कधीही धार्मिकतेचा, कट्टरतेचा लवलेशही नसायचा. अगदी एकमेकांचा उद्धार करत गुण्या-गोविंदाने हे दोन्ही उत्सव पार पडायचे. हे गल्लीचे सामुदायिक सण होते.
   गल्लीच्या वरच्या बाजुला इराणी वस्ती आहे. त्यांचेही पंजे बसत. अगदी नाजूक आणि मनमोहक, देखणे पंजे असत. गणपतीचा जसा मोदकाचा प्रसाद गल्लीत घरोघरी व्हायचा तसा मोहरमसाठी 'चोंगे-मलिदा' ठरलेला असे. कुणाच्या घरातून 'रोट' चा असे. आम्ही समस्त सवंगडी यावर जाम तुटुन पडायचो. 
  माझ्याही घरी आई पिरासाठी चोंगे बनवायची. आईने चोंग्याच्या दगडी पाटावर लाटून, भाजून दिलेला चोंगा मी गुळाच्या पाकात बुडवून त्यावर खसखस आणि किसलेले खोबरे पेरत असू. सोबत सुंठ-वेलची-बडिशेप घालून आई मलिदा करायची. मलिद्याची ही गरम चपाती कुस्करायलाही मीच असायचो. समस्त गल्लीतून हे जिन्नस प्रसाद म्हणून पिरासाठी जात असत.
आज पुन्हा एकदा बाप्पाचा उत्सव आणि मोहरम हातात हात घालून एकत्र आले आहेत. हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देत अनेक ठिकाणी हे दोन्ही सण साजरे होत आहेत. आज सौ ने केलेल्या मोदकांचा आणि खिरीचा आस्वाद घेताना मन बालपणात हळवं झालं. निरागसतेत बागडणारे बालपण धार्मिक आणि दांभिकतेपासून कोसो दूर होतं.  आज हे सगळं आठवून उगीचच मोठं झाल्यासारखं वाटू लागलय. मानवाच्या मोठेपणाच्या झुलीत कमालीचा खोटेपणाही आला आणि या सुखाला तो मुकला.
  विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्यं दाखवणारी आपली खाद्य संस्कृतीही तितकीच जवळून अनुभवली पाहिजे, मित्रांनो ! "जिथं हरवलंय तिथंच शोधलं तर हरवलेलं समाधान सापडणार आहे." असो आज सौ च्या हातचा मोदक खाल्लाय आता आईच्या हातचे चोंगे खाणार आहे. हरवलेलं अनुभवणार आहे..!
                                  -प्रशांत सातपुते
                                  9403464101 
                               p7sons@gmail.com
 https://www.facebook.com/prashant.satpute.988

Comments

  1. Replies
    1. खूप खूप छान 'रम्य ते बालपण' वाचायला एकदम मजा आली. खरचं आपण
      आनंदाने अनुभवलेला आठवणींचा खजिना
      एवढ्या खुमासदार शैलीत लिहिलेला आहे, की वाचत असताना प्रत्यक्ष प्रसंग चित्रे डोळ्यासमोर अवतरल्याचा आभास निर्माण झाला. किंवा आपण त्या काळात पुन्हा गेलो होतो असेही वाटले. त्या काळातील प्रत्येक सणाचा आनंद काही वेगळाच होता.
      मनाला भुरळ पडणारे लेखन आहे.
      आपल्याला खूप खूप शुभेच्छा !!!
      धन्यवाद!!!🙏🙏🙏

      Delete
  2. खूप खूप छान 'रम्य ते बालपण' वाचायला एकदम मजा आली. खरचं आपण
    आनंदाने अनुभवलेला आठवणींचा खजिना
    एवढ्या खुमासदार शैलीत लिहिलेला आहे, की वाचत असताना प्रत्यक्ष प्रसंग चित्रे डोळ्यासमोर अवतरल्याचा आभास निर्माण झाला. किंवा आपण त्या काळात पुन्हा गेलो होतो असेही वाटले. त्या काळातील प्रत्येक सणाचा आनंद काही वेगळाच होता.
    मनाला भुरळ पडणारे लेखन आहे.
    आपल्याला खूप खूप शुभेच्छा !!!
    धन्यवाद!!!🙏🙏🙏

    सरला अविनाश पाटील
    जिल्हा समुपदेशक
    DIET कोल्हापूर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..