मनाला हूरहूर लावणारी "ती" पत्रे..!


  "डाकिया डाक लाया..! खुशी का पैगाम लाया कहीं.. कहीं दर्दनाक लाया..!" किशोर कुमार यांनी गायलेले आणि राजेश खन्नावर चित्रित हे गीत  नव्वदच्या दशकात टी व्ही वर खास करुन जाहिरातीत कधी- कधी 'रंगोली' मध्ये पाहिलेलं आजही आठवतय. जाहिरात तशी फेमस होती. अगदी मनात रुतून ओठांना गुणगुणायला लावणारी! त्या आधी अमीन सयानीच्या आवाजातील बिनाका आणि नंतर सिबाका गीतमाला मध्येही ऐकलेलं. घरी रेडिओ नव्हताच. टी व्ही चा पत्ता तर खूपच लांब! पण, गल्लीत याचा पुरेपूर आणि मनसोक्त आनंद घेतलेला.
  आज हे सगळं आठवताना १५ पैशाच्या मनाला हूरहूर लावणाऱ्या पोस्ट कार्डची खाकी छबी, तर निळ्या रंगाच्या अंतर्देशीय पत्रामधील खुशालीचा मजकूर समोर येतोय. मला आजही आठवतय  सैन्यातून सुट्टीला आलेले माझे मामा अर्थात 'अभ्यास अण्णा' हे आमचा अभ्यास घ्यायचे. ते खूप अभ्यास करायचे म्हणून त्यांचे नाव अभ्यास अण्णा पडलेले असे नंतर त्या नामाभिधानाचा शोध लागला. माझ्या लहानपणी ते अभ्यास करताना दिसले नसाले तरी, आमचा अभ्यास मात्र, कडक शिस्तीत घ्यायचे. जयसिंगपूर नगर परिषदेच्या ग्रंथालयातून पुस्तके आणून ते नेहमी वाचायचे.
  एकदा अभ्यासात त्यांनी पत्र लेखन घेतले होते. मोठ्या मामांची मोठी मुलगी बाळंतीण झाली होती. तिच्या सासरी त्याविषयी पत्र लिहिण्यास त्यांनी सांगितले. पत्र पोहचल्यानंतर दोन-चार दिवसातच तिच्या सासरची मंडळी इकडे पोहचली होती. बाळाचे तोंडसुख घेण्यासाठी  प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. प्रत्यक्ष बाळाला पाहिल्यानंतर आणि 'पहिली बेटी तूप रोटी. लक्ष्मी आलीय..लक्ष्मी' असे म्हणत मामीने बाळाला मंडळींच्या हाती दिले, तशी ती सगळी बिथरलीत आणि खऱ्या अर्थाने घरच्या मंडळींवर 'तोंडसुख' घेवू लागलीत. क्षणापूर्वी आनंदलेले चेहरे लालबुंद दिसू लागलीत. कुणाला काही कळायच्या आतच भांडण सुरु झाले. 'आम्हाला तुम्ही फसवलं. मुलगी झाली असताना 'मुलगा' झाला म्हणून खोटं कळवलं.' असे आरोप होवू लागले. घरात सगळ्या आनंदावर विरजण पडले. अर्थात हे विरजण अशुद्धलेखनाने पडले होते. मामांच्या मुलाने मजकुरात 'मुलगी' शब्दातील शेवटच्या अक्षरावरील वेलांटीच गायब केली होती आणि हे पत्र तिच्या सासरी पोहचले होते.
  त्या दिवशी त्याला शुद्धलेखन आयुष्यभर लक्षात राहणारी शिक्षा मिळाली होती. झालेल्या चुकिचा उलगडा झाल्यानंतर पाहुणे शांत झाले. पुढच्यावेळी खरोखरच मुलगा झालेले पत्र मिळूनही पाहुण्यांनी 'तशी' सर्व मनाची तयारी करुनच घरात प्रवेश केला होता. तर अशी आमची पत्र लेखनाची तयारी होत होती. मामांच्या घरी लाकडी रेडिओ आजही आहे. हा सुरु केल्यावर थोड्या अवधीने तो गळा काढायचा. यावरी बातम्यांवर सगळ्यांच्या वेळा ठरलेल्या असत. रात्री १० वा बहुधा शुक्रवारी बिनाका गीतमाला हा गाण्यांचा कार्यक्रम असे. या कार्यक्रमात रेडिओवर आपले नाव ऐकायला मिळावे, म्हणून आम्ही सर्व मंडळी पोस्ट कार्ड पाठवून गाण्याची फर्माईश करत असू. पण नेहमी घोर निराशा होई. निवडक पत्रांनाच त्यावर स्थान मिळे. झुमरीतलैय्या हे नाव आजवर नकाशात कुठे दिसले नसले तरी, त्याचा शोध या कार्यक्रमात आम्हा सर्वांना लागलेला.
   लाल शाईने अथवा अर्धे पत्र आले असले तर त्याची बातमी अगदी गल्लीभर व्हायची. सासरी गेलेल्या माहेरवासिनीची खुशाली याच पत्राने कळायची. पोस्ट कार्ड उघडे असल्याने ते घरी नसल्यास कुणाच्याही हाती पडल्याने गोपनियता रहात नसे. मग, अशावेळी आंतर्देशीय पत्राचा वापर होत असे. यातून जादा मजकूर आणि गोपनीयता दोन्ही राखले जाई. सुख-दुःखाच्या बातम्या यातून समजायच्या. पोस्टमन गल्लीत आला की, 'आमचं काही पत्र आहे का?' अशी सर्रास विचारणा त्याला होत असे.
  रक्षाबंधनसाठीच्या अनेक बहिणाबाईंच्या राख्या पोस्टाच्या पाकिटातून समस्त भाऊरायांना रवाना होत. नवीन लग्न झालेले नोकरी निमित्तानं दूरदेशी गेलेले समस्त पतीदेव याच पत्रातून आपली विरहाची प्रेमभावना व्यक्त करत.
  आज हे सगळं आठवलं कारण, एन सी सी च्या शिबिरात भेट झालेल्या अनेक मित्रांच्या मला आलेल्या पत्रांचा खजिना नुकताच बाहेर काढला. ही सगळी पत्र पुन्हा एकदा वाचून काढलीत. मजकूर वाचून पुन्हा कँपमध्ये भटकून आलो. जम्मूमधील अमरजीत सिंग, केरळमधील राजेश पययोल्ली, गारगोटीत राहणारा पण कोडंगल्लूरमध्ये भेटलेला मारुती वंजारे अशी अनेक पत्रे यात आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारी, दिवाळीनिमित्त आलेली आणि बरेच विषय घेवून आलेली.
  मराठीत "प्रिय, प्रशांत स. न. वि. वि. पत्र लिहिण्यास कारण की," असा सुरुवातीचा मायना असणारी आणि "बरे असो आता जास्त काही लिहीत नाही. पत्र पुरे करतो." असा शेवट असणारा मजकूर! तर हिंदीत "प्यारे प्रशान्त, My dear friend prashant" अशी सुरुवात करुन' खत का जवाब जल्दी देना,'  असा तितक्याच गोड भाषेत शेवट करणारी ही पत्रे मनाला मोहरुन टाकतात. याच पत्रातून एकमेकांचे फोटो पाठवलेले क्षण, मैत्रीवरील 'पतंग उडती है आकाश में.. धागा है मेरे हाथ में..तुम हो तुम्हारे गाँव में..लेकीन तुम्हारी तसबीर है मेरे दिल में..' अशा अनेक लिहिलेल्या शायऱ्या आजही मनाला, जगण्याला उभारी देवून समृद्ध करतात.
   भावनाओं को मंजिल तक पहुँचानेवाली इन चिठ्ठियों का कभी बेइंतहा इंतजार करते थे हम..बहुत सारी खुशियाँ..कभी कबार गम़ की खबर सुनानेवाली ए चिठ्ठियाँ को मोबाईल ने खा लिया है..और आदमीने अपना एहसास भी खो दिया है..!
  १५ पैशाचं कार्ड खुशाली कळवत होतं, हूरहूर लावत होतं. एक रुपयाचं नाणं घेवून एस टी डी, पी सी ओ चौया रांगेत रहात होतो. फोन लागला की मनाबरोबर भावना आपसूक ओघळत होत्या. कधी-कधी आनंदाश्रू वाट मोकळी करत होते. अवघ्या काही रुपयात मिळणारी माया, आपुलकी, प्रेम आज हातात लाखाचा मोबाईल असूनही लोप पावली आहे. २४ तास संपर्कात असूनही ना ओढ ना हूरहूर केवळ माणसाला खोटं बोलायला भाग पाडत आहे.
   पुन्हा एकदा आज पत्रं लिहायला बसलोय..पत्रातील हरवलेल्या मित्रांना शोधायला बसलोय..बघुया ते आज कोठे आहेत, अन् काय करत आहेत? सापडले तर नक्की तुम्हाला कळवणार..! नाहीतर..नव्या पत्त्यात हरवलेली, पत्ता न सापडलेली परत आलेली पत्रं आधीच्याच खजिन्यात सामील होणार..!
                               -प्रशांत सातपुते
                               *9403464101* 
                     p7sons@gmail.com
       https://www.facebook.com/prashant.satpute.988

Comments

  1. Sundar ani ekdam ayushyatil mahatvache....manala lagnare.....Patrache mahatva...Ek no.....saheb

    ReplyDelete
  2. June diwas athwale saheb.... khupach chhan..apratim...very nice saheb..🙏🙏

    ReplyDelete
  3. खूपच भावुक करणारे वर्णन👍✌️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..