लहान आकारातील आणि शाडूच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करावी - डॉ. रामास्वामी एन.





सातारा, दि. 22 (जिमाका)  :-   जलस्त्रोत नष्ट होऊ नयेत, तसेच जलप्रदूषण  होणार नाही यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी  लहान आकारातील, पर्यावरणपूरक रंगातील आणि शाडूच्याच गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागने 3 मे 2011 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.  या निर्णयानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर करु नये यासाठी सर्वांनी जनजागरण करणे आवश्यक आहे.  पर्यावरणपूरक रंगातील आणि शाडू अथवा मातीच्या मूर्त्यांचा वापर करुन जलप्रदूषण टाळावे.
बाजारातील उपलब्ध रंगाची चाचणी घेऊन पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करुन देण्याविषयीच्या सूचना संबंधितांना देऊन जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, नगरपालिकांनी, ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर बैठका घेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रबोधन करावे त्याचबरोबर निर्माल्य कलशाची  व्यवस्था करावी. तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनीही आपल्या स्तरावर बैठका घेऊन एक गाव एक गणपती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करावेत,  गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी सिंटेक्स टाक्या, हौद यासारख्या साधनांची उपलब्धता नगरपालिकांनी करुन द्यावी.  लहान आकारातील, पर्यावरणपूरक रंगातील, शाडूच्या तसेच मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करुन दरवर्षी जलप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असेही ते शेवटी म्हणाले. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काय  करावे

·         शाडू वा माती तसेच कागदी लगद्यापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक रंगातील आणि लहान आकारातील मूर्तींना प्राधान्य द्यावे.
·        उत्सवकाळात भक्त समुदायांकडून होणा-या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर टाळावा.  सार्वजनिक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी  स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवावेत. त्यामध्ये दैनंदिन पूजेसाठी वापरलेली सामुग्री जमा करुन त्याची विल्हेवाट लावावी.
·        निर्माल्य कलशात  प्लॅस्टीक फुले, माळा यासारखी अविघटनशील सामुग्री जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
·        आरास करण्यासाठी विविध रंगातील फुलांचा वापर करावा.  थर्माकॉल आणि अन्य पर्यावरणास हानीकारक वस्तूंचा वापर टाळावा. 
·        विद्युत रोषणाई ध्वनीक्षेपकांचा वापर माफक स्वरुपात  करण्यात यावा.  निश्चीत केलेल्या मानकाप्रमाणे दिवसा रात्री ध्वनीची पातळी नियंत्रित ठेवण्याची दक्षता घ्यावी. 
·        मूर्तींचे विसर्जन हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधीमार्फत कृत्रिम तलावात करण्यात यावे. 
·        मूर्तींची प्रतिष्ठापना विसर्जन करतांना  मिरवणुकीत ध्वनीची पातळी मानकाप्रमाणे नियंत्रित ठेवावी.
0000

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..